वात्सल्यभक्ती रुजविणारे कुडाळमधील

श्री राऊळ महाराज यांची आज पुण्यतिथी

वारकरी संतांनी समाजात ‘वात्सल्यभक्ती’ रुजवली. म्हणजेच देव आणि भक्त यांच्यात आई-मुलाचं नातं आहे, असं सांगितलं. त्यामुळं भक्त आणि देव यांच्यातील अंतर दूर झालं. म्हणूनच वारकरी देवासोबतच एकमेकांनाही ‘माऊली’ अर्थात आई संबोधतात. याच परंपरेला उजाळा देताना सिंधूदुर्ग जिल्हातील कुडाळ येथील राऊळ महाराज यांनी सर्व प्रकारच्या भक्तीमध्ये ‘आईची भक्तीच श्रेष्ठ’ असा संदेश दिला.

ब्रह्मयोगी आणि श्री गुरू दत्ताचे अवतार अशी ओळख असणाऱ्या राऊळ महाराज यांची आज पुण्यतिथी. सिंधूदुर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या लहानशा गावात जन्माला आलेले राऊळ महाराज यांना लहानपणापासून परमार्थाकडे ओढ होती. १९४५ ते १९७२ अशी २७ वर्ष कठोर ध्यानसाधना एका छोट्‌याशा खोलीत केली, असे जाणते लोक सांगतात. बालवयातच त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ केली. जगात ‘आईच श्रेष्ठ’ याचं प्रबोधन ते करत. आजही त्यांच्या गादीचे वारस आणि अनुयायी ही शिकवण जपून आचरणात आणतात.


राऊळ महाराजांचे पाळण्यातील नाव ‘कृष्ण’ असे होते. पुढे ते ‘आबा’ नावाने ओळखले जाऊ लागले. पिंगुळी ही त्यांची तपोभूमी राहिली आणि त्यांनी तेथेच जिवंत समाधी घेतली. या समाधी मंदिरालगत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मंदिर आहे. तेथे गेल्यावर पंढरीची वारी केल्याचे समाधान मिळते, असे भाविक सांगतात.
इथे श्री विठ्ठलरखुमाई मंदिराच्या बाजूलाच श्री हनुमान मंदिर आहे. या मागची संकल्पना अशी की समर्थ राऊळ महाराजांना ज्ञानेश्वरीची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांचे वंशज श्री समर्थ अण्णामहाराज मंदिरात ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सप्ताह करत असत. प्रत्येक पारायणानंतर वारकरी दिंडी काढत आणि ती दिंडी शास्त्रानुसार हनुमंताला भेटायला नेली जाते. त्यासाठी हे मंदिर उभारण्यात आले आहे.
३१ जानेवारी १९८५ रोजी राऊळ महाराज पिंगुळी क्षेत्री समाधिस्त झाले. त्यांच्या नावाने ‘परमपूज्य सद्‌गुरू समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्ट’ आणि ‘परमपूज्य अण्णामहाराज चॅरिटेबल ट्रस्ट’ स्थापन करण्यात आला. त्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते. यात प्रामुख्याने शालेय उपक्रम, वैद्यकीय उपचार, धान्यवाटप, आणि इतर सामाजिक उपक्रम राबवले जातात.
विशेष म्हणजे ट्रस्टच्या मदतीने पाण्याच्या सुविधेसाठी परिसरात विहिरी बांधण्यात आल्या आहेत. आजूबाजूच्या नद्या-ओहोळांवर दिवाळीच्या सुमारास बंधारे बांधून पाणी अडवले जाते. त्याचा उपयोग मे महिन्यात होतो. सारकारच्या मदतीने जनजागृती करत नळयोजनेद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवून पिंगुळी गाव टॅंकरमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गावकरी आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने पिंगुळी गावात अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने स्वच्छता अभियानाचा समावेश आहे. स्वच्छतेसाठी गावाला राष्ट्रपती पुरस्कार तसेच अन्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
#ज्ञानबातुकाराम
आपल्या सेवेत लवकरच येत आहे : www.dnyanbatukaram.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *