अहिंसेची शिकवण देणारे

रामभक्त प्रल्हाद महाराज

आपल्या संतांनी अहिंसा परमो धर्म: हा मूलमंत्र समाजाला दिला. यात साखरखेर्डा जि. बुलढाणा येथील थोर तपस्वी प्रल्हाद महाराज रामदासी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आयुष्यभर अनेक ठिकाणी प्रभू राम आणि मारुतीची मंदिरे उभारणारे महात्मे आणि दानशूर असा त्यांचा लौकिक आहे. भगवान प्रभूरामचंद्रांचे निस्सीम भक्‍त प्रल्हाद महाराज रामदासी यांची आज जयंती.

वेणी ता. मेहकर जि. बुलढाणा येथील मुकुंदशास्त्री काळे आणि गंगाबाई दाम्पत्याचा सात्त्विक आणि धर्मपरायण असा लौकिक होता. त्यांच्या पोटी १८९३ मध्ये माघ अमावस्येला प्रल्हाद महाराज यांचा जन्म झाला. महाराजांचे शालेय शिक्षण रिसोड येथे झाले. त्यावेळी शाळेतील सर्व मुलांनी टोळ मारण्यासाठी आले पाहिजे, असे फर्मान निघाले. महाराजांनी तसे करण्यास नकार दिला आणि शाळा सोडली. जीवजंतूंची हत्या आपण का करायची? असा प्रश्‍न लहानग्या प्रल्हाद यांना पडला. बालवयातच त्यांचे मन आध्यात्मिक जीवनात रमू लागले. पुढे त्यांनी रिसोड जि. वाशिम येथे सखाजीशास्त्री यांच्याकडे अध्यात्मविद्येचे प्राथमिक धडे घेतले. महाराज आठ-दहा वर्षांचे असताना घरातील अंधारी खोली किंवा साखरखेर्डा येथील गुहेत जाऊन जप करत असत. बरीच रात्र झाली तरी महाराज घरी न आल्याने घरची मंडळी चिंताग्रस्त होऊन महाराजांना शोधत असत.
प्रल्हाद महाराज सद्‌गुरूचा शोध घेत होते. किन्होळा ता. चिखली येथे त्यांना गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य महाराज यांचे शिष्य रामानंद महाराज भेटले. त्यानंतर १९१० मध्ये हनुमान जयंतीदिनी साखरखेर्डा येथे प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराज यांचा अनुग्रह घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी प्रल्हाद महाराज यांचा विवाह मेहकर येथे कृष्णाबाईंशी झाला. नवदाम्पत्याने आजीवन ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून अखंड रामसेवा करायची, असा दृढसंकल्प केला आणि खरा करून दाखवला. १९२० मध्ये रामानंदांनी गृहदानाचा आदेश करताच प्रल्हाद महाराजांनी सर्व संपत्तीसह आपले राहते घर दान केले. गृहदानानंतरही ते गोदान, द्रव्यदान, सतत अन्नदान आणि नामदान करत असत.
आजीवन रामनामाचा प्रसार आणि प्रचार केला. भजनपूजन, कीर्तन, प्रवचन, उपासना, १३ कोटी रामनाम, यज्ञयाग, रामायण व भागवत सप्ताह, तीर्थयात्रा इत्यादींच्या माध्यमातून लोकांना भक्तिमार्गाला लावले. रामनामावर त्यांचा सर्वाधिक भर होता. सर्व भाविकांना ते आवर्जून सांगत, ‘रामनाम घ्या. रामराय तुमचं कल्याण करेल,’ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रल्हाद महाराज होत. त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे. १९७५ मध्ये प्रल्हाद महाराजांना पोटाचा त्रास होऊ लागला. त्यांवर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली. तथापि, प्रकृतीमध्ये उत्तरोत्तर क्षीणता येत गेली. त्यांचे नामस्मरण मात्र अखंड सुरू असे. महाराज दररोज रामनामाचा ६० हजार जप करत असत. अखेरीस कार्तिक शुद्ध ४ सन १०७९ रोजी प्रल्हाद महाराज यांनी देह सोडला. त्यांची निस्सीम रामभक्‍ती आणि तपश्‍चर्येला ‘ज्ञानबातुकाराम’ परिवाराचा प्रणाम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *