निंदा, वैर, क्रोध दूर ठेवण्याचा
संदेश देणारी जया एकादशी
पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या वर्षभरात ४ वाऱ्या होतात. आषाढी वारी ही संत ज्ञानेश्वर माऊलींची, कार्तिकी वारी भानुदास महाराजांची, चैत्री वारी संत चोखोबा महाराजांची, तर माघी वारी ही संत तुकाराम महाराजांची असते,असे वारकरी मानतात. यापैकी माघ वारी आजच्या जया एकादशीच्या दिवशी असते. सुमारे २ लाख वारकरी यानिमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या वारीच्या गर्दीवर मर्यादा आल्या आहेत.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी साजरी केली जाते, तिला जया एकादशी असं म्हणतात. भाविक-भक्तांत जया एकादशीचे व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे.
जया एकादशीला भक्त विशेषत: भगवान विष्णू आणि श्री कृष्णाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप-कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. या दिवशी पूजेच्या वेळी जया एकादशी व्रत कथेचे विशेष पठण केले जाते. जया एकादशीच्या व्रताने दुःख, दारिद्र्य दूर होऊन धनलाभ, संपन्नता, समृद्धी प्राप्त होते, असं सांगतात. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जया एकादशीचे व्रत सांगितले होते, अशी आख्यायिका आहे.
आजच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाला फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास भजन-कीर्तन करून हरिनाम घ्यावे. कोणाची निंदा करू नये आणि मनात वैर किंवा क्रोध भाव आणू नये, अशी शिकवण आपल्या संतांनी दिली आहे. ती या उपवासाच्या दिवशीदेखील आचरणात आणावी, अशी या एकादशीचा संदेश आहे. पंचांगानुसार दर महिन्यात दोन एकादशी येतात. त्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशीची नावे वेगवेगळी असतात. तर, अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशींचे नाव एकच आहे.
शुक्ल पक्षातील एकादशी : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी. कृष्ण पक्षातील एकादशी : वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्तिला, विजया आणि पापमोचनी.
अधिक मास : कमला एकादशी
लवकरच आपल्या सेवेत येत आहे-
www.dnyanbatukaram.com