रुक्मिणी मातेच्या पालखीचे यंदा
४३०वे वर्ष; भाविकांमध्ये उत्साह
श्री क्षेत्र कौंडण्यपूर : सूर्यकांत भिसे
टाळमृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूरसाठी आज सायंकाळी चार वाजता (दि. १२) येथून प्रस्थान झाले.
संत सद्गुरू श्री सदाराम महाराजांनी सुरू केलेल्या पालखीचे हे ४३०वे वर्ष आहे. मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली विदर्भातील ही एकमेव पालखी आहे. ही पालखी ३३ दिवसांचा प्रवास करून दिनांक १४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये प्रवेश करेल.
प्रस्थानानिमित्त सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली. त्यानंतर तीर्थ स्थापना, संत सद्गुरू सदाराम महाराज यांच्या समाधीचे पूजन, तसेच श्री रुक्मिणी माता पादुका अभिषेक श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सचिव आणि पालखी सोहळा प्रमुख सदानंद साधू यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्ष नामदेवराव अमाळकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त हिम्मतराव टाकोणे, सुरेश काका चौहान, अशोकराव पवार, अतुल ठाकरे, ह. भ. प. पंकज महाराज महल्ले, विणेकरी विठोबाची बागडे, श्याम श्रीराव, स्वप्नील जमखुटे आदी उपस्थित होते.
श्री रुक्मिणी मातेच्या पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्यानंतर सर्व वारकऱ्यांनी आईच्या पालखीचे दर्शन घेतले. भजनानंतर आरती होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत जगत्जननी आई रुक्मिणी माता पालखीचे सायंकाळी ठीक चार वाजता प्रस्थान झाले. श्री अंबिका माता संस्थान येथे चहापाणी झाल्यानंतर पालखी पुढे मिर्झापूरकडे रवाना झाली.
आई रुक्मिणी मातेच्या पालखीला निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो वारकरी, भाविक आले होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात, मातेच्या आणि संत सद्गुरू सदाराम महाराजांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात सत्यनारायण चांडक, सरपंच प्रेमदास राठोड, राजू काका ठाकूर, सभापती कल्पनाताई किशोर दिवे, उपसभापती रोशनीताई मुकुंदराव पुणसे, संदीप भाऊ आमले, संजू दादा चौधरी, नायब तहसीलदार नागरे, गटविकास अधिकारी रवीराज देशमुख, अभिषेक कासोदे आदींसह पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील सर्वात पहिली पालखी म्हणून माता रुक्मिणीच्या या पालखी सोहळ्याची ओळख आहे. पायी प्रवास करून ही पालखी १४ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या या पालखीला विशेष मान असतो. आज येथे मुसळधार पावसातही शेकडो भाविक टाळ, मृदंगाच्या गजरात प्रचंड उत्साहात प्रस्थान सोहळ्यात दंग झाले होते. वाटेत ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात येत आहे.
कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र
तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर हे विदर्भातील पुरातन तीर्थक्षेत्र आहे. हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतींचे माहेर आहे. प्रभू श्री रामचंद्राची आजी, राजा दशरथाची आई इंदुमती, अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा, भगीरथ राजाची माता केशिनी आणि नल राजाची राणी दमयंती, तसेच चौरंगीनाथाचे हे जन्मस्थान आहे. हे पुरातन तीर्थक्षेत्र श्री रुक्मिणी मातेचे जन्मस्थानही आहे. त्या ठिकाणावर मंदिर उभारलेले आहे. जवळच श्री अंबिका मातेचेही पुरातन मंदिर आहे. याच मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने श्री रुक्मिणी मातेचे हरण केल्याची कथा आहे. श्रीमद् भागवतात तसा उल्लेख आहे.
वशिष्ठा (आजची वर्धा) नदीच्या काठावर असलेल्या या पुरातन क्षेत्रात सुमारे ४५० वर्षापूर्वी श्री संत सदगुरु सदाराम महाराज होऊन गेले. सदाराम महाराजांनी कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी पायी वारी १९५४मध्ये सुरू केली. यंदा या वारीचे ४३०वे वर्ष आहे.
याबाबत एक कथा अशी सांगितली जाते, की वृद्धापकाळामुळे सद्गुरु सदाराम महाराजांना वारी करणे शक्य होईना. तेव्हा त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. त्यावर भगवंताने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की, मी कार्तिक पौर्णिमा आणि प्रतिपदेला श्री क्षेत्र कौंडण्यपुरास येईन. हे वचन देऊन त्यांनी महाराजांना स्वतःच्या प्रतिमा भेट दिल्या. त्या विठ्ठल रुक्मिणी संस्थान कारंजा येथे महाराजांच्या वंशजांकडे आहेत.
संत सदाराम महाराजांनी कारंजा लाड आणि रुक्मिणी मातेचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर या दोन्ही ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर बांधले. त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. या ठिकाणी आषाढी आणि कार्तिक महिन्यात यात्रा भरते. लाखो वारकरी येथे दर्शनास येतात. विदर्भातून अनेक पायदळ दिंड्या येतात आणि प्रतिपदेला दहीहांडी सोहळा होतो. श्री पांडुरंगाचा या ठिकाणी कायम वास असल्याची भक्तांची श्रद्धा आहे.