सर्व स्त्री संतांचे अभंग
एकत्रित असणारी गाथा
महिला स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष केला तो वारकरी चळवळीने. वारकरी संतांनी अधिकार दिल्याने अनेक महिला संत घडल्या. या महिला संतांच्या अभंगरचना एकत्रित करून त्या ‘सकल स्त्री संत गाथा’ नावाने संपादित करण्याचे काम प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी केले आहे. सोबत या गाथेत डॉ. मोहिते यांनी लिहिलेल्या मनोगताचा सारांश देत आहोत. त्याचप्रमाणे डॉ. मोहिते यांनी व्हिडिओमधून या गाथानिर्मितीची कहाणी सांगितली आहे. तोही सोबत देत आहोत…
इसवीसन तेराव्या शतकापासून सतराव्या-आठराव्या शतकापर्यंत पाचशे वर्षांत वारकरी संप्रदायामध्ये ज्ञात पंधरा ते सोळा स्त्री संत होऊन गेल्या. सर्वांनी विठ्ठलाच्या सहवासात राहून भक्तीत एकरूप होऊन अभंगरचना केल्या आहेत. अभंग, पदे, ओवी अनेक श्लोक स्वरूपात आज त्या रचना वेगवेगळ्या अभंग गाथेत पद्य स्वरूपात पाहवयास मिळतात. अनेक स्त्री संतांची रचना एका अभंगापासून शेकडो अभंगांपर्यंत आहेत. अर्थात काळाच्या पडद्याआड अनेक रचना नाहिशा झालेल्या आहेत.
देशभर स्त्री संतांची चळवळ
काश्मीरच्या संत लल्लापासून अवैयार-आंदाळपर्यंत आणि बंगालमधील चंडावती ते महाराष्ट्राच्या संत मुक्ताबाई व बहेणाबाईपर्यंतच्या कालखंडातील संत स्त्रियांच्या पारमार्थिक प्रवासाची विस्ताराने मांडणी केली तर प्रत्येक स्त्री संतांना स्वत:च्या आयुष्यात संघर्ष अटळच ठरलेला आहे. तो संघर्ष स्वतःचा स्वतःशी असेल, आई-वडील, सासू-सासरे, पती यांच्याशी असेल; पण त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. या संघर्षाचे प्रतिबिंब त्यांच्या रचनेमध्ये पडलेले आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र त्यांनी आध्यात्मिक प्रवासात परतत्त्वाच्या प्राप्तीसाठी असणारी तळमळ, अस्वस्थता, आत्मसाक्षात्कार व आनंदप्राप्तीचा उच्चार केला आहे. स्त्री संतांनी लौकिक करून जातीपातीतील विषमता बाजूला केल्या. संत बहेणाईने (उच्चकुलीन स्त्रीने) सामाजिक व्यवस्थेत कनिष्ठ समजल्या गेलेल्या तुकारामांना गुरू केले.
रचनांमध्ये दाटली आहेत अबोल दुःखे
स्त्री संतांच्या रचनांमध्ये अनेकदा अबोल दुःख दाटलेली दिसतात. समाजाने स्त्रीवर लादलेले सर्व निर्बंध, त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांची होणारी व अवहेलना त्यांनी बाजूला सारली आहे. देवाची भक्ती करताना संतांनी पत्नीची भूमिका जशी स्वीकारली, वेसवापणही स्वीकारले आहे. या सर्वांचे त्यांच्या अंत:करणातील आत्मशोधाच्या संदर्भात मोठे आहे. स्त्री संतांनी सामाजिक नैतिकतेच्या बाबतीत एक प्रकारचे बंडच केले. सामाजिक बंधने अनेकदा झुगारून थेट स्वैरपणाची भूमिका स्वीकारलेली आहे. त्या स्वत:शी बोलायला लागल्या आणि निर्भयतेची भूमिका मुक्तपणे मांडत गेल्या. “जनी म्हणे मी झाले वेसवा। रिघाले केशवा घर तुझे॥” स्वतःचे वेसवापण, स्पष्टतेने अभिमानाने भर बाजारात सांगितले. समाजातील लोकनिंदेला न जुमानता त्यांनी आपला निर्धार प्रगट केला. काही स्त्री संतांनी असा निर्धार मुक्तपणे व्यक्त केला आहे.
वैष्णव संप्रदायाची परंपरा ही सामाजिक समतेच्या पायावर उभी आहे. संप्रदायात स्त्री-पुरुष समता व समानता ही पायाभूत मानली जाते. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन काळापासून पेशव्यांच्या अखेरच्या कालखंडापर्यंतच्या संतांनी स्त्री संतांचा बहुमान, आदराची भावना व्यक्त केली आहे. त्यांना समानतेचे स्थान प्राप्त करून दिले आहे. अर्थात सर्व संतांचा पारमार्थिक प्रभाव प्रत्येक कालखंडात स्त्री संतावर झालेला आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील स्त्रीया लिहित्या झाल्या, विठ्ठलभक्तीत कीर्तनात उभ्या राहू लागल्या, अभंग पाठा होवू लागला. पांडुरंगाच्या भक्तीत एकरूप होऊन आत्मसाक्षात्कारी झाल्या. पददलित स्त्रीया भक्तीच्या बळावर ईश्वरानुभूती व्यक्त करू लागल्या.
भक्तीच्या बळावर मिळाला अधिकार
स्त्री संतांचे जीवन, त्यांची सामाजिक परिस्थिती, परस्पर भिन्न स्वरूपाची होती, संत मुक्ताबाई, जनाबाई, नागरी, गोणाई, सोयराबाई किंवा कान्होपात्रा, बहेणाई, वेगवेगळ्या काळातील स्त्री संत, पण यांच्यामध्ये समान सूत्र होती, ती म्हणजे विठ्ठलाच्या सामर्थ्याचा अनुभव भक्ती किंवा त्याचा येणारा प्रभावी प्रत्यय व विरक्ती हा सर्वांना आधार होता, हीच त्यांच्या अभंगरचनेमागील प्रेरणा होती. शेवटी विठ्ठलाची अंतर्यामी भेट हीच त्यांची अखेरची पूर्तता होती. ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव तुकाराम’ या नामघोषात मुक्ताबाईंना वैष्णवांच्या मेळ्यात असाधारण स्थान प्राप्त झालेले होते. या प्रकारचे श्रेष्ठत्व इतर स्त्री संतांच्या वाट्याला फारसे आले नाही. संत मुक्ताबाईंचा अधिकारच मोठा होता. म्हणूनच ‘तुम्ही तरूनि विश्वतारा।’ हा प्रत्यक्ष वडील बंधु संत ज्ञानदेवांना दिलेल्या आधारावरून सांगता येईल.
स्त्री संतांच्या गुरुपदास मान्यता
मध्ययुगीन महाराष्ट्रात वैष्णव संप्रदायाने समाजाला पुरोगामी विचार दिला आहे. या पंथाने सर्वानुमते समाजातील स्त्रियांना गुरूपदास (संत मुक्ताबाई, संत बहेणाई) संतपदास मान्यता दिली आहे. त्या-त्या समकालीन संताच्या प्रभावाने स्त्री संतांना बोलते केले. म्हणून की काय, स्त्री संतांनी लिहिलेला अभंग त्यामधील विचारांचे अधिष्ठान समाजाने स्वीकारले पण त्यापुढे जाऊन सांगता की, श्रुतिस्मृती शास्त्र प्रमाण म्हणून समतेचा विचार सर्वदूर आहे, भगव्या पताकाखालची समताधिष्ठतेची प्रचंड मोठी क्रांती होय. ज्या काळात संत चोखोबांची पत्नी व बहीण संत सोयराबाई, संत निर्मळा जन्माला आल्या किंवा संत बहेणाईचा जन्म झाला. तो काळ म्हणजे पती निधनानंतर स्त्रियांना सहगमन जबरदस्तीने किंवा स्वेच्छेने जावे लागे. प्रत्येक कुटुंबातून तो स्त्रियांचा बळीच होता. नंतरच्या काळात महिन्यातून केशवपन सक्तीचे होते, ही विटंबनाच होती. अश्रूला वाट करून देणं हा मुक आक्रोश होता. स्त्रियांची मने आणि देह मरण यातना भोगायचे. घरातल्या चार भिंतीच्या आत दाबलेले श्वास दडवले जात होते. त्या त्या काळात स्त्रीची सुटका, म्हणजे कोंडलेल्या मनाला धार्मिक समानतेच्या पंथ चळवळीत स्वत:ला सामील करून घेणे. लौकिक जीवनातून बाहेर पडून परमार्थाचा पद पथ स्वीकारणे, हे सगळं संत स्त्रियांची चरित्रे सांगतात. संत स्त्रीने आपल्या जीवन प्रवासात सद्गुरूने दिलेल्या पारमार्थिक प्रकाशात पहिले पाऊल टाकलेले दिसते.
सद्गुरूने दिलेला आध्यात्मिक अनुभव स्वतःभोवती असलेल्या समाजापर्यंत त्यांनी पोहोचविला. उदा. संत मुक्ताबाईंनी ज्ञानदेवादी भावंडांसमवेत राहून पारमार्थिक ज्ञानाची दिशा शोधली. पंथ प्रचार केला. संत नामदेवांचा संत मुक्ताबाईने केलेला गर्वपरिहार हे पंथामध्ये गुरूतत्त्वाचे महत्त्व पटवून देणारे उदाहरण आहे. चौदाशे वर्षांच्या चांगदेवांसारख्या हटयोग्यास ज्ञानाची दिशा दाखवून त्यांचे खडखडीत डोळे उघडून गुरूपद सिद्ध केले. तसे संत जनाबाईंचे पारमार्थिक कार्यक्षेत्र मर्यादित होते. पंढरीच्या आषाढी-कार्तिक वारीमध्ये संत संग जो लाभला तो त्यांच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण ठरला. संत नामदेवांचा सहवास म्हणजे भक्तीचा अमोल ठेवा ठरावा. कारण त्यामुळे संत जनाबाईंस ‘धन सापडले विटेवरी’ ही त्यांची स्त्री म्हणून आत्मबल वाढविणारी घटना आहे.
समतेचा झेंडा मलीन होतो आहे
पण आज संत ज्ञानदेव-नामदेव किंवा संत तुकारामकालीन वारकऱ्यांनी मांडलेला स्त्री-पुरुष समतेचा भगवा झेंडा मलीन होत चालला आहे. संतांच्या साहित्यातील विचारात स्त्री-शुद्र समानता, उदारमतवाद, सहृदयता, लोकाभिमुख वृत्ती त्या काळातील महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, महात्मा फुले, आगरकर, न्या. रानडे, भांडारकर यांसारख्या समाजसुधारकांना अधिक जवळच्या, स्फुर्ती देणाऱ्या वाटल्या. संतांनी उभारलेल्या चळवळीतील विचार त्यांना स्वीकारावेसे वाटले. संतांच्या विचारांनी प्रभावीत होऊन स्त्री सुधारणेचे नवे व्रत अव्वल इंग्रजांच्या काळात सुधारकांनी अंगिकारले. आज पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील स्त्री संतांना व वारकरी स्त्रियांना परंपरेत का अडकवले आहे?
या पार्श्वभूमीवर स्त्री संतांचे श्रेष्ठत्व सर्वमान्य झाले आहे, परंतु आज वारकरी परंपरेमध्ये प्रवचन, कीर्तन सेवेपासून वारकरी स्त्रीला वंचित रहावे लागत आहे. बृह्ममहाराष्ट्रातून दरवर्षी अनेक संतांच्या, स्त्री संतांच्या पालखी सोहळे आषाढी कार्तिकीस आद्यलोकदैवत श्रीविठ्ठल यांच्या दर्शनासाठी पंढरीनगरीत जात असतात. पालखी सोहळ्यात अनेक मानाचे फडकरी, दिंडीकर, ज्येष्ठ कीर्तनकारांची कीर्तन सेवा वारकरी परंपरेनुसार फडावर, विसाव्यावर, तळावर किंवा प्रस्थानापूर्वी संतांच्या समाधी स्थळावरील व्यासपीठावर होत असतात. संत श्रीज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम व निळोबाराय यांचे अभंग कीर्तनात निरुपणासाठी परंपरेप्रमाणे घेतले जातात. पुरुष वारकरी कीर्तनकार व टाळकरी असतात. स्त्रिया कीर्तनकारांच्या समोर श्रोते म्हणून श्रवणभक्ती करीत असतात. अशा या वारीत भक्तीमय वातावरणात दिंड्यातून अनेक स्त्री-पुरुष वारकरी सोहळा अनुभवित ‘ज्ञानबा तुकाराम’चा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या निनादात पताका खांद्यावर घेऊन चालतात.
इच्छा असूनही करता येत नाही कीर्तन
अनेक वारकरी स्त्रियांना इच्छा असूनही कीर्तन सेवा करता येत नाही. की ज्या स्त्रिया पंथ परंपरा पाळणाऱ्या आहेत. सद्वर्तनी, सुचित्त्व, पावित्र्य राखणाऱ्या, शुद्ध आचरण करणाऱ्या भक्तीच्या अनुभूतीचा आविष्कार असणाऱ्या आहेत. संत साहित्याच्या अभ्यासू, निष्ठावान, अभंगाच्या पारंपरिक उत्तम चाली धरून गाणाऱ्या असतात, तरीही त्यांना वारकऱ्यांच्या व्यासपीठावर कीर्तन सेवा करता येत नाही; पण ज्या स्त्रियांच्या मालकीच्या दिंड्या आहेत, त्यांनाच कीर्तन, प्रवचनाची सेवा करता येते, अनेक स्त्री कीर्तनकारांना या सेवेपासून दूर रहावे लागते. दादामहाराज सातारकर फडावर स्त्रीला टाळकरी म्हणून उभे राहण्यास परवानगी आहे. अर्थात यांसारखे काही अपवाद आहेत. पूर्वी परंपरा पाळणाऱ्या ह.भ.प. मीराबाई मनमाडकर, ह.भ.प. मिराबाई सूर्यवंशी यांची कीर्तनसेवा होत असे. आज परंपरेचे कारण सांगून स्त्री कीर्तनकारांना बाजूला ठेवले जाते.
स्त्री-पुरुष भेद का?
महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्र आहेत की, तेथे स्त्री कीर्तनकारांना किती व्यासपीठ उपलब्ध असते? किती कीर्तनामध्ये अभंग म्हणण्याची संधी मिळते? वारकरी संप्रदायातील स्त्री संतांचा अभंग कीर्तनात निरुपणासाठी निवडला जातो? किती स्त्री संताच्या अभंगातील प्रमाणं उचलली जातात? अभंगातील किती चरणं, प्रतिमा, प्रतिके उदाहरणातून परमार्थ विषद केला जातो? गावोगावी हरिनाम सप्ताह होतात, यामध्ये किती स्त्रियांना सहभागी करून घेतले जाते? कीर्तनात किती स्त्रियांना टाळकरी म्हणून उभे राहण्यास परवानगी आहे?
कीर्तन ही परंपरा साधारण भजनीपद्धतीच्या चालीची असते. सर्व संतांचे अभंग, आरत्या, पदे, ओव्या, पाळणे, स्तोत्रे याचा सरळपणे तत्त्व सांगता सांगता गायिकेतून उपयोग केला जातो. स्त्रियांना अभंग म्हणण्यासाठी, चाल उचलण्यासाठी किती संधी दिली जाते? याचा विचार संप्रदायाच्या परंपरेत होणे आवश्यक आहे. आज दूरचित्रवाणीवरून अनेक स्त्रियांना कीर्तन सादर करण्याची संधी काही प्रमाणात दिली जात आहे. ही समाधानाची बाब आहे. कारण कीर्तन परंपरा ही संप्रदायाचा विचार व्यक्त करण्याचे प्रमाणभूत असे पवित्र व्यासपीठ आहे, ते व्यासपीठ सर्वांसाठी खुले राहिले पाहिजे. स्त्री-पुरुष भेद का?
– डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते