माऊलींचा ७२६ वा संजीवन
समाधी सोहळा गुरुवारपासून
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा येत्या गुरुवारपासून (दि. १७ नोव्हेंबर) सुरू होणार आहे. या सोहळ्याची बुधवारी (दि. २३) सांगता होणार असून, सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची जोरदार तयारी आळंदीत सुरू झाली आहे.
यावर्षी पाच लाखांपेक्षा अधिक भाविक यात्रेला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. माऊलींच्या या समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातील वारकरी आळंदीत दाखल होऊ लागले आहेत.
वारकऱ्यांना २४ तास आरोग्य सुविधा
भाविकांच्या स्वागतासाठी आळंदी नगरपरिषद सज्ज झाली आहे. यात्राकाळात २४ तास आरोग्य सुविधा, पाणी, वीज देण्यात येणार आहे. इंद्रायणीचे पाणी दूषित असल्यामुळे भामा-आसखेड धरणातील पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. इंद्रायणीकाठी महिला आणि पुरुष भाविकांची स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १४४ ठिकाणी बाथरूमची सुविधा देण्यात आली आहे.
शहरात भाविकांसाठी एकूण ६७८ शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत, तर १८ ठिकाणी ३०० तात्पुरती शौचालये,१४० मुताऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे.
येणाऱ्या भाविकांसाठी फूल, प्रसादाची दुकाने गजबजली आहेत. ठिकठिकाणी तात्पुती दुकाने, हॉटेल्सची उभारणी सुरू आहे. टाळ, वीणा, मृदंग आदी वाद्यांच्या दुरुस्तीची दुकानेही सज्ज झाली आहेत.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात ८ सहायक पोलीस आयुक्त, ५० पोलीस निरीक्षक, १९३ उपनिरीक्षक, १२५० अंमलदार, २५० वाहतूक अंमलदार, ६५० होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या, बीडीडीएसची २ पथके येणार आहेत.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून भाविकांना सूचना दिल्या जाणार आहेत. पोलीस पथके यात्रेत नियमित पेट्रोलिंग करणार आहेत. भाविकांना काही समस्या आल्यास नजीकचे पोलीस मदत केंद्र किंवा ११२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविक, स्थानिकांसाठी पास
आळंदीत प्रवेश करण्यासाठी भाविकांच्या वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा आणि स्थानिकांच्या वाहनांकरिता गुलाबी रंगाचा पास देण्यात येत आहे. या पाससाठी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करावा लागणार आहे. दिनांक २०, २१, २२ तारखेला शहरातील रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी असणार आहे. त्यामुळे स्थानिक आणि भाविकांनी आपली वाहने १९ तारखेच्या आत पार्किंगमध्ये लावावीत आणि ती पुन्हा बाहेर काढू नयेत, असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, यात्राकाळात गुरुवार (दि. १७) ते बुधवार (दि. २३) दरम्यान, भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणीकंद-मरकळ-आळंदी रस्ता बंद असून भाविकांनी दिंड्यांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत आणावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी कळवल्यानुसार दि. १७ ते २३ यादरम्यान आळंदीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकेबंदी असणार आहे.
नाकेबंदी आणि पर्यायी रस्ते –
१) मॅगझीन चौक (पुणे-आळंदी रस्ता) – पुण्याहून येणाऱ्या वाहनांनी दिघी मॅगझीन चौक-भोसरी-मोशी-चाकण मार्गाचा वापर करावा.
२) डुडुळगाव जकात नाका (मोशी-देहू रस्ता) – मोशी-देहू फाटा रस्ता बंद असणार आहे. डुडुळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार आहे. मोशी ते चाकण ते शिक्रापूर हा मार्ग तसेच मोशी भोसरी ते मॅगझीन चौक, दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
३) हनुमानवाडी-इंद्रायणी हॉस्पिटल (चाकण- आळंदी रस्ता) – चाकणकडून (आळंदी फाटा) येणाऱ्या आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटलजवळील आळंदी फाटा, हनुमानवाडी येथे नाकाबंदी करण्यात येणार आहे.
४) धानोरे फाटा (मरकळ- आळंदी रस्ता) – मरकळ रस्त्यावरील वाहनांनी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा. धानोरे फाटा येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द बाह्यवळण मार्गाने चऱ्होली बुद्रुक मार्गे वाहने पुणे येथे जातील. मरकळ औद्योगिक वाहतूक कोयाळी वडगाव घेनंद शेलगाव फाटा चाकण या मार्गे होईल.
५) चऱ्होली बुद्रुक-विश्रांतवाडी (वडगाव घेनंद- आळंदी रस्ता) – अवजड वाहनांना यात्राकाळात या मार्गावर बंदी आहे. लोणीकंद-मरकळ रस्त्यावरील पूल दुरुस्तीच्या कारणास्तव जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांची वाहने या रस्त्याने येणे शक्य नाही. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.