देहूत बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर
प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय
देहू : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या दरम्यान देहूतील इंद्रायणी नदी प्रदूषीत होऊ नये यासाठी नदीला मिळणाऱ्या ओढ्यातील दूषित पाणी बंद करण्यात आले आहे. तसेच गृहप्रकल्प आणि सोसायट्यांना सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वीत करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आज (दि. २२) देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिली.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५वा बीज सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज येथील मुख्य मंदिराच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डी. के. घेवारे, वाहतूक विभागाचे सतीश कसबे, पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, दिगंबर सूर्यवंशी, मंडलाधिकारी दिनेश नरवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव आदी उपस्थित होते.
यंदाचा ३७५ वा बीज सोहळा बुधवारी (दि. २७) होत आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येणार आहेत. भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध शासकीय विभागांकडून कामाचे नियोजन करण्यात येत असते.
भाविकांसाठी पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, सीसी कॅमेरे, विद्युत हायमास्क, पथदिवे दुरूस्ती, स्वच्छतेची कामे सुरू आहेत. अतिक्रमण होऊ नये यासाठी पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. नदी प्रदूषण होऊ नये यासाठी ओढ्यातील दूषित पाणी बंद करण्यात आले आहे. गृहप्रकल्प आणि सोसायट्यांना ‘एसटीपी’ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी घार्गे यांनी दिली. दूषित पाण्यामुळे इंद्रायणीतील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेण्यात येत आहे.
सोहळ्याच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची काळजी महावितरणने घ्यावी. वाहतूक पोलिसांनी दिंड्यांतील वाहनांना देहूत येऊ द्यावे. देहू ते चाकण, तळेगाव मार्गावर पीएमपीएल बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली. वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिर, मुख्य प्रवेशद्वार या चार ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र असणार आहेत. त्यात ५ वैद्यकीय अधिकारी, २४ कर्मचारी, १ कार्डियाक, ३ रुग्णवाहिका, खाजगी रुग्णालयाचे २० बेड आरक्षित केले आहेत. तसेच पाणी तपासणी पथक तयार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.
दरम्यान बीज उत्सवासाठी देहूत जाणाऱ्या भाविकांसाठी पीएमपीएमएलच्या १२५ बसेस, तर पीएमपीएलच्या १२५ बसेस उपलब्ध असणार आहेत. झेंडेमळा, क्रीडांगण आणि गायरान जागेवर बसेस वाहनतळ असणार आहेत. बसेस रस्त्यावर बंद पडू नये, यासाठी नवीन वाहने असावीत. बसेस रस्त्यांवर उभी राहू नये याची दक्षता घेण्यात यावी. आवश्यकता वाटल्यास तात्पुरत्या वाहन तळासाठी खाजगी जागा ताब्यात घेण्यात याव्यात. स्थानिकांनी वाहने सोहळ्याच्या दिवशी रस्त्यावर उभी करू नयेत, अशा सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच उपनगरांतून देहू येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीतर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी आळंदीसाठी देखील जादा बस धावणार आहेत. यात प्रामुख्याने पुण्यातील स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड येथील निगडी स्थानकावरून देहूसाठी बस धावतील. तसेच देहूसह पुणे मनपा भवन, स्वारगेट आणि हडपसर येथून आळंदीला बस सोडण्यात येणार आहेत.
देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. येथून सर्व बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरीता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा मंदिर परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रिडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील. दि. २६ ते २८ मार्च या दरम्यान जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.