नाथ, वारकरी संप्रदायाचा
समन्वय घालणारा उत्सव
वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला, त्या श्री ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू आणि मोठे बंधू श्री संत निवृत्तीनाथ यांनी नाथ आणि वारकरी संप्रदायाची सांगड घातली.
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती।।
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार।
ज्ञानदेवा सार चोजविले।।
अशी गुरुपरंपरा ज्ञानदेवांनी सांगितली आहे. अशा या नाथांचा मोठा प्रभाव जनमानसावर आहे. विशेषतः मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाचा महिमा गावोगावी गायला जातो.
असाच महिमा आहे, मच्छिंद्रनाथांचा अंशरूपी पुत्र असलेल्या धर्मनाथांचा. त्यांना गुरू गोरक्षनाथांनी दीक्षा दिली. त्यांची मंदिरे गावोगावी आहेत. या धर्मनाथांचा माघ द्वितीयेला म्हणजे आज महाराष्ट्रात सर्वत्र दीक्षा दिन अर्थात बीज उत्सव साजरा होत आहे. या दिवशी दानधर्म करावा असे सांगितले जाते. या दिवशी श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील ३४ वा अध्याय पठण करतात. बीजेनिमित्त घरोघरी ज्वारीच्या पीठाची आंबील, घेवड्याची भाजी, हरबऱ्याच्या घुगऱ्या , मलिदा, वडे, आदी प्रसाद करतात. धर्मनाथांना अनुग्रह दिल्यानंतर हाच प्रसाद गोरक्षनाथांनी उपस्थितांना वाटला होता, अशी कथा आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसरात धर्मनाथ बीज भजन, कीर्तन आदी उपक्रमांतून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गोदावरी नदी काठावर वसलेल्या कोपरगाव येथून सहा किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र धामोरी येथे भगवान गोरक्षनाथांचे मंदिर आणि प्राचीन चिंचवृक्ष आहे. या वृक्षाला मोठे पौराणिक महत्त्व आहे. या वृक्षाला नवनाथांचे प्रतीक असणाऱ्या नऊ फांद्या आहेत. वृक्षाच्या खोडात एक गुहा आहे. असा वृक्ष फक्त वाराणसी येथे असल्याचे गावकरी सांगतात.
धर्मनाथबीज तिथीनिमित्त धामोरी येथे दरवर्षी मोठा उत्सव आयोजित केला जातो. नऊ दिवस नवनाथ ग्रंथाचे सामूहिक पारायण केले जाते. नवव्या दिवशी नाथांच्या प्रतिमेची रथयात्रा काढली जाते. पारायणात सहभागी असलेले साधक यावेळी भिक्षाफेरी काढतात. त्यावेळी प्रत्येक घरी भिक्षा मागून ती एकत्र केली जाते.
त्यानंतर त्याचा काला करून तो महाप्रसाद म्हणून वाटप करण्याची प्रथा अनेक दशकांपासून सुरू आहे. या उत्सव काळात कीर्तन, प्रवचन, भजन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सुमारे पाच हजारांहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे सरपंच जयश्रीताई नारायणराव भाकरे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातीच सोनेवाडी येथेही गोदावरी नदीकाठी दत्तपार येथे गोरक्षनाथांचे तिसरे मंदिर आहे. येथेही धर्मनाथ बीजेनिमित्त भव्य सोहळा आयोजित केला जातो. समाप्तीच्या दिवशी महाप्रसाद आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते, असे गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य सुशांत घोडके यांनी सांगितले.
१९८४ पासून गोरक्षनाथ मंदिरात बीज साजरी केली जाते. येथे सात दिवस पारायणाचे आयोजन केले जाते. सध्या नारायणराव माळशिकारे हे येथील महाराज असून, ते सर्व पूजाविधी आणि कामकाज पाहतात. या गावात धर्मनाथ बीजेनिमित्त लेझीम पथकाच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढली जाते. कोरोनामुळे यात खंड पडला आहे. तरीही, मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव आणि पूजा-विधी केले जातात.
बीजेच्या दिवशी सकाळी होम-हवन त्यानंतर प्रवचन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या सोहळ्यास पंचक्रोशीतून पाच हजारांवर भाविक आवर्जून उपस्थिती लावतात. त्यांच्यासाठी आमटी-भात आणि बुंदी असा महाप्रसाद असतो. पारायण काळात नियमित भजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशी माहिती गावचे पोलीस पाटील दगू मोहन गुडघे यांनी दिली. ते आणि त्यांचे कुटुंबीय नाथांची मनोभावे सेवा करतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.