लोककलांच्या माध्यमातून संतांनी

वारकरी विचार सर्वत्र पोहचविले

शेक्सपिअरचे १९१६ मध्ये निधन झाले. ज्या वेळेला शेक्सपिअरची नाटके इंग्लंडला गाजत होती, त्या वेळी महाराष्ट्रामध्ये नेमके काय चालले होते? तर त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये संत एकनाथमहाराज हे ज्ञानेश्‍वरीची प्रत शुद्ध करत होते. जेव्हा शेक्सपिअरची नाटके तिथे गाजत होती, त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ अंगणाअंगणामध्ये वासुदेव, गोंधळी, भराडी, कोल्हाटी यांच्या माध्यमातून स्वतंत्र थिएटर उभे करत होते. लोकपरंपरेचा हात धरून संतानी मानवतेचे वारकरी विचार असे गावोगावी पोहचविले.

– प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

लोकसाहित्य म्हणजे परंपरेने मौखिक स्वरूपात चालत आलेले अपौरुषेय साहित्य. समूहमनाचा भावोत्कट, सहजोद्गार म्हणजे लोकसाहित्य. लोकसंस्कृतीचा शाब्दय आविष्कार म्हणजे लोकसाहित्य. लोकसाहित्य म्हणजे नित्य वर्तमान. ज्याची बैसका परंपरेने सुनिश्चित केलेली असते; या लोकसाहित्याचे निर्वहन पिढ्यान्पिढ्या होत आलेले आहे. वनसंस्कृती, ग्रामसंस्कृती आणि नागरसंस्कृती या तिन्ही अवस्थांमध्ये लोकसाहित्याचा आढळ होतो. परंपरेचे विज्ञान आणि लोकसंस्कृतीचा चालता बोलता इतिहास म्हणून लोकसाहित्याकडे पहिले जाते. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत उल्लेख केल्याप्रमाणे ‘तुझिये जीविचे माझीये जीवि पडो’ ही आंतरिक ऊर्मी लोकसाहित्यात असते. या ऊर्मीला ‘हिरिताचं देणं घेणं’ असं बहिणाबाईंनी म्हटलं आहे. लोकसाहित्य म्हणजे हृदयसंवाद. जेव्हा आपण संतसाहित्याचा विचार करतो तेव्हा लोकसाहित्याला आदिसाहित्याचा मान द्यावा लागतो.

लोकसाहित्यात मुख्यतः लौकिकाचा विचार आहे. भौतिकाचा जागर आहे. सकाम भक्तीच्या प्रेरणा आहेत. तर संतसाहित्याची बैसकाच मुळात लौकिकाऐवजी पारलौकिकाच्या आणि भौतिका ऐवजी आदी भौतिकाला कवेत घेणारी आहे. संतसाहित्य चैतन्य स्वरूप आहे. लोकसाहित्य मूर्त तर संतसाहित्य अमूर्ताचा वेध घेणारे आहे. ‘भोग भोगिताची आटला भोग। ज्ञान गावोनि गावा गोविंद।।’ अशी संत साहित्याची धारणा आहे. त्यासाठी संकटमोचन करणार्‍या क्षेत्रपाल देवतांचे विधी ही लोकसाहित्यातल्या विधीनाट्याची, कुळधर्म, कुळाचारांची धारणा आहे. लोकसाहित्याची, लोकसंस्कृतीची मोहिनी मध्ययुगीन समाजावर होती त्यामुळे संतांनी लळीत, भारूड आदी संकीर्तन प्रकारांत लोकधर्मातील सर्व धारणांचे, समाजाच्या स्थितिगतीचे, रूढी, परंपरांचे, लोकाचारांचे अतिशय समर्पक उपयोजन केले. ‘शेंदरी हेंदरी दैवते। कोणी पुजती भुते खेते।।’ असे म्हणत असतानाच लोकसंस्कृतीतील अनिष्ट चालीरितींचा अधिक्षेप संत तुकाराम, संत चैतन्य महाप्रभू, संत एकनाथ, संत बलवेश्‍वर, संत शेख महंमद बाबा, श्री गोंदेकर आदी संतांनी केला आहे; पण तो करताना क्षेत्रपाल देवतांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. त्यामुळे संत म्हणतात, ‘अवघा क्षेत्रपाल पूजा या सकळ’, संतांची भारुडे ही पारमार्थिकृत लोकसाहित्य असल्याचा महत्त्वाचा विचार संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे साक्षेपी संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी दिला. संतसाहित्यातील लळीत, भारुडांमध्ये लोकसंस्कृतीच्या धारा व्यक्त झालेल्या आपणास दिसतील. लळितात लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब पडले आहे.
लळीत : ‘सोंग आणून केलेले कीर्तन’ अशी लळिताची व्याख्या केली जाते. लोकोत्सवाचे लळीत म्हणजेच दशावतारांचे लळीत. सांप्रदायिक लळीत, कीर्तनाचे लळीत, नामसप्ताहाचे लळीत, काल्याचे लळीत असे लळिताचे प्रकार आहेत. संत तुकाराममहाराजांच्या अभंगात लळिताचा अभंग आहे. ‘गळीत झाली काया। हेचि लळीत पंढरीराया।।’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे. ‘स्व’चे विसर्जन आणि ईश्‍वराचे सोंग आणि संकीर्तन हाच लळिताचा गाभा असतो.
लळितातील भारुडे ही केवळ वारकरी संप्रदायातील संतांचीच भारुडे नसतात; तर नाथ, महानुभव, दत्त आणि समर्थ अशा संप्रदायांचा प्रभावही लळितावर पडलेला दिसतो. किंबहुना वेगवेगळ्या संप्रदायांची लळिते वेगवेगळी असतात. अंबाजोगाई येथील दासोपंतांची लळिते, गोंडी भागातील रामानंद स्वामींच्या संपादन्या, तलावडा येथील एकाशिवरामांची सोंगाची पद्यरचना, कसबे तलवडे येथील जगन्नाथ स्वामींची लळितांची आख्यानरचना, सारंगखेडा येथील नित्यानंद स्वामींची लळिते, सांगली येथील गणपती मंदिरातील लळिताची परंपरा, पुणे जिल्ह्यातील उंब्रज, नारायणगाव, पिंपळगाव येथील वारकरी लळिताची परंपरा अशा विविध परंपरा अस्तित्वात आहेत.
श्री रामजन्म आणि हनुमान जयंती या जन्मोत्सवात सादर होणार्‍या कीर्तनानंतर लळीत सादर करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा प्रदेशात लळिताची विविध संप्रदायांची परंपरा आढळते. वेदान्तोपदेश हा लळिताचा मूळ उद्देश होता व त्यात करमणुकीसाठी काही सोंगे आणण्यात येत. धार्मिक उत्सवाच्या शेवटी हौशी मंडळी हा कार्यक्रम करीत. त्यात करमणूक म्हणून छडीदार, भालदार, चोपदार, वासुदेव, दंडीगान, गोंधळी, वाघ्या-मुरळी, बहिरा, मुका, आंधळा हे पंचवीस-तीस सोंगे आणत. त्याचप्रमाणे दशावतारांची लीलाही दाखवीत. लळिताचा शेवट सामान्यतः रामाकडून रावणाचा वध करण्यात येई. लळीत हे अभिजन आणि बहुजन या दोन्हीही संस्कृतीचा संघर्ष आणि समन्वय असते. पंढरीच्या वारीत रात्री मुक्कामाच्या ठिकाणी लळिते आणि भारुडे सादर करण्याची परंपरा आहे. लळितात संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचा सुंदर समन्वय झालेला आढळतो. मध्ययुगीन कालखंडातील लोकधारणा, रूढी-परंपरा, संप्रदाय, पंथ, उपपंत, भाषा, बोली, प्रदेश या सर्वांचा संकर म्हणजे लळीत. सामाजिक दंभाचा स्फोट म्हणजे लळीत होय. अभिजन आणि बहुजन यांच्या परंपरांचा संघर्ष, संवाद आणि समरसता म्हणजे लळीत होय.
भारूड :
संतांची रूपकाश्रयी अभंग रचना म्हणजे भारुडे. या भारुडांमध्ये लोकखेळ, पशुपक्षी, वृत्ती-प्रवृत्ती, स्त्रीमन, जानपद संस्कार, लोकपुरोहित यांच्यावर अनेक रूपकाश्रयी अभंग आढळतात. मध्ययुगीन लोकसंस्कृतीचे, समाजाचे प्रतिबिंब भारुडात पडलेले आढळते. काही भारुडे पहिली तर आपणास याचे प्रत्यंतर येते. लळितात जसे हिंदुस्थानी, कानडी, फारसी, हिंदी, गुजराती आदी भाषांचे दर्शन होते, तसेच हिंदुस्थानी पदांचे दर्शन भारुडातही होते. यामागे लोकसाहित्याचीच प्रेरणा आहे. संत एकनाथांनी लोकखेळांवर लिहिलेली भारुडे अशी –
हुतुतु :
‘गाई चारी कान्होबा॥ गोपाळा सांगाती उभा॥ अनुपम्य त्याची शोभा॥ नाचती प्रेमानंदें॥ गाताती गीत छंदे॥ मन वेधिले परमानंदे रे कान्होबा॥ भला कान्होबा भला भला कान्होबा भला॥

टिपरी :
‘दोन टिपरी एकचि नाद॥ सगुण निर्गुण नाहीं भेद रे॥ कुंसरी आंगे मोडतीत परी॥ मेळविती एका छंद रे॥ कांहींच न जें वाया रे॥ खेळिया एकची बळवंत अवधीया रे॥ सम विषम तेथें होऊंच नदी रे॥ तेच जाणऊनि आगळिया रे॥ संतमहंत सिद्ध खेळतील घाई॥ तेच सांभाळी माझ्या भाई रे॥ हात राखोन हाणिती टिपर्‍या॥ टिपर्‍या मिळोन जाय त्याची सोई रे॥
फुगडी :
‘फुगडी फू बाई फुगडी फू॥
एक नाम मांडी बाई द्वैत नाम सांडी॥
निजब्रह्म तूं गे॥
हरी आला रंगा बाई॥ वैष्णवांच्या सांगा॥

एकनाथांनी लिहिलेली लोकगीते किंवा ज्ञानपदगीते अशी –
दळण :
‘येईहो कानाई॥ मी दळीन एकली॥ एकली दळितां शिनले हात लावी वहिली॥ वैराग्य जाते मांडुनीं॥ विवेक खुंट थापटोनी॥ अनुहात दळण मांडुनी॥ त्रिगुण वैरण घातलें॥ येई.. ॥ स्थूळ सूक्ष्म दळियेलें॥ ओट मात्रेसहित॥ येई.. ॥
चोखोबांनी लिहिलेले रहाटावरील रूपकात्मक भारूड असे –
‘माझा रहाट गं बाई साजणी॥ गातों चौघी जणी॥ माझ्या रहाटाचा बाई कणा॥ माझ्या चवघी जणी सुना॥ तुम्ही शेता कां ग जाना॥ हुरडा लोंबी कां गं खाना॥ तुम्ही बळेच झोंबीं कां ध्याना॥ गं बाई साजणी॥ गातो.. ॥ माझ्या रहाटाचें बाई चाक॥ माझा पती मोठा हटघाट॥ मारिली ढुंगणावरती लाथ॥ पडलें उंबरठ्याचे आंत॥ पडले पुढले दोनी दांत॥ गं बाई साजणी॥ गातो..॥
भारुडांची विविधता :
भारुडातील विविध विषय पाहिल्यास आपल्या लक्षात येते की, हे सर्व विषय तत्कालीन लोकजीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी निगडित आहेत. कारण आध्यात्मिक उद्बोधनासाठी, समाजप्रबोधनासाठी संतांनी हे विषय आपलेसे केले. एकनाथांसह अन्य संतांच्याही भारुडांमधून संत एकनाथकालीन समाजाचे दर्शन होते. ब्राह्मणांनी तसेच अन्य लोकपुरोहितांनी कर्मठपणा वाढविला होता. त्याचे दर्शन एकनाथांच्या भारुडात प्रत्ययास येते, ते असे –
‘कोणासी न कळे अवघे जहाले मूढ|
म्हणती हे गूढ वाया शास्त्र॥
आपुलाला धर्म नाचरती जनी|
अपीळ धरणी पीक न होय॥
पुरोहितांनी कर्मठपणा वाढविला होता. स्नानसंध्या, वेदपठण, अग्निहोत्र इ. त्याग करून जारण, मारण, उच्चाटन या कामात ते गुंतले होते.
‘स्नानसंध्या शौचाचार| स्वधर्म नावडे साचार|
कनकफळ नाम गोमटे| बहिर आता दिसे काटे|
ऐशी आचारहीन बापुडी| एका जनार्दनी न धरी जोडी॥
नवल दंभाचे कौतुक| अग्निहोत्री म्हणती यासिक|
मंत्रतंत्राची कथा कोण| मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण|
दांभिकांची भक्ती दावं| एक जनार्दनी नारी ठाव॥
मानभाव :
‘होऊन मानभाव| अवघा बुडविला ठाव॥
नेसोनिया काळेपणा| अंगा लाविती दूषण॥
एका जनार्दनी देवा| जळो जळो त्यांची सेवा॥
पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, चौधरी, चौघुले, महाजन आदी मंडळी व्याजबट्ट्याचा व्यवहार करून लोकांना लुबाडत होती. समाजातील दंभ आणि ढोंग वाढले होते. या सर्वांचे दर्शन एकनाथांच्या भारुडामध्ये होते. संत एकनाथांची भारुडे ही तत्कालीन समाजाचे दर्शन घडविणारी भारुडे होती. नाथांची भाषा सरळ, सोपी आहे. लोककला आणि या लोककलांच्या लोकभाषा नाथांना ज्ञात होत्या. त्यामुळे त्यांची भारुडे अधिक लोकप्रिय झाली.
डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासोबत भारुडाबद्दल प्रत्यक्ष चर्चा केली असता, काही ठळक मुद्दे समोर आले ते असे-
या महाराष्ट्राला समृद्ध अशी संतांची परंपरा लाभली. संतांची भूमिका ही केवळ तत्त्वचिंतनाची नव्हती, तर खर्‍या लोकशिक्षणाची होती. म्हणून सामान्य माणसाला कळणारी भाषा आणि त्यांना समजणारे विचार देणे गरजेचे होते. ज्ञानदेवांच्या अगोदरपासून, समाजाला काहीतरी सांगणारा, शिकविणारा आणि जाता जाता प्रबोधन करणारा असा एक वर्ग या महाराष्ट्रामध्ये होता. वाघ्या-मुरळी, भराडी, गोंधळी, कोल्हाटी, फकीर, पांगळा, पिंगळा, आंधळा, बहिरा, भट, भटीण, कडकलक्ष्मी, बैरागी हा सगळा वर्ग गावगाड्यामध्ये येत होता. लोकांशी बोलीभाषेमध्ये बोलत होता. आपल्या पारंपरिक लोककलांमधून लोकांचे मनोरंजन करत होता. कोणी खेळ करत होता, कोणी गाणी गात होता. लोकांशी संवाद होता. त्यांचा प्रचंड मोठा लोकसंपर्क होता.

एकीकडे, या सगळ्या भूमिका या गावगाड्यामध्ये अतिशय लोकप्रिय अशा भूमिका होत्या आणि दुसरीकडे, संतांना आपले विचार सामान्यांपर्यंत मांडण्यासाठी एक माध्यम हवे होते. संतांनी प्रबंध रचना केली. आपल्याकडे प्रबंध रचना हा एक वेगळा भाग आहे. सगळ्या संतांच्या प्रबंध रचना अतिशय सुंदर आहेत; पण संतांच्या प्रबंध रचनेबरोबर संतांच्या खर्‍या अर्थाने लोकांशी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी त्या प्रबंधाबरोबर अभिव्यक्तीसाठी एक वेगळे माध्यम हवे होते. लोकसंवादाचे माध्यम पाहिजे होते आणि त्या वेळेला या सगळ्या लोकभूमिका या गावगाड्याबाहेर येत होत्या. मग विशेषत: या सर्व लोकभूमिकांचा संतांनी फार बारकाईने विचार केला आणि गावगाड्यात आलेल्या या सर्व लोकभूमिकांमध्ये या प्रतीकात्मक लोकभूमिकांमध्ये रूपकात्मक पद्धतीने तत्त्वज्ञानाची, आध्यात्मिक विचारांची, नीतितत्त्वांची, विवेकाची मांडणी करीत करीत मराठीमध्ये ही भारुडे जन्माला आली.
आता ही भारुडे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. एक रंगमंच आहे. म्हणजे नाथांनी जो विचार केला – म्हणजे वाघ्या-मुरळी, भराडी, गोंधळी, कोल्हाटी, फकीर, पांगळा, पिंगळा, आंधळा, बहिरा, भट, भटीण, कडकलक्ष्मी, बैरागी या सगळ्यांच्या माध्यमातून अंगणाअंगणामध्ये एक थिएटर उभे केले. एक रंगमंच उभा केला. म्हणजे १९१६ साली शेक्सपिअरचे निधन झाले. ज्या वेळेला शेक्सपिअरची नाटके इंग्लंडला गाजत होती, त्या वेळी महाराष्ट्रामध्ये नेमके काय चालले होते? तर त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये संत एकनाथमहाराज हे ज्ञानेश्‍वरीची प्रत शुद्ध करत होते. जेव्हा शेक्सपिअरची नाटके तिथे गाजत होती, त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ अंगणाअंगणामध्ये वासुदेव, गोंधळी, भराडी, कोल्हाटी यांच्या माध्यमातून स्वतंत्र थिएटर उभे करत होते. म्हणजे एकीकडे कीर्तन परंपरेचा भाग, एकीकडे अध्यात्म परंपरेचा भाग, एकीकडे नृत्यनाट्य संगीत परंपरेचा भाग आणि एकीकडे लोकसंस्कृतीचा भाग अशा वेगवेगळ्या अंगांनी भारूड या प्रकाराकडे पाहावे लागेल.

मराठीमध्ये पहिले जे भारूड लिहिले गेले, ते आद्य भारूड हे ज्ञानदेवांचे.
‘एका काट्याच्या आणीवर बसली तीन गावं
दोन ओसाड बा एक वसेचिना
वसेचिना वसेचिना तेथे आले तीन कुंभार
दोन आंधळे एका दिसेचिना’
हे ज्ञानदेवांचे भारूड आहे. म्हणजे ज्ञानदेवांनासुद्धा भारुडाच्या माध्यमातून काहीतरी विनोद आणि विनोदाच्या अंगाने तत्त्वज्ञान सांगावे असे वाटले. नामदेवांची भारुडेही आहेत. चोखोबांची भारुडे आहे. जनाबाईंची भारुडे आहेत. एकनाथमहाराजांची भारुडे आहेत. तुकाराममहाराजांची भारुडे आहेत. दासतुका आहे, चिदंबरदास आहे, मध्वमुनीश्‍वर, माणिकप्रभू आहेत, शेख महम्मद, बाबा श्रीगोंदेकर आहेत, रामदास स्वामी आहेत. या सर्वांची भारुडे आहेत. बहुतेक संत संप्रदायांनी लोकसंपर्कासाठी, लोकसंवादासाठी भारुडांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. भारुडामध्ये एकीकडे सुंदर नृत्य आहे, दुसरीकडे नाट्य आहे, संवाद आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निरूपण प्राधान्य पद्धतीने तत्त्वज्ञानाची मांडणी केली गेलेली आहे. भारूड हे निरूपण प्राधान्य असणारे एक सुंदर नाट्य म्हणावे लागेल.
वासुदेवाला आपण भारुडामध्ये उभा केला, तर खूप काही संदेश भारुडाच्या माध्यमातून देता येतील. वासुदेवात ज्ञानदेवांचे भारूड आहे. तुकोबारायांचे भारूड आहे. नामदेवांचे भारूड आहे आणि नाथांची तर खूपच भारुडे आहेत. वासुदेवांच्या संपूर्ण व्यक्तिरेखेला व संपूर्ण परंपरेला साजेसे रूपक या भारुडामध्ये नाथांनी फार सुंदर पद्धतीने मांडले आहे. फार सुंदर वासुदेवाचे रूपक नाथांनी उभे केलेले आहे. इतर संतांनीही उभे केलेले आहे. ‘कर जोडोनी विनवीत तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नको गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसुदना’ आणि संपूर्ण मानवी जीवनाचे गणित मांडतो. ‘दुर्लभ नरदेह जाणा शतवर्षाची गणना’ त्यामध्ये ‘दु:ख-यातना तुम्ही आठवा मधुसुदना कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा’ आणि त्या वासुदेवाला जेव्हा दान दिले जाते, तेव्हा वासुदेव सर्व देवदेवतांची नावे घेतो. दान पावलं दान पावलं किती देवांची नावे असे.

गावगाड्यामध्ये जोशी येतात. जोशी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. किती प्रकारची जोशी नाथांनी उभे केले आहेत. सरवळे जोशी, सारुडे जोशी, डाकोत जोशी, डंकन जोशी, कुरघुडे जोशी, हुडके जोशी… कितीतरी प्रकारचे जोशी आहेत. जे निसर्गामध्ये घडतेय तसा तो आडाखा बांधायचा आणि गावातून लोकांना सांगायचा, असे एक सुंदरसे भारूड आहे. ‘मी आलो रायाचा जोशी होरा ऐकाजी मायबाप, आलो रायाचा जोशी होरा ऐका जी मायबाप, इथून पुढे बरे होईल भक्तिसुखे दोंडवाहे फेरा चौर्‍याऐंशीचा चुके क्षण मोकाशी धन मोकाशी आलो रायाचा जोशी होरा ऐका जी मायबाप’ आणि तो जीवनाचा, विवेकाचा होरा असा होता. म्हणजे विवेकाचा होरा सांगणारा जोशी आहे.
समाज बुवाबाजीने गांजलेला होता. दारिद्र्याने पिसलेला होता. भेदाभेदाने भंगलेला होता. या समाजाचे स्वास्थ्य राखायचे होते, तेव्हा नाथांनी कडकलक्ष्मीला आणले. बये दार उघड म्हणून. आता हे समाजस्वास्थ्य बघ कसे चाललेले आहे, गावगाड्यामध्ये केवढा मोठा अहंकार माजलेला आहे, बहुजन – महाजनांमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आहे, रयतेला लोक लुटतात, अत्याचाराने, भ्रष्टाचाराने, दुराचाराने सगळा समाज पोखरला. आता तू दैवी शक्तीने प्रकट होणे गरजेचे आहे, म्हणून बये दार उघड, दार उघड. म्हणजे तुझे निरूपणाचे दार जे लावले आहे, ते उघड आणि सगुणात प्रकट हो. ‘ओम् नमो भगवती मूळ माये तू आदिशक्ती अनादिसिद्ध मूळ प्रकृती बये दार उघड. वेताळ फेताळ कंकाळ मारकोबेस कौबैराळ जागाई जोखाई क्षेत्रपाळ महिषासुर मातला प्रबळ अबबबब अंबे पीडा केली फार|’ नाथांनी किती सुंदर सामाजिक मूर्ती या भारुडातून जागविलेली आहे. जागल्या नावाचे भारूड आहे.

जागल्या नावाची एक भूमिका होती. रात्रभर गावात जागे राहायचे आणि गावाला जागते ठेवायचे. संतांनी जागते ठेवलेले आहे. त्यामुळे या भारुडाच्या माध्यमातून हा विवेकाचा होरा सांगणारा जोशी असेल किंवा अशा अंधश्रद्धेवर, अविवेकावर कडक मारा करणारी कडकलक्ष्मी असेल; हातांमध्ये विवेकाचा कडका घेतला आणि अंगावरती फटका मारते ती कडकलक्ष्मी असेल; वासुदेव हरिनामाची संबळ वाजवणारा गोंधळ्या असेल; अज्ञानाचा पोत पाजळणारा भुत्या असेल; अज्ञानाने आत्मदृष्टीत आलेले अंधत्व असेल आणि जीवनाला पंगुत्व आलेला पांगुळ असेल… या सगळ्या भूमिकांना एका उदात्त भूमिकेवर लिहिले आणि कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन जेवढ्या उंचीवर निरूपणाच्या अंगाने तितक्या उंचीवर भारुडांना नेले. आजही भारुडाची लोकप्रियता कमी झालेली नाही, अशी नाथांची भारुडे, इतर संतांची भारुडे यांच्या आणि आज आपल्या भारुडांच्या संपादनीमध्ये आजचे विषय हाताळता येतील. नवीन चाललेल्या सामाजिक विकृतींवर भाष्य करता येईल, त्याच्यावर आपल्याला मोठा आघात करता येईल. हे सगळे करूनसुद्धा आपल्याला एक वेगळा संदेश समाजाला प्रबोधनाच्या अंगाने मांडता येतो. त्यामुळे एकीकडे आध्यात्मिक प्रबोधन, एकीकडे सामाजिक प्रबोधन आणि एकीकडे कीर्तन परंपरेचा भाग, संत परंपरेचे सुंदर असे शृंगारले दान. भारूड म्हणजे जसे ज्ञानदेवांच्या अभंगामध्ये त्यांच्या ज्ञानमूर्तीच्या अनुभूतीचा, म्हणजे अभंगसृष्टीमध्ये ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळतो, तुकोबारायांच्या आत्मसुखाच्या खुणा डोकावतात, तसेच नाथांच्या लोकभूमिकासुद्धा आपल्याशी संवाद साधतात आणि या संत परंपरेचे अतिशय वेगळे रूप, अतिशय लोकाभिमुख रूप आणि सगळ्यांशी बोलणारे असे रूप ते म्हणजे भारूड आहे.
भारूडकार – ‘मेल्यावर डोळं जातील म्हणतंय. अरे, मेल्यावर तर सगळ्यांचेच डोळं जातं ना रे भावं. द्यायला काही नाही म्हणतंय. द्यायला भरपूर आहे भाऊ, पण देण्याचा भाव असावा. मेल्यावर तर तुमचं-आमचं सगळ्यांचंच डोळं जाईल ना, पण जर हे दोन डोळं मरायच्या आधी जर दान केलं, तर किमान दोन आंधळ्यांना दुनिया दाखवण्याचं पुण्य पदरी नाही का पडणार? एवढं मोठं सत्तर, ऐंशी किलोचं बॉडी दिलं परमात्म्यानं, किमान एखाद्या दवाखान्याला दान केलं तर किमान एखादा डॉक्टर नाही का तयार होणार जनतेची सेवा करायला? द्यायला भरपूर आहे भाऊ, पण देण्याचा भाव पाहिजे. द्यायचं तर देऊ नको, पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील ना भाऊ?’
साथीदार – ‘फुकटचं आहे ना?’
भारूडकार – ‘बघा.. मराठी माणूस. म्हणतात ना भाऊ विकतचं असलं तर घेईना कोणी आणि फुकटचं असलं की बाप-लेक दोन्ही. अरे, फुकटचं तर फुकटचं, तू जर माझं ऐकून घेतलं ना तर बुरगुंडा होईल. ’
लळीत आणि भारुडे ही लोकसाहित्य आणि संतसाहित्याची दोन्ही नेत्रे आहेत. लोकसाहित्यातील अनिष्ट संतसाहित्याने वगळले आणि लोकधर्माचा अध्यात्म प्रबोधनासाठी उदोकार केला. लोकसाहित्य आणि संतसाहित्य यांचा भीमा-भामा संगम हे महाराष्ट्राच्या या धर्म आणि संस्कृतीचे निश्चितच वैभव आहे.

(‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकातून साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *