हजारोंना सन्मार्गावर आणणारे

धाकट्या पंढरीचे गोदड महाराज

पंढरीच्या वारीच्या माध्यमातून हजारो जणांना सन्मार्गावर आणणारे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतधील सत्पुरुष गोदड महाराज यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त आज या ठिकाणी विविध कार्यक्रम, उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

इसवीसन १७५९ च्या श्रावण शुद्ध दशमीला गोदड महाराजांचा जन्म झाला. त्यांचे नाव अमरसिंह भोसले. श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त असलेले भिकाजीराजे हे गोदड महाराजांचे वडील. तर त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा. गोदडनाथ महाराज वयाच्या १४व्या वर्षी विठ्ठलनामात तल्लीन होऊन राजवैभव सोडून घराबाहेर पडले. सातपुडा पर्वत रांगेत फिरताना तेथेच तपसाधनेला बसले. त्यांनी अत्यंत कठोर साधना केली. त्यामुळे विठ्ठलाने त्यांना प्रत्यक्ष येऊन दर्शन दिले आणि पंढरपुरास येण्यास सांगितले, अशी कथा भाविक सांगतात. नंतर संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री नारायण नाथ यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी अमरसिंह यांना दीक्षा दिली. त्याचवेळी त्यांच्या अंगावर गोधडी टाकून ‘गोदड महाराज’ असे त्यांचे नामकरण केले. गोदड महाराज सातपुडा पर्वतरांगेतील कासारबारी पठारावर वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला गेले असता तिथे त्यांची नारायण गोसावी यांची भेट झाली. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्याठिकाणी महाराजांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या.

पुढे महाराज देहू, आळंदी करत बारामतीस पोहोचले. तेथून ते फलटणला पोहोचले. तेथील शिवमंदिरात थांबले असता फलटण संस्थानच्या राणी सगुणामाता त्यांच्या भेटीसाठी आल्या. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. पुढे त्यांनी फलटण ते पंढरपूर अशी महिना वारी सुरू केली. एकदा गोदड महाराज कार्तिकी एकादशी वारीसाठी पंढरपूरला गेले होते. चंद्रभागेत स्नान करून ते वाळवंटाध्ये विठ्ठल नामात तल्लीन झाले होते. त्याचवेळी चंद्रभागेतून पाणी घेऊन आपल्या घरी जाणारी महिला महाराजांच्या राहुटीच्या दोरीला अडकून पडली. त्यावरून ती महाराजांना अद्वातद्वा बोलली. त्यामुळे विषण्ण झालेल्या महाराजांनी विठ्ठलानेच या महिलेच्या मुखातून आपला मानभंग केला, असं म्हणत आत्महत्येची तयारी केली. त्यावेळी तिथं आलेल्या एका माणसाने त्यांचा हात धरून ‘आत्महत्या म्हणजे महापाप आहे’, असे सांगत महाराजांना आत्महत्येपासून रोखले. हा मनुष्य म्हणजे स्वतः भगवान श्री विठ्ठल होते, अशी कथा सांगितली जाते. याच मनुष्यरूपी पांडुरंगाने तुम्ही तुमच्या जन्मगावी कर्णग्रामी म्हणजे कर्जतला जा. मीच तुम्हाला तिथं भेटायला येत जाईन, असंही सांगितलं. त्यानुसार गोदड महाराज आपल्या आजोळी म्हणजे कर्जतला गेले. तिथे जयंती, हरिनाम सप्ताह असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू केले. त्यापैकी आषाढ वद्य एकादशीला रथोत्सव हा महत्त्वाचा उत्सव सुरू केला. या उत्सवासाठी स्वतः श्री विठ्ठल पंधरपुरातून कर्जतला येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे ‘धाकटी पंढरी’ असेही या ठिकाणाला संबोधले जाते.

प्रत्येक वर्षी गोदड महाराजांचा रथ ओढण्यासाठी, नारळाची तोरणे आणि पुष्पहार वाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. गोदड महाराजांनी योगसिद्धांत, जगतारक, संतविजय, योगनिर्माण, गोदड रामायण अशा काही ग्रंथांची निर्मिती केली.
गोदड फकीर उदास। अखंड डोंगरी राहात।।
डोंगरी हिंडे आनंदाने। विठ्ठल बोलतो गर्जून।।
विठ्ठल म्हणता जीव जावा। हेचि मागणे केशवा।।
गोदड म्हणे विठोबासी। अंतकाळी भेट दे आम्हांसी।।
अशा प्रकारच्या गोदड महाराजांच्या रचना आहेत.
आपल्या रचनेत इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे
इसवीसन १८३७ च्या माघ वद्य चतुर्थीला गोदड महाराजांनी समाधी घेतली. कर्जतमध्ये महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. गावकऱ्यांचे ग्रामदैवत तसेच पंचक्रोशीतील भक्तांसाठी हे ठिकाण आराध्य दैवत बनले आहे.

महाराजांनी सुरू केलेली पंढरपूर वारी त्यांचे पट्टशिष्य श्री विठ्ठल घाडगे महाराज यांनी पुढे सुरू ठेवली. त्यांच्या १८६४ च्या समाधीनंतर कुशाबुवा, पांडुरंग महाराज गौरीहर बुवा, महादेव वाणी आणि आता सोमनाथ उर्फ एकनाथ वाणी अखंड वारी करत आहेत.
अशा या सत्पुरुषास पुण्यतिथीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन… 🙏

(या माहितीसाठी सोमनाथ ऊर्फ एकनाथ महादेव वाणी, मठाधिपती, श्री संत घाडगेनाथ महाराज मंदिर, कोळे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *