ॲड. रंगनाथ महाराज पितळे
यांचे मेहकर येथे गुरूपूजन
मेहकर : संत श्री बाळाभाऊ महाराज ऊर्फ श्वासानंद माऊली यांच्या परंपरेचा गुरुपौर्णिमा उत्सव दरवर्षीप्रमाणे असंख्य गुरुभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. या परंपरेचे विद्यमान पीठाधीश सद्गुरू ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांचे यावेळी भक्तगणांच्या वतीने गुरुपूजन करण्यात आले.
१३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विश्रांती मठावर पितळे महाराज यांच्या हस्ते वंदनीय आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज यांच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. गुरुभक्त सुमित सिंदखेडकर यांनी पौरोहित्य केले. भाविकांनी परंपरेच्या अधिष्ठान ग्रंथाचे यावेळी पारायण केले. सामुदायिक उपासना आणि नामजप झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व भक्तगणांनी सद्गुरू ॲड. रंगनाथ महाराज पितळे आणि आईसाहेब पितळे यांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतला.
याप्रसंगी गुरुभक्तांना मार्गदर्शन करताना ॲड. पितळे महाराज यांनी, गुरुपौर्णिमा हे चातुर्मास सुरू झाल्यानंतरचे पहिले पर्व आहे, असे सांगून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. आपल्या परंपरेला सर्वश्री आनंदी आत्मानंद महाराज, सदानंद महाराज, आनंदीमाई, बाळाभाऊ महाराज ऊर्फ श्वासानंद माऊली, दत्तात्रय महाराज, दिगंबर महाराज या थोर महात्म्यांचा प्रसादस्पर्श लाभला असल्याचे सांगितले.
तसेच त्यांनी दाखविलेल्या परमार्थ मार्गाचे आपल्या जीवनात सर्व भक्तांनी जर अनुसरण केले तरच आपल्यावर गुरुकृपा होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. आशीर्वचनानंतर सर्व गुरुभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या उत्सवाला बुलडाणा, जालना, जळगाव खान्देश, वाशिम, औरंगाबाद, पुणे यासह महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून गुरुभक्तांनी उपस्थिती दर्शवली.
कोण होते बाळाभाऊ महाराज?
संत श्री बाळाभाऊ महाराज यांचा जन्म १८८८ मध्ये मेहकर येथे झाला. पंढरपूरला जाणारी पहिली दिंडी संत श्री बाळाभाऊ महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली.
त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, समरसता, दिंड्या, धर्मशुद्धी, गायत्री मंत्र सर्वांसाठी खुला करणे, नामसप्ताह यात पुढाकार घेतला.
अष्टगंध लावण्याची परंपरा
श्री बाळाभाऊ महाराज यांनी सुरू केली. त्यांनी ज्ञानमंदिर हंस संप्रदायाचे गुरुपीठ स्थापन केले, असे संत श्री बाळाभाऊ महाराज यांचे ४ थे वंशज प्रा. डॉ. श्रीहरी पितळे यांनी सांगितले. संत श्री बाळाभाऊ महाराज यांना न्हावा, जि. जालना येथील आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज यांची गुरुदीक्षा मिळाली. गुरुदीक्षा मिळाल्यानंतर संत श्री बाळाभाऊ महाराज यांनी नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम असणारा हंस संप्रदाय रूढ केला.
४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो नामसप्ताह यज्ञ सोहळे आयोजित करून प्रत्येक चातुर्मासात पंढरपूरची पायी वारी हजारो वारकऱ्यांना घडवली. समाज परिवर्तनासाठी संत श्री बाळाभाऊ महाराज यांनी लक्षणीय कार्य केले. त्यांनी वाराणसी अर्थात काशी येथे १९३० मध्ये संजीवन समाधी घेतली. ज्ञानमंदिर परिसर मेहकर येथून प्रस्थान ठेवणारी पितळे महाराजांची दिंडी विदर्भातील ही पहिली दिंडी असून यात जवळपास शंभर वारकऱ्यांचा समावेश असतो. ही दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहचते. विद्यमान हंस संप्रदायाच्या गुरूपीठाच्या गादीवर ॲड. रंगनाथ महाराज पितळे ऊर्फ बाबासाहेब हे विराजमान आहेत.