भामचंद्र डोंगर जागृत करणारे

रोकडोबा दादा यांची पुण्यतिथी

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पंढरपूर पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक २०चे संस्थापक वैकुंठवासी रोकडोबा दादा यांची आज पुण्यतिथी.

आळंदी बनली कर्मभूमी
संत तुकाराम महाराजांची तपोभूमी असणाऱ्या भामचंद्र डोंगरावर वारकऱ्यांसाठी निवारा करणारे, तिथं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणारे रोकडोबा दादा यांना वारकऱ्यांमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. आळंदीत राहून दादा अत्यंत एकनिष्ठ, निस्पृह, प्रसिद्धीपासून विरक्त जीवन जगले. दादांचे मूळ नाव रोकडोबा लिंगू मुडे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील सुगावा गावचे. स्वभावत:च विरक्त असणारे दादा गुरे राखण्याचे काम करत. कालांतराने त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगीही झाली, पण दादांची विरक्ती पुन्हा उफाळून आली आणि त्यांनी थेट आळंदी गाठली. शेवटपर्यंत ते आळंदीतच राहिले. रोकडोबा दादा प्रसिद्धी, मोहमाया यांपासून एवढे दूर होते की, माधुकरीमध्ये एखाद्या घरातून जादा भाकरी वाढली गेली तरी ते त्या घरासमोर पुन्हा जात नसत. शेवटपर्यंत त्यांनी आपला फोटो काढू दिला नाही. त्यांच्या अंत्यविधीपूर्वी काढलेला एकमेव फोटो त्यांच्या अनुयायांकडे आहे.

भामचंद्र डोंगरावर हरिनामाचा गजर
रोकडोबा दादांचे ऐतिहासिक कार्य म्हणजे त्यांनी संत तुकाराम महाराजांची तपोभूमी असलेला भामचंद डोंगर पुन्हा एकदा हरिनामाने जागृत केला. त्यांना भामचंद्रावर जाण्याची प्रेरणा वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी धोंडोपंत दादा अत्रे यांनी दिली. धोंडोपंत दादा सद्गुरू वै. गंगुकाका महाराज शिरवळकर महाराज फडपरंपरेचे शिष्य होते. संत तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ त्यांना तोंडपाठ होते. त्यांनीच सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांच्या शब्दाला वारकऱ्यांमध्ये मान होता. या धोंडोपंत दादांनी रोकडोबा दादांना भामचंद्र डोंगरावर जाण्याचा आदेश दिला. मधल्या काळात या डोंगरावर कोणी फारसे जात नसे. तिथं भुताखेतांचा वावर आहे, अशी अंधश्रद्धा पसरली होती. डोंगरावर जाऊन रोकडोबा दादांनी तुकोबारायांना ज्या गुहेमध्ये साक्षात्कार झाला, त्या गुहेमध्ये श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती बसविल्या. डोंगरामध्ये वारकऱ्यांसाठी निवारा तयार केला. डोंगराच्या पायथ्याशी हनुमानाचे छोटे मंदिर बांधले, अशी माहिती त्यांच्या परंपरेचे अनुयायी प्राचार्य दीपक मुंगसे यांनी दिली. ते म्हणाले, ‘रोकडोबा दादा एवढे समर्पित भावाने भजन करत की, तुकोबारायांनी लिहिलेल्या ‘पाषाणा पाझर सुटती रे’ या प्रमाणासारखे त्यांचे भजन होत असे. भजन सुरू झाल्यावर मग ते घड्याळाकडे पाहत नसत.

तुका म्हणे येथे भजन प्रमाण
‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण’ हे तुकोबारायांचे प्रमाण रोकडोबा दादा आयुष्यभर जगले. त्यांच्या अनुयायांनीही त्यांची ही परंपरा निष्ठेने चालविली आहे. आळंदीमधील गोपाळपुरा येथे श्री रोकडोबा दादा मठामध्ये जो हरिनाम सप्ताह होतो, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात फक्त भजन होते. कीर्तन होत नाही. अगदी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या दिवशीही काल्याचे कीर्तन होत नाही, तर भजनात फक्त काल्याचे अभंग म्हटले जातात. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर आणि रोकडोबा दादांचा स्नेह होता. दादांच्या आजारपणात दांडेकर मामांनी त्यांची काळजी घेतली.

सप्ताहांची सुरुवात
रोकडोबा दादांच्या नावाने आळंदी आणि पंढरपुरात मठ आहेत. या मठांतर्फे अनेक ठिकाणी हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते. त्यापैकी देहूला इंद्रायणीच्या ज्या डोहात तुकोबारायांच्या गाथा बुडविल्या त्या डोहाच्या बाजूचा चैत्र महिन्यातील सप्ताह, मार्गशीर्ष महिन्यातील भामचंद्र डोंगरावरील सप्ताह, फाल्गुन महिन्यातील तुकाराम बीजेचा सप्ताह, श्रावणामध्ये आळंदी आणि पंढरपुरातील मठांमधील सप्ताह, माघ महिन्यात रोकडोबा दादांच्या पुण्यतिथी निमित्त आळंदीच्या मठातील सप्ताह हे महत्त्वाचे सप्ताह आहेत. रोकडोबा दादांनी स्थापन केलेल्या रथापुढील दिंडी क्रमांक २० तर्फे आषाढी, कार्तिकीची वारी केली जाते. आषाढीच्या परतवारीमध्येही ही दिंडी सामील होते. माऊलींच्या पालखीपुढे नित्य भजनाची सेवा रोकडोबादादा दिंडीची असते. या दिंडीत प्रामुख्याने चाकणचा रासे आणि परिसर, पुणे, लातूरमधील सुगाव, नांदेड या भागातील वारकऱ्यांचा समावेश असतो.

संत नामदेव पालखी सोहळ्यासोबत वारी
कार्तिक महिन्यात आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा असतो. माऊलींच्या समाधीच्या वेळी संत नामदेव उपस्थित होते. त्यामुळे दरवर्षीच्या समाधी सोहळ्याला, कार्तिक वारीला संत नामदेवांची पालखी पंढरपूरहून आळंदीला येते. या पालखी सोहळ्यातही रोकडोबा दिंडी पंढरपूर ते आळंदी वारी करते. १९१७च्या दरम्यान रोकडोबा दादांनी माऊलींच्या सोहळ्यातील दिंडी सुरू केली. चाकणजवळील भोसे गावचे वै. शंकरराव रामजी मुंगसे या दादांच्या सहकाऱ्याने रोकडोबा दादांची परंपरा नेटाने चालविली. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र निवृत्ती शंकर मुंगसे यांनीही तो वारसा पुढे नेला. सध्या त्यांचे पुतणे आणि आळंदीच्या ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दीपक महादेव मुंगसे ही परंपरा पुढे नेत आहेत.

यशवंत जुने मामांची निष्ठा
रोकडोबा दादांनी स्वतःप्रमाणे अनेक निष्ठावंत वारकरी घडविले. त्यातीलच सध्या आळंदीतील मठात असणारे ९५ वर्षांचे यशवंतमामा जुने. ते अजूनही पंधरवड्याची आळंदी-पंढरीची वारी करतात. खणखणीत आवाजात भजन म्हणतात. रोकडोबा दादांच्या समाधीची सेवा करतात. यशवंत मामांसारखे निष्ठावंत वारकरी घडविणाऱ्या आणि संतांचे विचार समाजापर्यंत पोचविणाऱ्या वैकुंठवासी रोकडोबा दादांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने
।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार अभिवादन!🙏

1 thought on “रोकडोबा दादा पुण्यतिथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *