संतांना निरोप दिल्यानंतर

पंढरपुरात वारीची सांगता

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात कुंकू बुक्क्यासह लाह्यांची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत आज (दि. १४ जुलै) महाव्दार काल्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. या दहीहंडीनंतर पंढरपुरातील आषाढी वारीची सांगता झाली.

हरिदास घराण्यातील परंपरा
येथील हरिदास घराण्यात सुमारे ४०० वर्षांपूर्वी संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या घराण्यात या खडावा डोक्यावर घेऊन काला करण्याची परंपरा आहे. सभामंडप येथे काल्याचे मानकरी असणाऱ्या ह. भ. प. मदन महाराज हरिदास यांनी खांद्यावर पादुका घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यानंतर काल्याचा अभंग म्हणत दहीहंडी फोडली गेली.

हंडीतील काला भाविकांना वाटण्यात आला. मंदिरातून हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदीवर गेला येथे नदीचे पाणी पादुकांवर अर्पण केले. यानंतर कुंभार घाटमार्गे माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून हा सोहळा वाड्यात विसावला. उपस्थित असलेल्या हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला.

संतांच्या काल्यानंतर देवाचा काला
संतांचा काला पौर्णिमेला होतो. संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला म्हणजे आज (दि. १४ जुलै) हा देवाचा अर्थात महाद्वार काला झाला. या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवाचे एक सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहेत. या पादुका हरिदास वेशीपाशी हरिदासांच्या ज्या वाड्यामध्ये असतात, त्याला काल्याचा वाडा असे म्हणतात.

महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामधे या पादुका मानकरी हरिदास यांच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात. पादुका डोक्यावर बांधताच त्यांची शुद्ध हरपते. पूर्वी नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते. त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात. ही काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते. तेथे देवासमोरील सभामंडपामध्ये या पादुकांवर हंडी फोडली जाते.

नामदास महाराज हरिदासांना घेतात खांद्यावर
नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते. तेथून महाद्वार घाटाने खाली चंद्रभागेवर आणि तेथून खाजगीवाले वाडा (आताची माहेश्वरी धर्मशाळा) या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते. मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादुकांवर दही, लाह्या उधळतात. पूर्ण मार्गामध्ये नमदास मंडळी आळीपाळीने हरिदासांना आपल्या खांद्यावर उचलून घेतात. दिंडी काल्याच्या वाड्यात परत आल्यावर आरती होते आणि या उत्सवाची सांगता होते. महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली.

हरिदास आणि पादुकांची कथा
विठूरायाच्या सात सेवाधाऱ्यांपैकी हरिदास हे एक सेवाधारी आहेत. मंदिरात देवासमोर अभंग गायन करणे, कीर्तन करणे, आरती म्हणणे, टाळ वाजविणे अशी सेवा हरिदास घराण्याकडे शेकडो वर्षांपासून आहे. या हरिदास घराण्यात पांडुरंग महाराज म्हणून एक संत होऊन गेले. त्यांनी आपल्या भक्तीने विठुरायाला प्रसन्न करून त्यांच्या पादुका प्रसाद म्हणून प्राप्त केल्या. देवानेच आषाढी, कार्तिकीस या पादुका डोक्यावर धारण करून काल्याचा उत्सव करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पांडुरंग महाराजांनी डोक्यावर पादुका घेऊन काल्याचा उत्सव सुरू केला, अशी कथा सांगितली जाते.

काल्याच्या दिवशी या पादुका काल्याचे मानकरी असणाऱ्या हरिदास घराण्यातील महाराजांच्या मस्तकावर शंभर फुटी पागोट्याने बांधल्या जातात. पादुका महाराजांच्या मस्तकावर ठेवताच त्यांना समाधी अवस्था प्राप्त होतो. यावेळी संत नामदेव महाराजांच्या वंशजांना देखील मान आहे. नामदास महाराज यांची दिंडी दाखल झाल्यावरच काल्याचा उत्सव सुरू होतो.

पादुका धारण करणाऱ्या महाराजांना समाधी अवस्थेत खांद्यावर घेऊनच नामदास श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सभामंडपात पाच प्रदक्षिणा मारतात. यानंतर काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडली जाते. मंदिरातून महाराजांना खांद्यावरच घेऊन महाव्दार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात नदीचे पाणी अर्पण केले जाते. पुढे कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळेत हांडी फोडून आराध्ये गल्ली, हरिदास वेस या मार्गाने हा उत्सव पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल होतो.

येथे महाराजांच्या मस्तकावरून पादुका काढल्यावर विठू नामाचा गजर होतो आणि ते समाधी अवस्थेतून बाहेर येतात. या नंतर हजारो भक्तांना काल्याचा प्रसाद वाटला जातो. काल्याचा उत्सव रस्त्यावरून जाताना कुंकू, बुक्का, लाह्या, दही, दूध आदींची उधळण केली जाते. सध्या या गादीवर मदन महाराज हरिदास हे असून त्यांची ही दहावी पिढी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *