पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त
इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान
आळंदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने १५ दिवस चालणाऱ्या सेवा सप्ताहात आळंदीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी आज (दि. १४ सप्टेंबर) श्री क्षेत्र आळंदी येथे दिली. खेड मतदार संघाच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी मंत्री रेणुकासिंह आल्या आहेत.
पहिल्याच दिवशी त्यांनी आळंदीत येऊन श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी गोपाळपुरा येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात वारकरी संप्रदायातील मंडळींशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमासाठी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुती महाराज कुरेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, पंडीत कल्याणजी गायकवाड, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, नामदेव महाराज चव्हाण, संग्रामबापू भंडारे, प्रशांत महाराज मोरे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, अध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, आदी उपस्थित होते. यावेळी रेणुका सिंह यांनी तीर्थक्षेत्र विकास आणि वारकऱ्यांच्या अडीअडचणींबाबतचे अनेक विषय समजावून घेतले.
इंद्रायणी नदी प्रदूषण, दर्शनबारी, पालखी महामार्ग असे असे अनेक विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती यावेळी त्यांना वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली. तत्पूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर रेणुका सिंह यांचे देवस्थानच्या वतीने उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक, महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी स्वागत करून सत्कार केला.
वारकरी प्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही रेणुका सिंह म्हणाल्या. यावेळी त्यांनी ज्ञानेश्वरी मंदिराच्या कामाला आर्थिक मदतही केली. त्यानंतर गोपाळपुरा येथील डांगे पंच धर्मशाळेत त्यांच्या हस्ते वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला.