माऊलींसह दोघा बंधूंना
मुक्ताईने बांधली राखी
मुक्ताईनगर : भावाबहिणीच्या प्रेमाचा सण असलेल्या आजच्या (दि. ११ ऑगस्ट) राखी पौर्णिमेनिमित्त संत मुक्ताबाईंनी आपल्या तिघाही बंधूंना प्रेमाची राखी बांधली. अर्थात जळगावातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानाच्या वतीने त्र्यंबकेश्वर,आळंदी, सासवड या समाधी स्थळांवर जाऊन राख्या अर्पण करण्यात आल्या.
संत परंपरेत संत मुक्ताबाईंना आद्य महिला संत असे संबोधले जाते. त्यांची समाधी जळगावातील मुक्ताईनगर येथे आहे. तेथील संस्थानातर्फे आळंदीला संत ज्ञानदेव, त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथ, सासवडला संत सोपानदेव यांना बांधण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही राखी पाठविण्यात आली.
मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र यांनी या रक्षाबंधनासाठी सर्व तीर्थक्षेत्रांना आपला विशेष प्रतिनिधी पाठवला. तर स्वतः आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जाऊन मुक्ताईतर्फे माऊलींना राखी बांधली. यावेळी अंकिता पाटील, विशाल महाराज खोले, सागर महाराज लाहूडकार, दिपक महाराज, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पत्रकार राजेंद्र कापसे आणि भाविक हजर होते.
त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्यासाठी मुक्ताई संस्थानचे विश्वस्त सम्राट पाटील राखी घेऊन गेले. पुजारी ह. भ. प. जयंत महाराज गोसावी यांच्याकडे विधीवत पूजन करून त्यांनी राखी सुपूर्द केली.