दत्त सांप्रदायाचा वारसा चालवणारे

देवगडचे सद्गुरू किसनगिरीबाबा

श्री दत्त संप्रदायाचा मोठा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. या संप्रदायात आणखी एक थोर नाव म्हणजे नगर जिल्ह्यातील देवगड येथील समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा. रंजल्या-गांजल्या भाविकांचे श्रद्धास्थान, अशी येथील किसनगिरीबाबा मंदिराची ओळख आहे. किसनगिरी महाराजांनी दुःखी आणि पीडित लोकांना मार्गदर्शन केले. त्यांना सन्मार्गाला लावले. अनेकांचे दुःख समजून पारमार्थिक उपायांनी त्यांना ईश्वरभक्तीकडे वळवले. याच किसनगिरी बाबांची आज पुण्यतिथी.

नाथ संप्रदायाचा मोठा वारसा
नगर-नेवाशाचा परिसर बहुतांश प्रमाणात नाथ संप्रदायाशी निगडित आहे. आदिनाथ वृद्धेश्वरापासून ज्ञानेश्वरांपर्यंतची नाथ परंपरा येथे स्थापित आहे. श्री मच्छिंद्रनाथांचे ‘मायंबा’, श्री कानिफनाथांची ‘मढी’, श्रीसाईनाथांची ‘शिर्डी’ यांसारखी अनेक अलौकिक नाथक्षेत्रे या भागात आहेत. नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत, श्री दत्तात्रेयांची दोन अप्रतिम स्थाने नगर-नेवासे येथे आहेत. त्यातील एक प्रवरा नदीच्या काठी ‘श्रीदेवगड संस्थान’, तर दुसरे दत्तस्थान सावेडी परिसरात श्रीरामकृष्ण महाराज क्षीरसागर यांनी निर्माण केलेले आहे.

भगवान शंकराची आराधना
किसनगिरी बाबा यांचा जन्म १३ सप्टेंबर १९०७ रोजी नेवाश्याजवळ असलेल्या गोधेगावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मारुती आणि आईचे नाव राहीबाई होते. लहान वयातच किसन हे गावातील पाटील मंडळींची गुरे आणि शेळ्या, मेंढ्या राखत होते. अनेक प्रसंगांत लोकांना किसनचे वागणे चमत्कारिक वाटत असे. असं म्हणतात, की किसन हे आपल्या आईशिवाय अन्य कुणाच्या हातून तयार केलेले अन्न खात नसे. पुढे ते आपला स्वयंपाक स्वतःच्या हातानेच करू लागले. आपल्या भावांसोबत किसन हे मासेमारीसाठी जात असे. तेव्हा भावांनी जाळ्यात धरलेले मासे ते पुन्हा नदीत सोडून देत असे. वयाच्या आठव्या वर्षापासून किसन यांना शिवभक्तीची आवड निर्माण झाली. दिवसभर शेतात राबल्यावर रात्री प्रवरा नदीच्या काठावर वाळूंची पिंड करून किसन हे शिवभक्तीत तल्लीन होत असत.

तब्बल १२ वर्षे शिवभक्ती
किसनबाबांची बारा वर्षे ‘शिवभक्तीपूर्ण’ झाली आणि ते गावोगाव फिरून माधुकरी म्हणून चारा, भाकरी आणि पीठ मागू लागले. जमलेला चारा जनावरांपुढे टाकत आणि भाकरी कुत्रे, मासे आणि पक्षी यांना खाऊ घालत. त्यांना लोक भरभरून माधुकरी देऊ लागले. तेव्हा त्यांनी सप्ताह आणि भंडारे सुरू केले. बाबा प्रवरेच्या तीरावरील औदुंबराच्या खाली बसून श्री दत्तप्रभूंची भक्ती करत. ही जागा आवडली आणि या ठिकाणी दत्तप्रभूंचे मंदिर बांधण्याचा मानस त्यांनी भक्त मंडळींकडे बोलून दाखविला. याच काळात त्यांनी नेवासे बुद्रुक येथील संतपुरुष नाथबाबा यांचे शिष्यत्व पत्करले. नदीच्या काठावर उंच-सखल जमीन होती. ती सपाट करून जानेवारी १९५७ च्या सुमारास बांधकाम सुरू झाले. बाबांनी माधुकरी मागताना मंदिराच्या बांधकामासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली आणि श्रमदानातून हे भव्य मंदिर उभे राहिले आहे. पुढे येथे आता दत्तमंदिर, शिवाचे मंदिर, पाकशाळा, धर्मशाळा असा विस्तार झाला. १९८३ मध्ये किसनगगिरी महाराज देह दत्तचरणी विलीन झाला. यांचे एक शिष्य भास्करगिरी महाराज आता हे देवस्थान चालवत आहेत.

पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम
सद्गुरू किसनगिरीबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यात महाविष्णूयाग, अखंड हरिनाम सप्ताह व तसेच श्री किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायणाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी हजारो भाविक बाबांच्या चरणी डोकं टेकवतात.
पंढरपूर वारीची भव्य परंपरा आणि रिंगण
पंढरीच्या आषाढी वारीसाठी दरवर्षी किसनगिरी महाराजांचीही पालखी प्रस्थान ठेवते. साधारणपणे ४८ वर्षांची ही परंपरा अखंड सुरू आहे. शिस्तबद्ध पालखी असा या दिंडीचा गौरव आहे. पांढराशुभ्र वेष परिधान केलेले वारकरी, तुळशीची माळ, कपाळी गंध, टाळ मृदूंगाच्या निनादात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. या पालखीचे पहिले भव्य रिंगण नेवासा इथं भरते. अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेकडो वारकरी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात. एकूणच भगवान शिव, दत्तप्रभू आणि वारकरी संप्रदाय अशी सांगड घालत सन्मार्गाची शिकवण किसनगिरी बाबांनी आपल्या समाजाला दिली. त्यांनी दिलेली शिकवण आजही आपल्याला नवी दिशा देते. रंजल्या-गांजलेल्या भाविकांना नवी उमेद देते. थोर संत किसनगिरी बाबांना पुण्यतिथीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार अभिवादन!🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *