डॉ. आंबेडकरांवर संतांचा प्रभाव;

क्रांतीसाठी नाकारले चोखा मेळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चळवळीची सुरुवात केली तीच मुळी अस्पृश्यांच्या वारकरी किंवा चोखा मेळा ‘आयडेंटिटीला’ आव्हान देऊन. त्यांच्या मते चोखा मेळ्यांनी आपल्या वाजवी अशा मानवी हक्कांसाठी बंडाचे निशाण न उभारता पदरात पडले आहे त्यात समाधान मानले. त्यामुळे अस्पृश्यांचा आदर्श चोखा मेळा होऊ शकत नाही. याचा अर्थ असा मात्र नव्हे, की त्यांना चोखा मेळा किंवा भागवत धर्म यांच्याविषयी अनादर होता.

– डॉ. सदानंद मोरे

डॉ. आंबेडकरपूर्व दलित समाज हा वारकरी पंथाने देऊ केलेल्या अल्पस्वल्प धार्मिक आणि आत्मिक संधीवर संतुष्ट होता. सर नारायण गणेश चंदावरकर एके ठिकाणी सांगतात, “हा देश ज्ञातिबंधनांनी जरी अगदी बध्द झालेला आहे, तरीसुध्दा अगदी खालच्या वर्गाचे म्हणून ज्यांना मानिले जाते, त्या महारांतसुध्दा अशी माणसे आढळतात, की त्यांचा भाव, त्यांची भक्ती, तल्लीन करून सोडणारी पदे घोळून घोळून म्हणणे, भक्तांच्या पद्यांचे त्यांनी केलेले निरुपण ऐकून मनाला फार समाधान वाटते. काही वर्षांपूर्वी खंडाळ्यास एका महार बुवाने हरिकीर्तन केले, त्या वेळी साधुसंतांची आठवण करिताना त्याने अगदी कळवळ्याने म्हटले- “अहो संतहो! आपण आमच्यावर फार उपकार केले आहेत. ज्या वेळी वेदांनी आम्हाला टाकिले, ब्राह्मणांनी झिडकारिले व लोकांनी बहिष्कृत केले, त्या वेळी आम्ही जे अगदी पतन पावलेले, सर्वांस तिरस्करणीय वाटणारे महार त्यांना आपण जवळ केले; आपण आम्हाला आमच्या उध्दाराचा मार्ग दाखविला व आमच्या ठिकाणी आशा उत्पन्न केली. त्या आपले आम्ही उतराई कसे होणार?”
आजरेकरांच्या फडावरील शिवबा दरेकर या फडावरील सर्वांना मान्य व वंदनीय असलेल्या अस्पृश्याचे थोडक्यात वर्णन व काही चरित्रभाग गोपाळराव राहिरकर यांनी त्यांच्या दादा महाराज सातारकरांच्या चरित्रात दिलेले आहे. स्वतः दादामहाराजांनी शिवबा दरेकरांच्या वाईजवळील दरे या गावी त्यांच्या स्मरणार्थ खास सप्ताह केला होता. चाकण येथील पांडुरंग माऊलींची हकिगत ‘बहिष्कृत भारता’च्या एका अंकात आलेली आहे. असे अनेक अज्ञात शिवबा दरेकर किंवा पांडुरंग माऊली वारकऱ्यांमध्ये होऊन गेले. चोखामेळा हे श्रेष्ठ व मान्यवर असे संत असल्याने महार समाज आपला उल्लेख अभिमानाने ‘चोखा मेळा’ असा करीत असे. चोखा मेळ्यांच्या नावाने अनेक मंडळे, समाज निघाले होते. इतकी एकरूपता साधली गेली होती.

बाबासाहेबांचे ‘आयडेंटिटी’लाच आव्हान
आंबेडकरांसारख्या पाश्चात्य विद्येने आणि पर्यटनाने क्षितिज व्यापक झालेल्या स्वाभिमानी विद्वानाला या प्रकाराची दुसरी बाजू दिसली नसती तरच नवल. म्हणून त्यांनी सुरुवात केली तीच मुळी अस्पृश्यांच्या या वारकरी किंवा चोखा मेळा ‘आयडेंटिटीला’ आव्हान देऊन. त्यांच्या मते चोखा मेळ्यांनी आपल्या वाजवी अशा मानवी हक्कांसाठी बंडाचे निशाण न उभारता पदरात पडले आहे त्यात समाधान मानले. त्यामुळे अस्पृश्यांचा आदर्श चोखा मेळा होऊ शकत नाही. याचा अर्थ असा मात्र नव्हे, की त्यांना चोखा मेळा किंवा भागवत धर्म यांच्याविषयी अनादर होता. मुद्दा अपेक्षा आणि मर्यादा यांचा होता. मात्र तरीही दलितांच्या मनात वर्षानुवर्षे घर करून बसलेला चोखा मेळ्यांचा आदर्श आणि दलितांची भागवत धर्माकडे असलेली ओढ यांचा प्रतिकार करणे बाबासाहेबांना चळवळीची गरज म्हणून अपरिहार्य ठरले. त्यांची यासंबंधीची सर्वच मते परमार्थानि घेणे चुकीचे होईल. त्यातला बराचसा भाग व्यूहरचनेचा, डावपेचांचा आहे. लहानपणी वडिलांच्या संस्कारांमुळे संतकवींची वचने त्यांच्या तोंडात कायमची बसली. “माझ्याइतका मराठी संतकवींचा खोल अभ्यास केलेली फार थोडी माणसे असतील” असे ते आव्हानात्मक रीतीने सांगतात. वडिलांच्या संस्कारांमुळे आपण दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही हे ते अभिमानाने सांगतात.
आळंदी-पंढरीला गेलात तर वाळीत टाकू
भागवत धर्माबद्दल ते म्हणतात- “एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर वर्चस्व राहणे हे चातुर्वर्ण्याचे मर्म आहे. या चातुर्वर्ण्याविरुद्ध महाराष्ट्रात अनेक बंडे झाली. त्यात महाराष्ट्रातील साधुसंतांचे बंड प्रमुख होते. पण या बंडातील लढा अगदी निराळा होता. मानवी ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शूद्र मानव श्रेष्ठ, हा प्रश्न सोडविण्याची भरीस साधुसंत कधी पडले नाहीत. या बंडात संतांचा विजय झाला व भक्ताचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. तरीसुध्दा या बंडाचा चातुर्वर्ण्याच्या विध्वंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. असे म्हणता येईल, की तुमचे चातुर्वर्ण्य तुम्ही ठेवा. आम्ही भक्त होऊ व तुमच्यातील श्रेष्ठतम गणल्या गेलेल्या ब्राह्मणांना लाजवू, अशी अहंमन्यता धरून संतांनी चातुर्वर्ण्याला मुळीच हात लावला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही. तिची किंमत स्वयंसिध्द आहे. हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत.” चोखा मेळा यांची कर्तबगारी वैयक्तिक आहे. “संत चोखा मेळ्यातून एखादा संत फारतर पुढे येईल; पण समाजाची वाट काय? एका व्यक्तीसाठी संबंध समाजाने दलितावस्थेत राहायचे काय?” असा त्याच सवाल होता. “ज्या धर्माची चोखोबांनी कास धरली त्याच धर्माची आम्ही कास का धरावी?” असेही ते विचारतात. येथे त्यांचा सर्वसामान्य रोख हिंदू धर्मावर असला, तरी विशेष रोख वारकरी संप्रदायावर आहे हे स्पष्ट होते. “आपल्या लोकांत देवभोळेपणा फारच शिरला आहे. जो तो उठला सुटला पंढरी-आळंदी-पैठणला जातो. मला आपणास हे विचारायचे आहे, की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळवले आहे? पंढरीला जाऊ कोणाचे भले झाले आहे ?” असा त्यांचा त्यांच्या दलित बांधवांशी सतत संवादे चालला होता. “पंढरी-आळंदीला गेला तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा हुकूम मला द्यावा लागेल.” इतक्या टोकापर्यंत आंबेडकरांना जायला लागले.
देहूरोड येथे मंदिराऐवजी बुद्धविहार
देहूरोड येथे चोखा मेळ्यांचे मंदिर बांधू इच्छिणाऱ्या अस्पृश्यांनी त्यांना त्या समारंभासाठी बोलावले, तेव्हा चोखा मेळ्याच्या मंदिराऐवजी बुध्दविहार बांधणार असलात तर येईन, असा जवाब त्यांनी दिला. त्यांची अट मान्य करून संबंधितांनी देहरोडला बौध्दविहार बांधला व आंबेडकर तेथे गेले. ही घटना धर्मांतरापूर्वीची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. सुरुवातीला अनेक दलितांना एकत्र गाठण्याची संधी मिळावी म्हणून बाबासाहेब निवृत्तिनाथांच्या त्र्यंबकेश्वरच्या वारीत गेले होते. तेथे त्यांनी बहिष्कृत भारत या पत्राला वर्गणी द्या, असे आवाहन केले. तेथेही त्यांना निधी उभारणारे जे स्पर्धक भेटले ते चोखा मेळ्यांच्या नावे संस्था उभारणारेच होते.
वारकऱ्यांच्या वागणुकीबद्दल निराशा
वारकरी पंथाशी व संतांशी आंबेडकरांचे नाते दोन प्रकारचे आहे. एका बाजूला त्यांना या पंथाच्या ऐतिहासिक कामगिरीची जाणीव आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या सद्यकालीन मर्यादांमुळे ते व्यथित झालेले दिसतात. त्यांची भागवत धर्माविषयी नेमकी काय कल्पना होती, हे त्यांनी संतचरित्रकार ल. रा. पांगारकर यांच्यावर केलेल्या टीकेवरून स्पष्ट होते. पांगारकर बडोदे शहरी गेले असता, विनायकराव वाकसकर यांच्या घरी जेवले. वाकसकर हे कायस्थ प्रभू होते आणि पांगारकर वारकऱ्यांच्यात शिरून आपले ब्राह्मण्य मिरवणारे. या घटनेचा गौप्यस्फोट चिं. वि. जोशी यांनी केला. या सहभोजनाबद्दल त्यांनी पांगारकरांचे अभिनंदनही केले. पण त्यामुळे उलट पांगारकर अडचणीत आले आणि त्यांनी प्रायश्चित घेतले. अर्थात तेही सहभोजनाची प्रांजळ कबुली देऊन नव्हे, तर आपण तसे केले नाही, पण ज्या अर्थी लोक तसे म्हणतात त्याअर्थी असे प्रायश्चित घ्यायला हवे, अशी भूमिका घेत!

आंबेडकरांच्या मते प्रायश्चित घेणे म्हणजे आपण केलेली गोष्ट वाईट असण्याची कबुली देणे होय. पांगारकरबुवा तर स्वतःला भागवत धर्मीय म्हणवतात. आंबेडकर लिहितात- “भागवत धर्माला काही भेदभाव नाही. इतकेच नव्हे, तर काला हा भागवत धर्माचे मुख्य अंग आहे. रा. वाकसकर यांच्याबरोबर झालेले पांगारकरांचे सहभोजन हा तरी कालाच होता. मग भागवतधर्मी पांगारकरांनी त्याबाबत प्रायश्चित घेण्याचे काय कारण होते, हे आम्हास कळत नाही.” अर्थात खरी गंमत तर पुढेच आहे. आपणाला फराळाचे (म्हणजे ब्राह्मणास ब्राह्मणेतराच्या हातचे चालणाऱ्या निर्लेप पदार्थांचे) आमंत्रण देऊन जेऊ घातले (त्यात श्रीखंड, पुरी हा बेत होता, अशी चिं. विं. ची माहिती) म्हणजे आपली फसवणूक झाली असे पांगारकरांनी सांगितले. त्यावर मात्र आंबेडकर, “पांगारकरांच्या सोदेगिरीला सीमा राहिली नाही, ” असे लिहितात व या प्रकारची आपणास किळस वाटते हे स्पष्ट जाहीर करतात.

हा किस्सा देण्याचे कारण म्हणजे भागवत धर्माचे आंबेडकरांचे आकलन व त्यांच्या भागवतधर्मीयांकडून अपेक्षा यांवरून समजतात हे आहे. भागवत धर्माची मजल सहभोजनापर्यंत गेली असल्याचे त्यांना मान्य दिसते. आता ही मजल मारताना भागवत धर्मियांनी समकालीन सनातन्यांचा रोष ओढवून घेतला असणार, हे उघड आहे. पण या बाबींचे पुरेसे खुले अभिनंदन ते करताना दिसत नाहीत. अर्थात त्यांचा मुद्दा सामाजिक प्रयत्नाबद्दलचा आहे, व्यक्तीबद्दलचा नाही. “एकनाथ महाराजांविषयी आधुनिक विचारांच्या कोणत्या बहिष्कृताला अत्यंत आदर वाटत नाही ? चोखोबा महाराजांच्या अस्थी शोधून काढणाऱ्या नामदेव महाराजांच्या अंतःकरणाला आकुंचित विचारांचा विटाळ झालेला नव्हता असेच प्रत्येक बहिष्कृत समजतो. चोखोबा-रोहिदासांसारख्या साधूंना ऐहिक गोष्टींची पर्वा नव्हती. त्यांचे सर्व लक्ष परमेश्वराकडेच वेधले होते. त्याचे उदाहरण साधारण लोकांना काय कामाचे?” असे त्यांचे म्हणणे आहे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेदश्रम अमंगळ।।
असे म्हणणाऱ्या महावैष्णव तुकोबारायांबद्दल त्यांना आदर आहे पण समकालीन वारकऱ्यांच्या वागणुकीबद्दल ते निराश आहेत. “एकनाथ-तुकाराम यांच्यासारख्या साधूंची नावे हे लोक मोठ्या प्रेमाने घेतील आणि त्यांच्या कविता आळवून आळवून म्हणतील; परंतु त्या साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुध्दीची, भूतदयेची, समतावादाची व उदार विचारांची हटकून पायमल्ली करतील.”

वारकरी मानसिकतेशी लढा
असे म्हणता येते, की आंबेडकरांच्या प्रतिपादनात दोन स्तर ठळकपणे दिसून येतात. सवर्ण हिंदूशी वाद करताना ते त्यांना तुकोबादि संतांच्या संदेशाची व भागवत धर्माच्या उदार समतेची आठवण करून देतात, तर आपल्या अस्पृश्य बांधवांशी संवाद साधताना या समतेची ऐहिक व्यवहारात अंमलबजावणी होत नसल्याने वारकरी पंथाला चिकटून राहू नका, असे सांगतात, अशा पध्दतीने पाहिले म्हणजे या विवेचनात विसंगती वाटत नाही. महाडच्या सत्याग्रहाची वाटचाल चालू असताना वीर मुक्कामी अस्पृश्य कीर्तनकार ह. भ. प. गणपतबुवा जाधव यांचे कीर्तन आणि नंतर आंबेडकरांचे भाषण, किंवा पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रहाच्या वेळी अस्पृश्यांनी दिंडीने येणे ‘चोखा मेळा महाराज की जय’ अशा घोषणा देणे, असे प्रकार पाहिले म्हणजे बाबासाहेबांनी अंतर्गत पातळीवर वारकरी मानसिकतेशी दिलेला लढा स्पष्ट दिसू लागतो.
लिखाणात संतांची वचने
अस्पृश्यांची भाषा संतवाङ्मयाने भारित आहे याची त्यांना जाणीव होती त्यामुळे त्यांच्या लिखाणात संतांची वचने सर्वत्र विखुरलेली दिसतात. मूकनायक या त्यांच्या मुखपत्राचे शीर्षवाक्य म्हणून तर काय आता करू धरूनिया भीड। निशंक हे तोंड वाजविले॥
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण।
सार्थक लाजून हित नव्हे॥
या तुकोबांच्या ओळी अवतरतात. तर बहिष्कृत भारतचे शीर्षकवाक्य ज्ञानदेवांच्या ओव्यांनी सजलेले दिसते. ‘ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा सोडून अन्य सर्व मराठी ग्रंथ समुद्रात बुडवले तरी फारसे बिघडणार नाही’ हे त्यांचे मराठी साहित्याबद्दलचे मत धक्कादायक वाटले तरी चिंतनीय आहे. तुकोबांच्या
ऐसी कळवळ्याची जाती।
करी लाभाविण प्रीति॥
या ओळीचा उपयोग त्यांनी ‘कळवळ्याची जाती आणि लाभाविण प्रीति‘ असा म्हणीसारखा केलेला आढळतो. यातिकुळ येथे असे अप्रमाण।
गुणांचे कारण असे अंगी।।
हे चरण तर महत्त्वाचे आहेच. शिवाय
नवसे कन्यापुत्र होती। तरी करणे लागे पती?
हा तुकोबांचा अंधश्रध्दानिर्मूलक सवालही ते करतातच.
गौतम बुद्ध आणि तुकोबा यांच्यातील दुवा
पण या भाषिक आणि वाङ्मयीन बाबींपेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी गौतम बुद्ध आणि तुकोबा यांच्यांत पाहिलेला दुवा. बुध्द आणि तुकोबा यांची ब्राह्मण्यसमीक्षा तत्कालीन समाजसुधारकांना भावली होती. विशेष म्हणजे अभ्यासकांपैकी बुध्दाला मानणारी मंडळी तुकोबांना मानायची व तुकोबांना मानणारे विव्दान बुध्दालाही मानायचे तसेच बुध्दाची निंदा करणारे सहसा तुकोबांचे निंदक होते व तुकोबांचे निंदक बुध्दाचीही निंदा करीत. धर्मानंद कोसंबी, वि. रा. शिंदे, जागृतिकार पाळेकर, राजवाडे, केतकर अशी कितीतरी उदाहरणे या संदर्भात देता येतील. स्वतः संत बहिणाबाईंनी
कलियुगी बौध्दरूप धरी हरी।
तुकोबा शरीरी प्रवेशला।।
असे पूर्वीच जाहीर केले होते. आंबेडकरांना दिसलेले बुध्द व तुकोबा यांचे नाते थोड्या वेगळ्या प्रकारचे आहे. पूर्वी अमृतसर कॉंग्रेसच्या वेळी लोकमान्य टिळक आणि म. गांधी यांच्यात इंग्रजांशी आपण कसे वागावे यासंबंधी वाद उपस्थित झाला होता. त्या वादाचे सार म्हणजे टिळकांचे मत ‘शठ प्रति शाठ्यं’ तर गांधीचे मत ‘शठं प्रति सत्यं’ असे सांगितले जाते. याबाबत टिळक श्रीकृष्णाचे अनुयायी तर गांधी बुध्दाचे असेही मानले जाते. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी अशाच प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा गांधीजी अहिंसेचेच प्रतिपादन करीत होते.

शक्य तोवर अहिंसा, जरूर तर हिंसा
बाबासाहेबही स्वतःला बुध्दानुयायी समजत असत. मग प्रश्न असा निर्माण झाला की बुध्दाच्या अहिंसेचे गांधींचे आकलन योग्य आहे का आणि आंबेडकरांना ते मान्य आहे का? आंबेडकरांनी असे प्रतिपादन केले की गांधीजींची अहिंसाविषयक टोकाची भूमिका ही बुध्दाने घेतलेली भूमिका नसून जैन धर्माने सांगितलेली आत्यंतिक व अव्यवहार्य भूमिका आहे. वैदिक आर्यांची आत्यंतिक हिंसा आणि जैनांची प्रतिक्रियात्मक आत्यंतिक अहिंसा यांचा सुवर्णमध्य म्हणजे बुध्दांची अहिंसेविषयीची भूमिका होती. “शक्य तोवर अहिंसा, जरूर तर हिंसा” असे तिचे स्वरूप आंबेडकर सांगतात. बुध्द आणि गांधी यांच्या भूमिकांमधील फरक स्पष्ट करताना ते म्हणतात की “बुद्धप्रणित अहिंसा हे तत्त्व होते. गाधींची अहिंसा हा नियम आहे. मनुष्य नियमाचा गुलाम असतो. नियम पाळायचा असतो. तत्त्वाचा मनुष्य उपासक असतो. गुलाम नसतो. नियम अडाण्याकरिता असतो, तत्त्व शहाण्याकरिता असते. तत्त्व प्रगतीला बाध आणू शकत नाही. नियम गती खुंटवतो.’ आंबेडकरांच्या अहिंसेची संकल्पना ही दुहेरी स्वरूपाची आहे. ती ते तुकोबांच्या शब्दांत सांगतात,
दया तिचे नाव भूतांचे पालन।
आणिक निर्दालन कंटकांचे।।
भूतांच्या पालनाबरोबर कंटकांचे पारिपत्य हाही अहिंसेचाच भाग आहे. गांधीजींची अहिंसा या दोनपैकी पहिलाच भाग विचारात घेते. अतएव ती अपूर्ण आहे. तुकोबांचे अहिंसा ही परिपूर्ण आहे. बुध्दाची अहिंसा अशीच होती. थोडक्यात सांगायचे म्हणजे बुध्दाची अहिंसा आणि गांधींची अहिंसा यांच्यांमधील सूक्ष्म फरक स्पष्ट करताना त्यांनी तो तुकोबांच्या भाषेत स्पष्ट केला. त्यांनी तुकोबांमध्ये बुध्दाचे जणू प्रतिबिंब पडलेले पाहिले. आंबेडकरकालीन ब्राह्मणेतर चळवळीतील मंडळी बुध्द, तुकाराम आणि गांधी असा सातत्यसंबंध लावीत. या सातत्यसूत्राला धरूनच तो काँग्रेसमध्ये गेली. आंबेडकरांना हे सूत्र मान्य नव्हते. ते गांधींना विरोध करतात. बहुजन समाजाच्या काँग्रेसप्रवेशाला विरोध करतात. आणि त्या वेळी ब्राह्मणेतर चळवळीचा एक भाग म्हणून काम करीत असलेली आंबेडकरी चळवळ ब्राह्मणेतर चळवळीतून अलग होते.

बौध्द धर्म आणि वारकरी संप्रदाय
बौध्द धर्म आणि वारकरी संप्रदाय यांच्यामधील सूक्ष्म संबंध आंबेडकरांच्या ध्यानात आलेला होता. पंढरी हे मुळातले बौध्द क्षेत्र होते असा दावा आपण पाली ग्रंथांच्या आधारे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धर्मांतराच्या पूर्वसंध्येला ते अभंग गात होते असे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर ‘देह जावो अथवा राहो बुध्दपदी दृढ भावो’ अशा धर्तीची नवीन गाथा निर्माण झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. बौद्ध धर्माच्या वारकरी संतांशी असलेल्या आंतरिक नात्याची पुनःस्थापना करण्याचे त्यांच्या मनात होते हे खास पण अपवाद वगळता, डावपेचात्मक भूमिका आणि वास्तविक मत यांच्यांत फरक करता न आल्याने त्यांच्या अनुयायांनी संतांकडे पाठ फिरवलेली दिसते. नामदेव ढसाळांचा अपवाद हा एक ठळक अपवाद. अरुण कांबळेंनाही हे जाणवलेले दिसते. पण ते एकतर्फी आहे. बहुजनांचे व्यापक ऐक्य घडविण्यास सज्ज झालेल्या प्रकाश आंबेडकर प्रभृतींना मात्र हल्ली वारकरी आणि तुकोबा यांच्याबद्दल जवळीक वाटू लागली आहे. शंकराचार्यांच्या चार पीठांपैकी दोन बहुजनांना द्यावीत अशी मागणी करताना त्यांनी त्यातील एका पीठासाठी बाबामहाराज सातारकर यांचे नाव सुचविले आहे. मध्यंतरी नातवाची मुंज करून बाबामहाराजांनी वारकऱ्यांमधील सनातनी व सुधारक या दोघांनाही धक्का दिलेला आहेच. अपहरणाची क्लृप्ती प्रकाशराव सनातनी लोकांवर उलटवू पाहतात. वारकऱ्यांनीच सनातन धर्माचे अपहरण करावे असा त्यांचा इरादा दिसतो! बघू या काय होते ते.
बौद्ध अभंग
ढसाळांसंबंधी आपण नंतर चर्चा करूच. तूर्त बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या नव्या गाथेची- बौध्द अभंगांची कल्पना तुकोबादि संतांना अनुसरून कवी दीनबंधू कशी साकार करतात ते पाहू. अकोला येथील कवी व बौध्द धर्माचे अभ्यासक दीनबंधू यांना लहानपणापासून अभंगरचनेचा नाद होता. हा वारसा त्यांना त्यांच्या कष्टकरी आईकडून मिळाला. आपल्याकडून कठोर शब्द वापरले जातात याचे कारण देताना तुकोबांप्रमाणेच दीनबंधू म्हणतात –
तुम्हासी करावे कठोर भाषण।
याचे का भूषण वाटे आम्हा।।
तुम्हा निंदोनिया आम्हा काय सुख।
वाटे फक्त दुःख अज्ञानाचे॥
जगातूनि व्हावा अज्ञानाचा नाश।
वाटते मनास तीव्रतेने॥
तेणे योगे येती बोल कटु वाचे।
वंदनीय साचे नाही तरी॥
सुटलासे धीर शब्द उमटेना।
मायबापे दीना सांभाळावे॥
पाहुनी अज्ञाना तळमळे मन।
बोलाया कारण हेचि झाले॥
काय नाही आम्हा संसार आमुचा।
म्हणोनि फुकाचा वेळ द्यावा॥
बंधू म्हणे हा तो नव्हे उपदेश।
हृदयाचे श्वास वर येती॥
वारकरी साहित्यात संतांचे वर्णन करणारे अभंग नेहमी म्हणण्यात येतात. त्याच शैलीतील दीनबंधूंचे भिक्खूवर्णन पाहा –
धन्य धन्य भिक्खू सद्धम्माचे दूत।
प्रज्ञाशीलवंत ब्रह्मचारी॥
त्यागिला संसार लोभ अभिमान।
निर्मळ होऊनि वावरती॥
सुखदुःख छाया मुखावरी नसे।
सर्वत्र प्रकाशे प्रसन्नता॥
बहुजनहिता बहुजन सुखा।
सांगतात लोका बुध्दवाणी॥
लोभावते मन त्यांच्या त्यागावरी।
झुरतो अंतरी दीनबंधू॥
बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर दीनबंधूंनी केलेला अभंगशोक –
गेलासी सोडोनी दलितांच्या नाथा।
सोपवुनि समता कोणावरी॥
अंतरली आम्हा मायेची साऊली।
सोडूनि माऊली जाता क्षणी॥
प्रज्ञेचा वारसा घेईल तो कोण।
भासते भयाण पुढे आता।।
धावतील पुढे स्वार्थाचे सारथी।
भांबावली मती कंप पावे॥
दीनबंधू तुझा फोडितसे टाहो।
दुःखी जना याहो सांभाळाया॥
बाबासाहेबांनंतर दलितांमध्ये आलेले नेत्यांचे पीक पाहून दीनबंधूंमधील चिकित्सक जागा होतो.
नको बाबा मला असे नेतेपण।
स्वार्थाचे लिंपन जयावरी॥
शुभ सात्विकाचा वर मुखवटा।
आत परी गोटा काळाकुट्ट॥
जमवुनी पाच-दहा साथीदार।
धाक लोकांवर बसवितो।।
धम्म राजकार्य होवो सत्यानाश।
परंतु हा खूष स्वार्थामध्ये॥
नेतेगिरी जरी अशी धंदेगिरी।
बंधू बरा दुरी त्यापासूनी॥
दीनबंधूंना दलित लेखक विचारवंतांत काय स्थान आहे हे मला ठाऊक नाही. पण बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते धडपडताहेत हे मात्र निश्चित.

(डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथातून साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *