सप्तशतकोत्तर अंतर्धान सोहळा

मुक्ताईनगर : संत मुक्ताबाईंचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी अंतर्धान सोहळा सध्या सुरू आहे. याच दरम्यान आजपासून (दि २५ फेब्रुवारी २०२२) मुक्ताबाई आणि त्यांचे शिष्य योगी चांगदेव यांचा यात्रा महोत्सव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे सुरू झाला आहे.

कोरोनाकाळात गेली दोन वर्षे हा यात्रा महोत्सव न झाल्याने या वर्षी वारकरी आणि भविकांमध्ये वेगळ्या उत्साहाचे वातावरण आहे. गावोगावच्या दिंड्या संत मुक्ताबाईंच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत

ज्यांना पहिल्या महिला संत म्हणून गौरविण्यात येतं आणि सर्वात ‘धाकुटी’ असूनही ज्यांनी संत ज्ञानदेव, संत नामदेव, योगी चांगदेव, संत विसोबा खेचर अशा ज्येष्ठ आणि अधिकारी व्यक्तींना उपदेश दिला, त्या संत मुक्ताबाईंचा पारमार्थिक अधिकारी आणि अभ्यास खूप मोठा होता. सर्व संत मांदियाळीने तो मान्य केलेला होता.

मुक्ताई झाली लुप्त…

संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्‍ताबाईंना घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाले होते. त्यावेळी (अंदाजे १२ मे १२९७) ते तापी नदीच्या तीरावर आले असता आकाशात कडकडाट करत वीज चमकली आणि त्या वीजेच्या झगमगाटात मुक्ताई लुप्त झाल्या, असे सांगितले जाते. हेच ठिकाण जळगाव जिल्ह्यात मेहूण-कोथळी-मुक्‍ताईनगर येथे आहे. येथे दरवर्षी माघ वारी भव्य यात्रा आयोजित करण्यात येते. यंदा संत मुक्‍ताई यांचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वर्षे) अंतर्धान समाधी सोहळा सुरू आहे. त्यामुळे या यात्रेला मोठे महत्त्व आहे.

दोन वर्षांनंतर फुलणार भक्‍तीचा मळा
गुरू-शिष्य परंपरेत असणारा मुक्‍ताबाई-योगिराज चांगदेव महाशिवरात्री माघ वारी यात्रोत्सव सुरू झाला आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे ही यात्रा भरली नव्हती. पण, यंदा शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) रोजी ध्वजपूजनाने यात्रा सुरू झाली आहे. तर, मुख्य उत्सव दि. २७ फेब्रुवारीला असेल. उत्सवासाठी संत मुक्‍ताबाई संस्थान, कोथळी ग्रामपंचायत आणि मुक्ताईनगर पालिकेने तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती संत मुक्‍ताबाई संस्थानचे अध्यक्ष
ऍड. रवींद्रभैय्या पाटील आणि पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी दिली.

मध्य प्रदेशातूनही येतात दिंड्या
यात्रेत सहभागी होण्यासाठी खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यास मध्य प्रदेशातूनदेखील शेकडो पायी दिंड्या श्रीक्षेत्र मुक्‍ताईनगरच्या दिशेने येत आहेत. २६ फेब्रुवारी रोजी त्या मुक्‍ताईनगर परिसरातील १० किलोमीटरच्या परिघातील वरील गाव-खेड्यांत मुक्‍कामी येतील.

एकादशीला मुक्ताई प्रदक्षिणा
परंपरेनुसार माघ कृष्ण पक्ष दशमीला (दि. २६) सर्व दिंड्यांचे आगमन होईल. प्रत्येक दिंडी फडावर त्यांच्या नियोजनानुसार कार्यक्रम होतील. काकडा, हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचन कररून एकादशीला मुक्ताई प्रदक्षिणा होईल. महाशिवरात्रीला सर्व दिंड्या श्री क्षेत्र चांगदेव येथे जातील. यात्रोत्सवात होणारी गर्दी पाहता संस्थानने कोणत्याही भाविकाची दर्शन घेताना गैरसोय होऊ नये यावर भर दिला आहे. त्यासाठी नवीन बांधकाम केलेल्या जागेत दर्शनबारीचे नियोजन आहे. नवीन मंदिर परिसरात दिंडी सोहळ्यांच्या विसाव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत यात्रोत्सव पार पडेल. तर, २७ फेब्रुवारीला रविवार भागवत एकादशी आणि १ मार्चला महाशिवरात्री हे यात्रोत्सवाचे दोन मुख्य दिवस आहेत.

गुरू-शिष्याची भेट
शिवरात्रीला संत मुक्‍ताईंचा पालखी सोहळा संत चांगदेवाच्या भेटीला निघेल. यात्रेसाठी आलेल्या शेकडो दिंड्या चांगदेव येथे दाखल होतील. तेथे संत मुक्ताई आणि योगीराज चांगदेव या गुरू-शिष्यांची भेट होते. नंतर सर्व दिंड्या पुन्हा मुक्ताईनगरला येतात. दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा १ रोजी गोपाळकाला करून दिंड्या परतीच्या प्रवासाला निघताना पुढील वर्षीचा संकल्प करतात. या पद्धतीचा उत्सव परंपरेने शेकडो वर्षांपासून साजरा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *