राज्य सरकारची अर्थसंकल्पात तरतूद

पुणे : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे पुनर्लेखन करणारे आणि त्यांचे मुख्य टाळकरी, थोर विठ्ठलभक्‍त अशी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची ओळख आहे. मावळातील सदुंबरे या गावात जगनाडे महाराज यांची समाधी आहे. या तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे परिसरातील भाविकांत आनंदाचे वातावरण आहे.

विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे आता समाधीस्थळ सुशोभीकरण, वारकरी, भक्‍त आणि पर्यटकांसाठी आवश्‍यक कामे, गावातील रस्ते-वीज-पाणीपुरवठा, मंदिर परिसरात घाट, कारंजे आणि पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सुदुंबरे गावाचा समावेश यापूर्वी देहू तीर्थक्षेत्र आराखड्यात केला होता. संस्थेने ४० कोटींचा बनवलेला विकास आराखडा सरकारला सादर केला होता.

येथे गवरशेठ महाराज वाणी यांचेही समाधीस्थळ आहे. दरम्यान, राज्य शासनाने यापूर्वी तीर्थक्षेत्र देहू ते सुदुंबरे, सुदवडी आणि श्रीक्षेत्र भंडारा डोंगर हे रस्ते तयार केले आहते. यापूर्वी संताजी महाराज जगनाडे समाधी स्थळ, भक्त निवास आणि सभामंडप अशी कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे या निधीतून मार्गी लागणार आहेत, असे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे, संजय गाडे, प्रशांत भागवत यांनी सांगितले.

सुदुंबरे हे आदर्श गाव
सुदुंबरे गाव पंतप्रधान सांसद आदर्श गाव योजनेत समाविष्ट आहे. खासदार वंदना चव्हाण यांनी सुदुंबरे गावाची निवड केली होती. खासदार वंदना चव्हाण यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा इमारत व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

गाथा पारायणाची परंपरा
साधारण १९२३मध्ये सुदुंबऱ्यात संस्थानच्या कामाची सुरुवात झाली. त्यानंतर या मंदिर व परिसराचा विकास होण्यास सुरुवात झाली. आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे कीर्तनकार आणि विद्यार्थी संत संताजी महाराज समाधी मंदिरात मागील ५५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून गाथा पारायण आणि सोहळ्याचं आयोजन करतात. या ठिकाणी साधक म्हणून मुक्कामही करतात. आतापर्यंत संत संताजी महाराज मंदिरातून शेकडो कीर्तनकार घडले आहेत आणि हे कीर्तनकार देशभर कीर्तन सेवेतून समाज प्रबोधन आणि संतांचे विचार समाजापर्यंत पोचवत असतात.

कीर्तनकारांची वर्षातून एकदा तरी हजेरी

नथूसिंगबाबा महाराज राजपूत यांनी ही परंपरा सुरू केली. शांतिब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर आणि सुखदेव महाराज यांच्यापर्यंत ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. संत संताजी महाराज मंदिरात महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांनी आपला अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि म्हणून हे सर्व कीर्तनकार वर्षातून एकदा संत संताजी महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी हजर राहतात.

संताजी महाराजांच्या सुदुंबरे ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याची परंपरादेखील जुनी असून, साधारण १९८०च्या आसपास सोहळा सुरू झाला. या सोहळ्यात महाराजांच्या पालखी समवेत १५ दिंड्या पायी चालत असतात. संताजी महाराज हे मूळचे चाकणचे. सुदुंबरे हे त्यांचे आजोळ. त्यांच्या उतारवयात ते सुदुंबऱ्यात वास्तव्यास होते.

संतांजी महाराजांवर टपाल तिकीट
संताजी महाराज जगनाडे यांच्यावर केंद्र सरकारनं टपाल तिकीट काढले आहे. राज्य सरकारने महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा अध्यादेश काढला आहे. महाराजांच्या गाथा लिहित असतानाच्या फोटोला अधिकृत दर्जा दिला असून, शासकीय प्रेसमध्ये फोटो उपलब्ध आहेत.

येत्या काळात संत संताजी अध्यासन समिती नोंद करून त्यातून महाराजांचे अप्रकाशित ग्रंथ, शोधनिबंध प्रकाशित करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *