सलोख्याचा संदेश देणारी

सिंदखेडची मोरेश्वर यात्रा

आपल्याकडे गावोगावच्या यात्रा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अख्यायिकादेखील प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणच्या यात्रांना पौराणिक, तर काही यात्रांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे, सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी या यात्रा एक मोठं माध्यम आहेत. याच परंपरेत अकोला जिल्ह्याच्या सिंदखेड येथील मोरेश्‍वर यात्रा प्रसिद्ध आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी प्रथमच ही यात्रा भरत असून, ती आजपासून (दि. १३) सुरू होत आहे. त्यानिमित्त उत्सवाचा आढावा आणि मंदिराची माहिती…

चांदीच्या नाण्यांचा गालिचा
सिंदखेड येथील महादेवाचे मंदिर हेमाडपंती शैलीचे आहे. पूर्वी या मंदिराच्या आवारात चांदीच्या नाण्यांचा गालिचा होता. यावरून भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येत असत. आता येथे फक्‍त काही नाणी शिल्लक आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड असून, समोर नंदी आहे. चार खांबांवर गाभाऱ्यासमोरील मंडप उभा आहे. मंदिराबाहेर दोन्ही बाजूंनी भव्य दीपमाळ आहे.
मशिदीसारखे दिसते मंदिर
साधारणपणे मंदिर म्हटल्यावर डोळ्यांसमोर जी प्रतिमा उभी राहते, तशी या मंदिराची रचना नाही. आतून जरी हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असेल, तरी बाहेरून मात्र एखाद्या मशिदीसारखे दिसते. याला औरंगजेबाच्या काळातील एका सरदाराची अख्यायिका सांगितली जाते. त्या सरदाराला हे मंदिर पाडायचे होते. पण, गावकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर काही दैवी चमत्कार झाले. त्यामुळे या सरदाराने हे मंदिर पाडले नाही. पण, त्याने मशिदीसारखे बांधकाम केले, असे पूर्वज सांगायचे, असे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हे मंदिर कधी बांधण्यात आले असावे, याचा ठोस असा पुरावा नाही. मात्र, ‘मंदिराला कोणीही हात लाऊ नये’ असा औरंगजेबाचा संदेश असलेला शीलालेख मंदिराच्या तळघरात असल्याचे स्थानिक भाविक सांगतात.

शिव-पार्वतीच्या लग्नाचा विधी
या यात्रेतील एक महत्त्वाचा विधी म्हणजे, महादेव आणि पार्वतीचा लग्न सोहळा. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात एका पालखीत महादेव आणि पार्वती यांच्या मुकूटाची प्रतिष्ठापना केली जाते आणि विधिवत हा सोहळा साजरा केला जातो. त्यानंतर यात्रा सुरू होते, अशी परंपरा आहे. चैत्र शुद्ध अष्टमीला हा विवाह सोहळा पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, महायज्ञ आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तर, आज यात्रेचा प्रमुख दिवस आहे.

यात्रेला पंचक्रोशीतून गर्दी
सिंदखेड येथे श्रावण महिन्यातील सोमवारी भाविकांची गर्दी असतेच. पण, दरवर्षी चैत्र शुद्ध द्वादशीला भव्य यात्रा भरते. तिलाही अनेक वर्षांची परंपरा आहे. बदलत्या काळात यात्रेचे स्वरुप बदलत असले, तरी परिसरातील सर्वच गावांतील भाविक यात्रेनिमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यानिमित्त भव्य कावड यात्रेचे आयोजन केले जाते. त्याला शेकडो भाविक उपस्थित राहून कावड वाहून नेतात.

व्यापाऱ्यांना हक्‍काची बाजारपेठ
मोरेश्‍वराची ही यात्रा जशी धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे, तशीच ती व्यापाऱ्यांसाठी हक्‍काची बाजारपेठदेखील आहे. या यात्रेत लाकडी वस्तूंसह दगडी वस्तूंचा बाजार प्रसिद्ध आहे. काळानुसार, हे कारागिर आणि व्यापारी कमी झाले आहेत. पण, काही व्यापारी पिढीजात व्यवसाय म्हणून ही कला जोपासून आहेत. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे सर्वच ठप्प होते. त्यामुळे या कारागिर आणि व्यापाऱ्यांना मोठे नुकसान झाले. पण, यंदा मोठी उलाढाल होण्याची त्यांना आशा आहे.

सिद्धेश्‍वर मंदिरही आहे प्रसिद्ध
जवळच असलेल्या कोथडी येथे सिद्धेश्‍वराचे एक मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरील आवारात दगडांवर, पायऱ्यांवर चांदीची नाणी रोवली होती. नागरिकांनी भिंती आणि पायऱ्यांची रंगरंगोटी केल्यामुळे ही नाणी दिसत नाहीत. या मंदिरातही महादेवीची पिंड असून, बाहेर दीपमाळ आहेत. मंदिरातील पुरातन मोठी कणगी बघण्यासारखी आहे. मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. या मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी होते. यात्रेत गुळाची प्रसिद्ध रेवडी मिळते. महादेवाला प्रिय असणारी दवणा वनस्पतीही मिळते जी उष्माघातावर उपयोगी ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *