तुकोबारायांच्या घरी देव जेवले

फाल्गुन शुद्ध दशमीला कण्या

कण्या भाकरीचे खाणे।
गाठी रामनाम नाणे।।
आज फाल्गुन शुद्ध दशमी. आजच्या दिवशीच देव श्री विठुराया आपल्या लाडक्या भक्ताच्या म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या घरी जेवायला आला आणि गरीबाघरच्या कण्या खाऊन तृप्त झाला! आजच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्याचा शुभारंभ…

गरीबाघरी जेवायला आला ब्रम्हांडनायक
सधन, सावकार असलेल्या तुकोबारायांनी त्याकाळी पडलेल्या भीषण दुष्काळात घरातील होते नव्हते ते सर्व धन, धान्य लोकांना वाटून टाकले होते आणि स्वतः कफल्लक होऊन बसले होते. पण तुकोबारायांच्या मनाच्या श्रीमंतीपुढे कुबेराचे वैभव थिटे होते. म्हणून तर सर्व विश्वाचा सांभाळ करणारा ब्रम्हांडनायक श्री विठ्ठल त्यांच्या घरी जेवायला आला. देवाला जेवू घालायला घरात काही पक्वान्न वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्याकाळी गरिबांचे अन्न असलेले जे श्रीमंतांच्या लेखी कदान्न होतं, तेच माऊली जिजाईने रांधले. म्हणजे ज्वारी भरडून तिच्या कण्या पाण्यात शिजविल्या. तुकोबारायांनी स्वहस्ते या कण्या विठुरायाला भरविल्या. देवानेही त्या आनंदाने खाल्ल्या. या प्रसंगाची आठवण म्हणून देहूकर आणि गावोगावचे वारकरी ज्वारीच्या कण्यांचा नैवद्य देवाला दाखवितात आणि स्वतः प्रसाद म्हणून भक्षण करतात.

या प्रसंगाचे आणि आपल्या दुबळ्या परिस्थितीचे वर्णन करणारा अभंगच संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवला आहे.
पाहुणे घरासी। आजी आले हृषीकेशी।।
काय करू उपचार। कोप मोडकी जर्जर।।
कण्या दरदरीत। पाण्यामाजी रांधिल्या।।
घरी मोडकिया बाजा। वरी वाकळांच्या शेजा।।
मुखशुध्दीसी तुळसी दळ। तुका म्हणे मी दुर्बळ।।

पणतू गोपाळबुवांनी केले ओवीबद्ध निरूपण
तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळबुवा यांनी तर या प्रसंगाचे ओवीबद्ध निरुपण केले आहे.
तो तुकया पातला निज मंदिरी।
स्त्रियेसी म्हणे पाक सत्वर करी।
ते धान्यावाचून नाही घरी।
साहित्य तिळभरी दुजे काही।।
तुकया म्हणे आहे ते बरे।
कण्या करुनी अती सत्वरे।
वेगी जेऊ घाली संत सोईरे।
रुक्मिणिवर श्रीरंग।।
तिने कण्या शिजउनी वेगेसी।
पाचारा म्हणे पाहुणियांसी।
तुकयाने बोलाउनी संतांसी।
देव भोजनासी बैसविले।।
जिजाई वाढितसे करे।
देव जेविताते परम आदरे।
संत भक्षिताती कण्या फार।
मिष्ट अपार लागती।।
ऐसे भोजन तृप्ती पावले सकळ।
दिधले मुखशुद्धी एक तुळशीदळ।
मोडक्या बाजेवरी वाकळ।
त्यावरी घननीळ बैसविले।।
मग देव म्हणतसे जिजाई।
आजीचा निरोपम रस सेविला आई।
मागे जेविलो बहुतांचे गृही।
परि ऐसी तृप्ती नाही झाली कोठे।।
मी खूप ठिकाणी जेवलो, पण एवढे सुग्रास अन्न कुठे खाल्ले नाही. अशी भोजनाची तृप्ती अनुभवली नाही, असं माऊली जिजाईच्या स्वयंपाकाचं कौतुक स्वतः देवाने केले.

वैष्णवा घरी सर्व काळ
खरं तर पंढरीचा सावळा श्री विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा देव. कष्टाने मिळवलेल्या भाजीभाकरीचा नैवद्य देवाला दाखवायचा, स्वतः गोड मानून जेवायचे आणि मोडक्या झोपडीत देवाचे भजन करत आनंदाने संसार करायचा, हा वारकऱ्यांचा दिनक्रम.
तुकोबारायांचे पूर्वसुरी संत नामदेव महाराजांनी वैष्णवांचे हेच वर्णन आपल्या अभंगातून केले आहे.
वैष्णवा घरी सर्वकाळ। सदा झणझणती टाळ।।
कण्या भाकरीचे खाणे। गाठी रामनाम नाणे।
बैसावयासी कांबळा। द्वारी तुळसी रंगमाळा।।
घरी दुभे कामधेनु तुपावरी तुळसीपानु।।
फराळासी पीठलाह्या। घडीघडी पडती पाया।।
नामा म्हणे नेणती कांही। चित्त अखंड विठ्ठल पायी।।
पंडित भीमसेन जोशी यांनी हा भावगर्भ अभंग खूप सुंदर
गायला आहे. तो यूट्यूबवर उपलब्ध आहे.

उंचनीच काही नेणे भगवंत
अशा या गरीब वारकऱ्यांच्या पोटाचा आधार असणाऱ्या कण्यांचा उल्लेख संत तुकाराम महाराजांनी
उंचनीच काही नेणे भगवंत।
तिष्ठे भावभक्ती देखोनिया।।
या अभंगात केला आहे. सर्व कष्टकरी, गरीब संतांना देव कशी त्यांची कामे करू लागला, असे वर्णन करणारा हा अभंग आहे. यामध्ये “दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी…” असा उल्लेख आहे. कौरवांच्या दरबारात असलेले विदुर आपल्या विद्वत्तेबद्दल प्रसिद्ध होते. पण ते तथाकथित ‘दासीपुत्र’ असल्याने कौरवांच्या महालापासून दूर झोपडी बांधून राहत असत. यादवराजे असलेले श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाईसाठी वैभवशाली कौरवनगरी हस्तिनापुरात जातात त्यावेळी कौरवांचा संपन्न महाल, पंचपक्वान्न भोजन सोडून नगरीबाहेरच्या दासीपुत्र विदुराच्या झोपडीत जातात आणि त्याने दिलेल्या कण्या आनंदाने खातात! देव ही काही अप्राप्य गोष्ट नाही. तुमची धनसंपत्तीची श्रीमंती वगैरे पाहून देव तुम्हाला प्रसन्न होत नाही, तर तो केवळ भावभक्तीचा भुकेला आहे. असं सांगून देव आणि भक्तांच्या मधला मध्यस्थच संतांनी काढून टाकला आणि देव सर्वांना आपलासा केला.

आधुनिक काळातील ‘डाएट’
आता या पुराणातल्या धार्मिक कथा म्हणून त्याकडे कुणी दुर्लक्ष करू शकेल. पण आधुनिक आहार शास्त्राने आता कण्या, ताक, भाकरी हे जेवण आरोग्यकारी असल्याचे सांगितले आहे. सध्याच्या डाएट प्लॅनमध्ये कण्या हा पदार्थ झटपट तयार होणारा, पचायला हलका, ऊर्जा देणारा असा पौष्टिक पदार्थ ठरेल. उन्हाळ्याच्या दिवसांत भूक कमी लागते. वातावरणात उष्मा अधिक असतो. त्यामुळे जेवण कमी जाते. अशा वेळी ताक आणि कण्या यांचे भोजन रोजच्या जड जेवणाला पर्याय ठरू शकते. ज्वारी ग्लुटेन फ्री, प्रतिकारशक्ती वाढवणारी, रक्तातील साखर कमी करणारी, पोषक जीवनसत्त्वे आणि शरीराला आवश्यक असणारे फायबर देणारी आहे. ताक तर पृथ्वीवरचे अमृतच! त्यामुळे हे ताककण्याचे भोजन पाचक, पोटातील विकार बरे करणारे आणि तृप्तीदायी आहे. त्यामुळे आजच्या फाल्गुन दशमीच्या निमित्ताने तुकोबारायांनी सांगितलेला ताककण्यांचा ‘डाएट’ आणि त्यांचे विचार हे शरीर आणि मनाला पोषण आणि तृप्ती देणारे, आपणा सर्वांना प्रगल्भ करणारे ठरावेत याच
।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे शुभेच्छा!!

(देहूतील श्री विठ्ठल रुक्मिणीला दाखविलेला ज्वारीच्या कण्यांचा नैवद्य आणि आजच्या दिवसाचे देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे यांनी सांगितलेले महत्त्व जरूर ऐका…

आमचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा!🙏)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *