संत तुकोबारायांनी दिला

वृक्ष संवर्धनाचा संदेश

१९७१ मध्ये युरोपियन कृषी संघटनेच्या २३ व्या महासभेमध्ये ‘जागतिक वन दिवस’ साजरा करण्यास सुरुवात झाली. अर्थात वने आणि पर्यावरणाचे महत्त्व आपल्याला संतांनी शेकडो वर्षे अगोदरच सांगून ठेवले आहे. प्राचीन काळापासून वृक्ष-वेली, डोंगर, नदीनाले, अरण्ये, फळे, फुले, पशु-पक्षी, ऋतूचक्र हे आपल्या आयुष्याचे अपरिहार्य भाग आहेत. या सार्‍या निसर्ग घटकांचा अनुबंध संतांनी आपल्या अभंगवाणीतून मांडला.

निसर्ग नियमांचे काटेकोर पालन केले, तर आपले जगणे निर्भेळ, प्रदूषणरहित होते. शुद्ध हवेचे वातावरण असणे ही आपली मूलभूत गरज आहे. संतांनी निसर्ग नियमांचे पालन केलेच, पण त्याला आपले म्हटले. संत तुकोबारायांनी तर आणखी एक पाऊल पुढे जाऊन वृक्षवेलींना आपले ‘सोयरे’ मानले. त्यांचा अतिशय प्रसिद्ध अभंंग आहे, तो असा –
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें।
पक्षीही सुस्वरे आळविती॥
तेणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष अंगा येत॥
आकाश मंडप प्रार्थवी असान।
रमे तेथे मन क्रीडा करी॥
कथा कमंडलु देह उपचारा।
जाणवितो वारा अवसरु ॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार।
करोनि प्रकार सेवू रुचि॥
तुका म्हणे होय मनासी संवाद।
आपुलाची वाद आपणासी॥
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वृक्ष-वेली, वनात राहणारे पशू आणि सुस्वर कंठाने गाणारे पक्षी हे आमचे सखेसोयरे आहेत. त्यांच्याबरोबरचा एकांतातील सहवास मला आवडतो. इतर कुणी सांसारिक लोक संपर्कात येत नाहीत. त्यामुळे आपल्याला कोणी बरे-वाईट म्हणत नाही. म्हणून कुठलेच गुणदोष अंगाला चिकटत नाहीत. निसर्गाच्या सान्निध्यात जावे, शांत बसावे. वर आकाशाचा मंडप आहे. खाली पृथ्वी हेच आसन आहे. अशा ठिकाणी मन रमतं. आनंदाच्या लहरींत ते बहरून, मोहरून जातं. पाणी पिण्यासाठी एक कमंडलू आणि शरीराच्या औपचारिक गरजांसाठी गोधडी एवढे पुरे आहे. एखादे फळ-मूळ मिळते ते खावे, पण मनाला भोजन आहे हरिकथा कथनाचे. त्याचा विविध अंगांनी विस्तार करून त्यांचे विविध रुचींनी मी सेवन करतो. तिथं आपला आपल्या मनाशी संवाद होतो. आपलाच आपल्याशी वादविवाद होतो.”
या अभंगातून जे वेगवेगळे अनुबंध प्रकट झाले ते असे –
१. वृक्ष-वेलींना सोयरे म्हणजे, जवळचे आप्त मानणे, यातून निसर्गाविषयीची अतिशय उत्कट प्रेमभावना व्यक्त होते.
२. माणसाने एकांतात राहून चिंतन करावे. एकांतवासाने मन शांत होते, निरामय आनंदाची अनुभूती येते.
३. आकाशाचा मंडप आणि पृथ्वीचे आसन ही भव्य कल्पना म्हणजे अभिजात काव्यप्रतिभेचा आविष्कार आहे.
४. मोकळ्या, नैसर्गिक वातावरणात रमणे हे निसर्ग मित्राचे आणि दृढ भक्ताचे लक्षण आहे.
५. शरीराच्या गरजेपुरती गोधडी आणि पाणी पिण्याकरिता कमंडलु, इतक्या अल्प गरजा म्हणजे शुद्ध वैराग्याचे अंग आहे.
६. वाहणार्‍या वार्‍याची सुखद जाणीव हे निसर्गतत्त्वाशी एकरूप झाल्याचे लक्षण आहे.
७. हरिकथेचे भोजन करणे म्हणजे भक्तीरंगाचा शुद्ध, नितळ, आत्मीय भावाविष्कार आहे.
८. मनाशी संवाद होणे म्हणजे चिंतनाची स्थिती. आपला
आपल्याच मनाशी वादविवाद झाला की, त्या मंथनातून एक दृढ, शाश्वत विचार जन्माला येतो. स्वत:शी केलेल्या विवादातून शेवटी ‘आत्मसंवाद’ होतो आणि भक्तीच्या वाटेवरचे प्रमेय साध्य होते.

अंतरंगाशी संवाद झाला की, माणूस अंतर्मुख होतो. वृत्तीतले दोष नाहीसे होतात. निसर्गाच्या, वृक्ष-वेलींच्या सहवासात पूर्ण एकांत लाभतो. ऋषी, मुनी, योगीजन यांनी अरण्यातल्या एकांतातच साधना केली. चिंतनाच्या क्षणांनी मनाचा गाभारा समृद्ध केला षड्रिपूंवर मात करून विवेकाच्या दिपावर आलेली काजळी दूर केली. अनंत अवकाशातल्या विशाल निसर्गतत्त्वाची जाणीव झाली की, संकुचित भावना सहजपणे विरघळून जातात.
निर्मळपणा, व्यापकपणा आणि सर्वसमावेशकता यामुळे व्यक्तीची संतपणाकडे जाणारी वाटचाल सुरू होते. निसर्ग आणि दाही दिशांतील व्यापक तत्त्व आपल्या आयुष्याचा भाग बनते. चराचराशी संवाद होतो. मग वाद उरतच नाही. क्षणोक्षणी आनंदाची अनुभूती येते. आयुष्याला सार्थकतेचा स्पर्श होतो. धन्यता लाभते. संतांच्या पर्यावरणाबाबतच्या अभियानातील संत तुकारामांचे योगदान अतिशय मोठे आणि महत्त्वाचे आहे. शेती, पाणी वृक्षवेली याबाबत त्यांनी मांडलेले विचार निसर्ग तत्त्वाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करणारे आहेत. त्यांच्या शद्बांना अनुभवाचे कोंदण आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वी पर्यावरणाची आजच्या वर्तमानाइतकी हानी झाली नव्हती. तरीही त्यांचे निसर्गाच्या पर्यावरणविषयीचे विचार काळाच्या कितीतरी पुढे होते याची आपल्याला जाणीव होते.

– डॉ. देवीदास पोटे
(।।ज्ञानबातुकाराम।। वार्षिकाच्या ‘बा तुकोबा’ या विशेषांकातील डॉ. देविदास पोटे यांच्या लेखाचा हा संपादित अंश आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *