संत नामदेवरायांची जन्मभूमी
नर्सी नामदेव येथे मीठाची यात्रा
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी आजपासून म्हणजे पापमोचनी एकादशीपासून प्रसिद्ध मीठाच्या यात्रेस प्रारंभ होत आहे. यानिमित्त संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय महापूजेने यात्रेची सुरुवात
या यात्रेची सुरुवात आज (दि. २८) सोमवारी सकाळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी जी. एस. पारीसकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थानचे सचिव सुभाष हुले, तलाठी नवनाथ वानोळे, दाटेगाव सरपंच विठ्ठल माने सपत्नीक, कवी शिवाजी कऱ्हाळे, वैजनाथ पावडे, कांतराव गवते यांची उपस्थिती होती. तर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नर्सी पोलीस ठाण्याच्या वतीने सह पोलीस निरिक्षक सुनील गिरी यांच्या हस्ते नामदेवरायांच्या वस्त्र समाधीस मानाचा फेटा बांधून महापूजा करण्यात आली. यावेळी श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील तसेच मराठवाडा, विदर्भातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. मंदिर परिसरात कार्यक्रमाची सुरुवात ह. भ. प. कोकाटे महाराज जालना यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाने झाली. बुधवारी लाहीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या काल्याचे किर्तनाने यात्रेची सांगता होणार आहे.
यंदा १५ ऐवजी ३ दिवसांची यात्रा
श्री क्षेत्र नर्सी नामदेव हे ठिकाण संत नामदेवाची जन्मभूमी आहे. पापमोचनी एकादशीला या ठिकाणी दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या मंदिर परिसरामध्ये १५ दिवसांची भव्य यात्रा भरते. पूर्वीच्या काळापासून या यात्रेत मीठाचा मोठा व्यापार होत असल्याने ही यात्रा मिठाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेले दोन वर्षे ही यात्रा भरली नव्हती. यंदाही केवळ तीनच दिवस यात्रेला परवानगी देण्यात आलेली आहे. शिवाय कुस्त्यांची दंगल आणि शंकरपट यांना परवानगी देण्यात आलेली नाही. यानिमित्ताने केवळ महापूजा, नगर प्रदक्षिणा, भजन, कीर्तन, लाहीचा कार्यक्रम, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धान्याच्या बदल्यात मीठ
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेमध्ये येणारे भाविक शेतकरी सोबत आंबाड्या, मोहऱ्या, एरंड्या, बिब्बा, बरू, मटकी आदी मराठवाड्यातील कोरड्या हवेत, कमी पाण्यावर पिकणारी पौष्टिक धान्ये घेऊन येतात. त्या बदल्यात वर्षभर पुरेल एवढे मीठ खरेदी करतात. तर काही भाविक प्रसाद म्हणूनही मिठाची खरेदी करतात. सुमारे १० एकरांवर भरणाऱ्या या यात्रेत गुजरात येथील व्यापारी मीठ विक्रीसाठी आणतात. निजाम काळात स्वतंत्र परगणा आणि परिसरातील एकमेव मोठी बाजारपेठ म्हणून नर्सीला स्थान होते. आजही या यात्रेत मीठाची मोठी उलाढाल होते.
लोकवर्गणीतून भव्य मंदिर
हिंगोली शहरापासून रिसोड रोडवर १६ किलोमीटरवर संत नामदेव महाराजांची नर्सी नामदेव हे गाव आहे. या ठिकाणी अलिकडच्या काळात लोकवर्गणीतून सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून मंदिर उभारण्यात आले आहे. तसेच त्यामध्ये सुमारे ९ लाख रुपये किंमतीची संत नामदेव महाराजांच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संत नामदेव यांनी भारतभर यात्रा करून वारकरी संतांचा समतेचा विचार सर्वत्र पोचवला होता. त्यांनी पंजाबमधून घुमान येथे अनेक वर्षे वास्तव्य केले होते. त्यांनीच शीख धर्माचा पाया घातला, असे भाविक मानतात. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथामध्ये संत नामदेव महाराजांचे ६३ अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे पंजाब आणि देशभरातील भाविक नर्सी नामदेव या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
संत नामदेव महाराजांची वस्त्र समाधी
या ठिकाणी संत नामदेव महाराजांची वस्त्र समाधी आहे. संत नामदेव महाराजांनी पंढरपूर येथे समाधी घेतली. त्या समाधीला नामदेव पायरी म्हणून ओळखले जाते. नामदेवरायांचे वस्त्र त्यांच्या जन्मगावी नर्सी नामदेव येथे आणून या ठिकाणी वस्त्रसमाधी स्थापन करण्यात आली आहे. या मंदिराच्या बाजूला संत सेना महाराज यांचेही मंदिर आहे. संत नामदेव महाराजांच्या मंदिराच्या बाजूने कयाधू नदी वाहते. नर्सी नामदेव गावातील संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळाचा सध्या विकास सुरू आहे. शीख भाविकांच्या पुढाकाराने या ठिकाणी सात मजली राष्ट्रीय स्मारक बांधले जात आहे. नामदेवरायांचे जन्मस्थळ शीख भाविकांच्या अखत्यारित तर, वस्त्र समाधी मंदिराचा कारभार स्थानिक लोक सांभाळतात.
परतवारी आणि लंगर
आषाढी एकादशीनिमित्त येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कामिका एकादशी म्हणजे परतवारीच्या वेळी सुमारे तीन लाख भाविक संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी येतात. मराठवाडा आणि परिसरातून पंढरपूर येथे गेलेले भाविक परतवारीला नर्सीला आल्यानंतरच वारी पूर्ण होते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. संत नामदेव महाराज हे शीख भविकांनाही श्रद्धस्थानी असल्यामुळे नर्सी नामदेवपासून दोन किलोमीटवर भव्य गुरुद्वारा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पंजाबी यात्रेकरूंचा मोठा राबता असतो. देश विदेशातून येणारे भाविक गुरुद्वारामध्ये दर्शन घेवून संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी जातात. या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दररोज लंगर अर्थात महाप्रसाद असतो. मीठाच्या या यात्रेनिमित्ताने वारकरी विचारांची पताका देशभर फडकविणाऱ्या संत नामदेव महाराज यांना
।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!🙏