वैष्णव ट्रस्टकडून पंढरपुरात आरोग्यसेवा
पुणे : पंढरपूरच्या चैत्री वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यासाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे स्वयंसेवक पुण्यातून रवाना झाले आहेत.
गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चैत्री यात्रा होऊ शकली नव्हती. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. त्यांना वैद्यकीय सुविधेची उणीव भासू नये म्हणून ‘वैष्णव’चे आरोग्यसेवकांचे पथक शनिवारीच (दि. ९) पुण्यातील निगडी प्राधिकरण येथून पंढरपूरला रवाना झाले आहेत.
या पथकात डॉक्टर आणि ऍम्ब्युलन्सचा समावेश आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे राजकुमार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टचे पुणे विभागाचे प्रमुख व प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, विश्वस्त श्रीराम नलावडे, डॉ. वसंतराव गोरडे, डाॅ. काळे, प्रकाश सातव, संतोष नलावडे, देवेंद्र चव्हाण, सीताराम आहेर, शांताराम डफळ, सिताराम डफळ, भीमजी विधाते, नवनाथ ढोले आदी उपस्थित होते.
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा संदेश अंगिकारत गेली ३० वर्षे कामगार, वारकर्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट करीत आहे.
अनेक दानशूर मंडळी, डॉक्टरांनी निरपेक्ष भावनेने या कार्यात सहभागी झाल्याने आज आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, देहू येथून निघणारी संत तुकाराम महाराज पालखी आणि सासवड येथील संत सोपानकाका पालखी सोहळ्यात संपूर्ण प्रवासादरम्यान वैष्णव ट्रस्ट सेवा पुरवित आहे. तसेच नाशिक, अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार येथील कुंभमेळ्यात देखील आरोग्य सेवा पुरविली जात आहे.