दोन वर्षांनंतर यात्रेत मोठी गर्दी
पैठण : नाथ षष्ठीच्या निमित्ताने पैठणनगरी आज
श्री एकनाथ महाराजांच्या नावाने दुमदुमून गेली. अनेक दिंड्यांसोबत आलेल्या लाखो वारकऱ्यांनी गोदावरीत स्नान करून नाथबाबांचे दर्शन घेतले. कोरोनाच्या दोन वर्षांनी यात्रा भरल्याने राज्यभरातून आणि परराज्यातूनही आलेल्या भाविक, वारकऱ्यांनी यात्रेसाठी गर्दी केली.
पंढरपूरच्या वारीनंतर पैठणची वारी, यात्रा महत्त्वाची मानली जाते. यात्रेला ४००हून अधिक वर्षांची परंपरा आहे. गोदावरीत स्नान केल्यानंतर भल्या पहाटेपासून नाथ समाधी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
षष्ठी उत्सवासाठी पैठणनगरीत सुमारे ५०० दिंड्या दाखल झाल्या आहेत. तर नाथ समाधी वाड्यात नाथ महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासून लाखो भाविक पहाटेपासून नाथ रांगा लावून उभे होते. आजपासून तीन दिवस हा षष्ठीचा सोहळा चालणार आहे.
अष्टमीला म्हणजेच २५ मार्चला एकनाथ महाराजाच्या पादुकांसमोर महाआरती झाल्यानंतर नाथवंशज गावातून मिरवणूक काढतील. सूर्यास्ताच्या वेळी समाधी मंदिरात नाथवंशजांच्या हस्ते लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत काला दहिहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता होईल. पैठण येथील नाथषष्ठी यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळानेही जादा गाड्या सोडल्या आहेत.