श्री गजानन महाराज यांच्या
पालखीचे शेगावात स्वागत
शेगाव : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेली संत श्री गजानन महाराजांची पालखी दोन महिन्यानंतर संतनगरी शेगावात दाखल झाली. ७०० वारकरी आणि १३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून ‘श्रीं’ची पालखी संतनगरीत परतली. अतिशय नयनरम्य सोहळ्यात लाखो भाविकांनी केलेल्या जयघोषामुळे संतनगरीतील वातावरण भक्तिमय झाले होते.
हलक्या पावसाच्या सरी, टाळ-मृदंगाचा निनाद, ‘माऊली गजानन महाराज, ज्ञानोबा, तुकारामांचा अखंड जयघोष… विविध वाद्यांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या, अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. पंढरपुरात १२ जुलैपर्यंत मुक्काम केल्यावर पालखीने १३ जुलै रोजी शेगावकडे प्रवास सुरू केला. बुधवारी शेगावातील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आगमन होताच ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
पालखी आगमनामुळे खामगाव-शेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. खामगावातून पालखीसोबत दीड लाखाच्यावर भाविक सहभागी झाले होते. या वारीत युवकांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. श्री गजानन महाराज वाटिका येथे विश्वस्तांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यानंतर पालखीने मंदिराकडे प्रस्थान केले.
शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत पालखी मंदिरात दाखल झाली. यावेळी ‘गण गण गणांत बोते’च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला होता. त्यानंतर पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री-पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले होते. सर्वत्र भाविकांची मांदियाळी दिसून येत होती. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
रिंगण सोहळा आणि महाआरती
‘श्रीं’ची पालखी नगरपरिक्रमा करून सायंकाळी मंदिरात दाखल झाली. वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या तालावर ‘श्रीं’, विठ्ठल व ज्ञानोबा तुकाराम नामाचा नामघोष करीत पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे यंदाचे ५३ वे वर्ष होते. आकर्षक रिंगण सोहळ्यानंतर ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याची महाआरतीने सांगता झाली.
संस्थानद्वारे श्री गजानन महाराज वाटिका येथे ५० हजारांवर, तर मंदिरामध्ये ७० हजारांच्यावर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने पाणी, चहा, फराळाचे वाटप करण्यात आले. वर्धा, नाशिक, पुणे, खामगाव या ठिकाणाहून आलेल्या सेवाभावी संस्थांच्या वतीने संपूर्ण पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.