पंढरपुरातील तरूण डोक्यावर
कोरत आहेत संतांच्या प्रतिकृती
पंढरपूर : राज्याच्या विविध भागातून संतांचे पालखी सोहळे मजल दरमजल करत पंढरीजवळ येत आहेत. वारकऱ्यांना पंढरीची आणि पंढरीला वारकऱ्यांची ओढ लागलेली आहे. तसा पंढरपुरातील वारीचा ज्वर चढू लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून पंढरपुरातील तरुणांना डोक्यावर संतांच्या प्रतिकृती कोरण्याचा नाद लागला आहे.
येत्या १० जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी वारकरी पंढरपुरात येत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा येथून विविध संतांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतील. त्यामुळे पंढरपूरही वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. एकूणच पंढरपूरला वारीचा ज्वर चढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरीच्या तरुणाईमध्ये डोक्यावर विविध संतांच्या प्रतिकृती कोरण्याची फॅशन वाढली आहे.
गुरू राऊत या तरुणाने आपल्या डोक्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती कोरली आहे. पंढरपूरमधील नाभिक कलाकार तुकाराम चव्हाण यांनी ही कलाकुसर केली आहे. ‘यंदा तरुणाईला विविध संतांच्या प्रतिकृती कोरण्याचा नाद लागला आहे. कटिंग करायला आलेले बहुतेक तरूण डोक्यावर संतांच्या प्रतिकृती कोरण्याची फर्माईश करत आहेत’, असे चव्हाण यांनी सांगितले.