डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भांत पुरातत्त्व विभागाने अभ्यासपूर्ण अहवाल येत्या ५ मेपर्यंत सादर करावा, असे निर्देश गुरुवारी (दि. १४) विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज होत असल्याचे नुकतेच लक्षात आले होते. त्यानंतर भाविकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे मूर्तीचे संवर्धन आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर या दोन्ही बाबींची सांगड घालून पुरातत्त्व विभागाने उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल येत्या ५ मेपर्यंत सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनात विशेष बैठक

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भांत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी
(दि. १४) विधानभवनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत मिश्रा, सहायक संचालक विलास वाहने, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

‘वारकऱ्यांच्या भावना विचारात घ्या…’

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिरातील रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाची झीज तातडीने थांबवून मूर्तीचे संवर्धन, जतन करण्यासाठी प्राध्यान्य द्यावे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करूनच अहवाल सादर करावा. या अहवालातील महत्वाच्या बाबी वारकरी संप्रदायाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी. त्यांच्या भावनांचा आदर करावा. यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीने समन्वयाने बैठक घ्यावी. या बैठकीनंतर मंदिर आणि परिसरातील आर्द्रता कमी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंलबजावणीसंदर्भात सर्वानुमते निर्णय घेणे सोयीचे होईल.

डॉ. गोऱ्हे करणार पाहणी

आर्द्रता कमी करण्यासाठी मंदिरातील मार्बल काढण्याबाबत योग्य, निर्दोष पद्धतीचा अवलंब करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी. वज्रलेपाची झीज थांबविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इतर मंदिरात केलेल्या उपाययोजना, मंदिर समित्यांचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. पंढरपूर येथील मंदिराची लवकरच स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंदिरे समितीकडून आभार
या विषयाची तातडीने दखल घेऊन बैठक आयोजित केल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले. पुरातत्त्व खात्याच्या अहवालानंतर योग्य त्या उपाय योजनांबाबतबैठक घेण्याची विनंतीही यावेळी मंदिर समितीच्या वतीने डॉ. गोऱ्हे यांना करण्यात आली. तसेच पंढरपूर येथे भेट देण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले. डॉ. नीलम गोऱ्हे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पंढरपूरला भेट देण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *