मानवतेची शिकवण देणारे

विदर्भातील संत कोलबा स्वामी

विणकर समाजाचे आराध्य दैवत असलेले संत श्री कोलबा स्वामी यांचे जीवन म्हणजे विठ्ठल भक्ती, जातपात विरहित सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाची शिकवण यांचा आदर्श आहे. संत श्री कोलबा स्वामी हे साधारणपणे ३०० वर्षांपूर्वी विदर्भात होऊन गेले. त्यांची भक्ती पाहून पंढरपूरहून श्री विठ्ठलच त्यांना भेटण्यासाठी आला, अशी आख्यायिका आहे. त्या ठिकाणी त्यांनी मंदिर उभारले. त्यामुळे विदर्भात जणू पंढरपूरच अवतरले. विदर्भाला असे पंढरपूरचे रूप देणारे कोलबा स्वामी यांची आज जयंती.

रोजचे काम म्हणजेच विठ्ठलभक्ती

श्रीसंत कोलबास्वामी महाराज हे निस्सीम विठ्ठलभक्त होते. ते मूळचे उमरेड तालुक्‍यातील बेला गावचे होते. ते वीणकामाचा व्यवसाय करायचे. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. आपलं काम हाच विठ्ठल हाच त्यांचा मूलमंत्र होता. मात्र, एकदा त्यांच्या पत्नीने पंढरपूर येथे जाण्याचा हट्ट केला. त्यावर कोलबास्वामी यांनी तशी तयारीदेखील केली. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला आणि श्री विठ्ठलच त्यांना धापेवाडा येथे भेटायला आला, असे सांगितले जाते. मग निर्जला एकादशीचा मुहूर्त साधून त्यांनी तिथे विठ्ठल-रक्‍मिणी मूर्तीची स्थापना केली. या घटनेला आता जवळपास ३०० वर्षे होत आहेत. तेव्हापासून आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

वसंतपंचमीचे महत्त्व
श्रीसंत कोलबास्वामी महाराज हे धापेवाडा इथं आल्यानंतर त्यांना गुरू रंगारी महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनीच कोलबास्वामी यांना उपदेश दिला. पुढे गुरू रंगारी महाराज आदासा येथे गेले आणि तेथून लुप्त झाले. तो दिवस पुण्यतिथीचा मानून कोलबास्वामी महाराज यांनी वसंतपंचमी हा गुरूची पुण्यतिथी म्हणून साजरी करण्याचे ठरवले. सुमारे तीन दशकांपासून ही प्रथा सुरू आहे. या उत्सवानिमित्त येणारे भाविक आधी विठ्ठल-रुक्‍मिणी आणि नंतर श्रीसंत कोलबा स्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतात. किमान ३० हजार भाविक यावेळी दर्शनासाठी गर्दी करतात. आधी म्हटल्याप्रमाणे आयुष्यात कधीही पंढरपूरला न गेलेल्या कोलबा स्वामी यांनी त्या काळात सामान्य-भाबड्या माणसाला परमार्थाचे वेड लावले. त्याच्यात भक्‍तीभाव रुजवला. विदर्भातही पंढरी निर्माण केली. अशा या थोर संतांच्या चरणी जयंतीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *