लाखो लोकांना सन्मार्ग दाखविणारे

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

जयाचा जनि जन्म नामार्थ झाला।
जयाने सदा वास नामात केला।।
जयाच्या मुखि सर्वदा नाम कीर्ति।
नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ति।।
वारकरी परंपरा असलेल्या घरात जन्म घेऊन संतांचा मानवतेचा विचार सांगत लाखो लोकांना सन्मार्ग दाखविणारे एक संत म्हणजे, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आज श्री महाराजांची जयंती.

गोंदवले महाराजांचीजन्मभूमी सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. श्री महाराजांच्या घराण्यात विठ्ठलाची भक्‍ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती. या वारकरी कुटुंबात रावजी आणि गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इसवीसन १९ फेब्रुवारी १८४५ ) या दिवशी श्री महाराजांचा जन्म झाला. पाळण्यात त्यांचे नाव गणपती असे ठेवण्यात आले. गणपतीने गुरुजींकडून अल्पावधीतच विद्या आत्मसात केली. पण, अध्यात्माच्या ओढीने नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह बाल गणपती यांनी गुरू शोधण्यासाठी घर सोडले. अकराव्या वर्षी गणूचा विवाह झाला. पण, गुरूभेटीची ओढ कायम राहिली. बाराव्या वर्षी त्यांनी पुन्हा घर सोडले.

या भ्रमणात श्री महाराजांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या. हरिपूर (सांगली) येथील साध्वी राधाबाई, मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्री स्वामी, हुमणाबादचे माणिक प्रभू, काशीचे तैलंगस्वामी, दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस यांनी गणपती यांना जवळ केले, पण ‘तुझे गुरुपद माझ्याकडे नाही’ म्हणून सांगितले. अखेर गोदातीरी श्री समर्थ संप्रदायी श्रीरामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहळेगावच्या (नांदेड) श्रीतुकाराम चैतन्यांकडे जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले. नऊ महिने तेथे त्यांनी अविरत, अविश्रांत गुरुसेवा केली. गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन अनुग्रह केला आणि ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.

सद्‌गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावले. त्यांची प्रथम पत्नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्र निर्माण केली.गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने, दुराचरण, दुराभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. आधुनिक सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्म आणि भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली. मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला. ब्रह्मचैतन्य महारांची अनेक वचने, प्रवचने प्रसिद्ध आहेत.

महाराज म्हणतात,
आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे।।
गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे।।
गोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किलोमीटरवर आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म, वास्तव्य आणि देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले आणि धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत. दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि अन्य पर्वकाळी हजारो भाविक श्रीक्षेत्र गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनास येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.