वारकरी शिक्षण संस्था सुरू

करणाऱ्या जोग महाराज पुण्यतिथी

वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानदेव, संत नामदेव यांच्यापासून संत निळोबा, संत बहिणाबाई यांच्या काळापर्यंत जे महात्मे संप्रदायात होऊन गेले त्यांनाच ‘संत’ मानण्याची अलिखित परंपरा आहे. परंतु दीडशे वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश काळात समाजात कीर्तनाच्या माध्यमातून संतविचार सांगत प्रबोधन करणारे प्रात:स्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री विष्णुबुवा जोग महाराज हे आधुनिक काळातील संत होत. महाराजांची आज पुण्यतिथी.

महाराज असे झाले वारकरी
वद्य प्रतिपदा शके १७८९ रोजी दिनांक १४ सप्टेंबर १८६७ या दिवशी पुणे येथे श्री नरसोपंत आणि मातोश्री सरस्वती देवी या दाम्पत्याच्या पोटी विष्णुबुवा महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या घराण्यात पिढीजात पहिलवानकी होती. त्यांचे मोठे बंधू पांडोबा हे पुण्यातील नामांकित मल्ल होते. पुण्यातील नगरकर तालमीचे ते वस्ताद होते. ते अतिशय धार्मिक, सत्शील, ब्रह्मचारी आणि शिस्तबद्ध व्यक्ती होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव महाराजांवर पडला. आपल्या थोरल्या बंधूंच्या तालमीत महाराजांनी मल्लविद्येचे धडे घेतले. पुणे आणि पंचक्रोशीमध्ये उत्तम मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला. त्यानंतर महाराजांच्या जीवनात एक महत्त्वाचा प्रसंग घडला, ज्यामुळे महाराज अंतर्मुख झाले. तो प्रसंग म्हणजे, पुण्यातील एका कुस्ती स्पर्धेत महाराज जिंकले. सर्वांनी आनंदोत्सव साजरा करत महाराजांची मोठी मिरवणूक काढली. त्यावेळी तिथे एक साधू जोग महाराजांजवळ आले आणि म्हणाले, ‘अरे या विजयाचा काय आनंद साजरा करतोस, काळावर विजय मिळवशील तरच तू खरा मल्ल आणि तोच खरा आनंद’. त्यानंतर महाराज खऱ्या अर्थाने अंतर्मुख झाले आणि त्यांचे मन परमार्थाकडे वळले. त्यांनी आळंदीत जाऊन संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर माळ ठेवली. ती स्वतःच आपल्या हाताने गळ्यात घालून घेतली आणि ते वारकरी झाले!

आधुनिक काळात संतविचार पोचविले गावोगावी
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार घेऊन त्यांनी समाजात जागृतीचे काम सुरू केले.
अज्ञानी, निरक्षर लोकांपर्यंत वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान त्यांनी सहज, सोप्या भाषेत पोचवले. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोग महाराजांनी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो कीर्तनकार, प्रवचनकार घडविले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज हजारो कीर्तनकार गावोगावी प्रबोधन करत आहेत.

स्वतःवर असलेला आत्मविश्वास
ह. भ. प. मामासाहेब दांडेकर यांनी जोग महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्र ग्रंथात त्यांनी महाराजांविषयी एक विशेष प्रसंग सांगितला आहे. जोग महाराज नाशिकला रामकुंडावर गोदावरी गंगा स्नानासाठी गेले होते. ते गोदावरीमध्ये उभे होते. तीर्थोपाध्याय तीरावरून संकल्प सांगू लागले, ‘पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव:’ बुवा एकदम त्याच्यावर खेकसले, ‘मी पापीही नाही, पापकर्मीही नाही. दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा. एवढा हा संकल्प उच्चारला, तर खबरदार !’ अशा प्रकारे जीवनात आपण पापच केले नाही, एवढा आत्मविश्वास महाराजांमध्ये होता. जोग महाराज हे ब्रह्मचारी होते. वैराग्यशील महाराजांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या कार्यासाठी समर्पित केले होते. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून अखेरपर्यंत ते समाज प्रबोधन करत होते.

काळावर सत्ता असणारे सत्पुरुष
जोग महाराजांचे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांवर निस्सीम प्रेम होते. महाराजांनी अखेरच्या काळात देह आळंदीत ज्ञानोबा माउलींच्या चरणी ठेवण्याचं ठरवलं होतं, परंतु शरीर साथ देत नसल्याने त्यांना काही काळ पुणे वास्तव्य करावे लागले. पण त्यांचा मनोनिग्रह त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यामुळे आजारी असतानाही माघ पौर्णिमेला पुणे सोडून ते आळंदीत घासवाले धर्मशाळेत आले. त्यांनी मामासाहेबांना माऊलींच्या समाधीचे तीर्थ आणि इंद्रायणीचे तीर्थ आणण्यास सांगितले. मामांनी त्यांना समाधी आणि इंद्रायणी मातेचे तीर्थ आणून दिले. त्यांनी तीर्थ प्राशन केले. त्यानंतर ‘मला उत्तरेकडे तोंड करून बसवा’ असे सांगितले. त्यानंतर डोळे मिटून ‘मी आता जातो’ असे मामांना सांगितले. तो दिवस माघ कृष्ण प्रतिपदा शके १८४१. माउलींचे चिंतन करत त्यांनी माउलींच्या चरणीच आपला देह विलीन केला. संत विचार तळागाळापर्यंत पोचविणाऱ्या श्री सद्गुरू जोग महाराजांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन!

– ह. भ. प. उमेश महाराज अनारसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *