पैठणमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत
होणार सहा पुरस्कारांचे वितरण
पैठण : वारकरी संप्रदायात प्रतिष्ठेचे समजले जाणारे आणि संत एकनाथ महाराजांच्या नावाने दिले जाणारे सहा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पैठणमधील नाथगल्ली येथे १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
ताम्रपट, २५ हजार रुपयांचा धनादेश, श्री संत एकनाथ महाराजांची मूर्ती, श्री एकनाथी भागवत, नाथांचा फेटा, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जात असल्याचे आयोजक नाथवंशज ह. भ. प. श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितले.
संत भानुदास महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या नावाने दिला जाणारा मुख्य ‘भानुदास एकनाथ पुरस्कार’ यंदा श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष प. पु. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच ‘श्री एकनाथ महाराज संस्थानाधिपती वै. ह. भ. प. रंगनाथबुवा उर्फ भैय्यासाहेब महाराज गोसावी वारकरी रत्न पुरस्कार’ हा खान्देश येथील श्री झेंडुजी महाराज बेळीकर मठाचे प्रमुख ह. भ. प. श्री. भरत महाराज पाटील यांना देण्यात येणार आहे.
‘संत एकनाथ महाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार’ मुंबई येथील ह. भ. प. श्री. विश्वनाथ महाराज वारिंगे याना देण्यात येणार आहे. ‘संत एकनाथ महाराज स्वरमार्तंड पुरस्कार’ सुप्रसिद्ध भजन गायक पंडित श्री. कल्याणजी गायकवाड यांना, ‘संत एकनाथ महाराज तालमार्तंड पुरस्कार’ आळंदी येथील ह. भ. प. श्री. अशोक महाराज पांचाळ यांना, ‘संत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार’ हा पैठण येथे गेल्या अनेक वर्षांपासून श्रीनाथ समाधी मंदिरात अन्नछत्र चालविणाऱ्या श्रीहरी कृपा सेवा समिती या संस्थेस दिला जाणार आहे.
अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार समारंभ प्रतिवर्षी पार पडतो. मानपत्र, धनादेश, संत एकनाथ महाराजांची मूर्ती, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या व्यक्तिमत्त्वांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनद्वारा हे पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. संस्थेतर्फे विविध सामाजिक कामे, संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्यात येतो.
श्री संत नहरही सोनार महाराज संस्थान, नाथगल्ली पैठण येथे दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनचे संस्थापक अध्यक्ष, नाथवंशज ह. भ. प. श्री. योगीराज महाराज पैठणकर यांनी केले आहे.