संतविचार सर्वदूर पोचविणारे

बाजीराव महाराज जवळेकर

आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे भक्‍तीरत्न, पैठणच्या गीता मंदिराचे संस्थापक अध्यक्ष, ब्रह्मचारी, निस्सीम विठ्ठलभक्‍त, अनेकांचे आजार कमी करून जन्मसंजीवनी देणारे आयुर्वेदाचार्य, रामायण-भागवत-महाभारत या ग्रंथांचे रसाळ निरुपणकार, व्रतवैकल्याचे माहेरघर असणारे तपोनिष्ठ व्यक्तिमत्व अशी चौफेर ओळख असलेले श्रीगुरू बाजीराव महाराज जवळेकर यांची आज पुण्यतिथी.

संतांचे विचार पोचविले गावोगावी
वारकरी संप्रदाय गावोगावी पोहचवण्यात बाजीराव महाराज जवळेकर यांनी अखंड कष्ट घेतले. ज्या गावात टाळ वाजला नाही, ज्या गावात एकही मंदिर नव्हतं, तिथं हजारो नागरिकांना भक्‍तीगंगेत न्हाऊन आणण्याचं सत्कार्य करणारे बाजीराव महाराज हे आधुनिक संत होऊन गेले. तीर्थक्षेत्र पैठण येथील भव्यदिव्य गीता मंदिराचे संस्थापक म्हणून बाजीराव महाराजांचे कार्य पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत पोहचवलं जाणार आहे.

‘देवाच्या आत्या’ने केला सांभाळ
बाजीराव महाराज यांचे पूर्ण नाव बाजीराव राणोजी बोचरे. तर, आईचे नाव कोंडाबाई. बीड जिल्ह्यातील जदीद जवळा ता. माजलगाव हे बाजीराव यांचे गाव. १९३७ मध्ये त्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. पण, नेमक्‍या तारखेची नोंद नाही. चिमुकले बाजीराव अवघ्या ६ वर्षांचे असताना आई-वडिलांच्या मायेला ते पोरके झाले. पुढे नात्यातल्या गंगाबाई बोचरे म्हणजेच ‘देवाची आत्या’ अशी ओळख असलेल्या माऊलीने बाजीराव यांचा सांभाळ केला. इतकंच नाही, तर बालवयातच त्यांना परमार्थाची ओढ निर्माण केली.

भंडारा डोंगरावर गाथापठण
पुढे १९५७ मध्ये बाजीराव जवळेकर यांनी तुकोबारायांच्या ओढीने थेट भंडारा डोंगर गाठला. तेथे तुकोबांचे ध्यान करत असताना अवघ्या दीड वर्षांत संपूर्ण गाथा तोंडपाठ केली. नंतर ८ डिसेंबर १९६१ रोजी आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला. तिथं ४ वर्षे अध्ययन करून परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट विठुरायाची पंढरी गाठली. तिथं धुंडा महाराज देगलुरकर, एकनाथ महाराज देगलुरकर आणि विठ्ठल महाराज घुले यांच्या मार्गदर्शनात विठ्ठलाच्या चरणी सेवा अर्पण केली. पुढे श्रीक्षेत्र ऋषिकेश इथंही त्यांनी साधना केली. तिथून परत आल्यावर १९६९ मध्ये श्री ज्ञानेश्‍वरीची १०८ पारायणं करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि तो पूर्णही केला. दिवसातून फक्‍त एकवेळी फक्‍त दूध प्राशन करून त्यांनी ज्ञानेश्‍वर माऊलींचं नामस्मरण केलं.

व्यसनमुक्तीसाठी कार्य
‘देवाची आत्या’नं सांगितल्यानुसार सामान्य जनतेला सहज परमार्थ करता यावा यासाठी परभणी, बीड जिल्ह्यांत बाजीराव महाराज यांनी गावोगावी फिरत्या निष्काम सप्ताहाची सुरुवात केली. ज्या गावात एकही मंदिर नव्हतं किंवा एकदाही टाळ वाजला नव्हता, अशी गावं निवडून त्यांनी १९७० पासून असंख्य गावकऱ्यांना ईश्‍वराच्या चरणी आणलं. शेकडो जणांना व्यसनापासून दूर नेलं. अनेक संसार टिकवून ठेवण्यात पुढाकार घेत मार्गदर्शन केलं. यामुळं कुटुंबच जोडली गेली नाहीत, तर गावच्या गावं वेळीच सावरली गेली. या गावांत-घरोघरी एकोपा निर्माण करण्यात महाराजांनी केलेलं मार्गदर्शन गावकरी आजही जोपासत आहेत.

मोहापासून राहिले दूर
बाजीराव महाराज ब्रह्मचारी राहिले. १९६२ पासून सुरू केलेलं निर्जला एकादशीचं व्रत त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत ठेवलं. महाराज आयुष्यभर विरक्‍त वृत्तीनेच राहिले. त्यांनी कधीही पैशांना हात लावला नाही, असं त्यांचे साधक-शिष्य सांगतात. कोणी दक्षिणा दिलीच, तर ती गादीखाली ठेवण्यास सांगायचे. बाजीराव महाराज हे आयुर्वेदाचार्य देखील होते. त्यांनी केलेल्या अनेक उपचारांचे प्रसंग त्यांच्या चरित्रग्रंथात सांगितला गेला आहे.

श्री गीता मंदिर उभारण्यात पुढाकार
पंढरीच्या वारीप्रमाणे बाजीराव महाराज पैठणची वारीदेखील करायचे. त्यावेळी पैठण इथं फारशा सुविधा नव्हत्या. तेव्हा पुढाकार घेऊन महाराजांनी १९९४ मध्ये लोकसहभागातून भव्य गीता मंदिर उभारणीचा संकल्प केला. शिवाय, २००७ मध्ये गीता सेवा मंडळ स्थापून पंढरपूर इथं गीता मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आलं.

वाहत्या गंगेत स्नान आणि गीता पठण
सहचारी आणि सदैव सोबत राहिलेले बन्सीबाबा उबाळे यांनी २०१६ मध्ये पुढाकार घेत बाजीराव महाराजांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला. महाराजांनी आषाढीची वारी कधीही चुकविली नाही. महाराजांचे संकल्प नेहमीच दृढ असत. त्यांनी कधीही नळाखाली किंवा स्वच्छतागृहात स्नान केलं नाही. तर, इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा अशा नदीत हरिनामाच्या गजरात ते स्नान करायचे. त्यांचा हा नियम त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत जपला.
श्री भगवद्गीतेचं दररोज पठण हा त्यांचा नित्यनेम होता. त्यांना भगवत्‌गीता खूप आवडायची. वारकरी संप्रदायात भागवत, हरिकथा, सप्ताह, रामायण असे उत्सव बाजीराव महाराज यांनीच सुरू केले. आयुष्यभर त्यांनी एसटी बसनेच प्रवास केला. एखाद्याने दान दिले, तर ते त्या व्यक्‍तीला परत करायचे. महाराजांनी १९७० मध्ये सुरू केलेल्या निष्काम सप्ताह उपक्रमाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.

कोरोनातही चुकविली नाही वारी
मार्च २०२० चा कोरोनाचा लॉकडाऊन कठोर होता. त्यामुळे आषाढी वारी चुकण्याची शक्‍यता होती. त्यावर महाराजांनी दृढ संकल्प करून अखेर पंढरपूर गाठलंच आणि विठुरायाचं दर्शन घेतलं. महाराजांना एका दुर्धर आजारानं गाठलं होतं. महाराजांवर बार्शी इथं उपचार सुरू होते. त्यावेळीही महाराजांनी आपलं निर्जला एकादशीचं व्रत जपलं. पुणे, नाशिक इथंही महाराजांवर उपचार करण्यात आले. पुढे आजार बळावला. पण, त्याचा महाराजांच्या शरीरावर काहीही परिणाम झाला नाही. पैठणचा परिसर, तिथला सहवास महाराजांना खूप आवडायचा. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी माघ शुद्ध त्रयोदशीला पैठण इथं विठुरायाच्या प्रतिमेपुढं, विष्णूसहस्रनामाच्या जयघोषात महाराजांनी देह सोडला.

हजारो शिष्यांचा परिवार
कीर्तनांच्या माध्यमातून जवळेकर महाराज यांनी हजारो भक्त, शिष्य निर्माण केले आहेत. विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल समाजभूषण, समाजसेवक आयुर्वेदाचार्य इत्यादी पदव्यांनी विविध संस्थांनी संत बाजीराव महाराज यांना सन्मानित केलं आहे. गीता मठ, शेगाव, दुमाला, पंढरपूर संस्थानचे संस्थापक म्हणूनही त्यांचे कार्य राहिले आहे.
बाजीराव महाराज यांनी राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक मंदिर तसेच मठांची निर्मिती केली आहे. भक्तांसाठी अनेक धार्मिक कार्यक्रम, ज्ञानेश्वरी पारायणाचे सोहळेदेखील मोठ्या प्रमाणात ते आयोजित करत होते. कार्तिकी, आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात भक्तांना ने-आण करण्याची व्यवस्था ते करत होते. पैठण येथील संतपीठ निर्मितीत राज्य शासनाच्या भूमिकेवर महाराजांनी अत्यंत आग्रही भूमिका कायम मांडली.

महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
महाराजांचे कार्य पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावं, यासाठी त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज (दि. १४ फेब्रुवारी २०२२) सोमप्रदोष शुभ पर्वावर करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या महाराज कराडकर यांचे कीर्तन झाले. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार गीता मंदिराचे अध्यक्ष विष्णू महाराज जगताप आणि पदाधिकाऱ्यांनी केला. महाराजांच्या कार्याला आणि त्यांच्या समर्पणाला ।।ज्ञानबातुकाराम।। वार्षिकाचे त्रिवार वंदन…🙏

(या माहितीसाठी ह. भ. वैभव महाराज राक्षे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)

लवकरच आपल्या सेवेत येत आहे -www.dnyanbatukaram.com

Leave a Reply

Your email address will not be published.