‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’च्या तोडीचा
ग्रंथ अद्यापही नाही : डॉ. मोरे
नेवासा : ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ हा महाराष्ट्राच्या बौद्धीक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. सुमारे ८८ वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेला, महाराष्ट्रातील सर्व विद्वानांनी ज्ञानेश्वरीवर विविध अंगानी अभ्यासपूर्ण रितीने लिहिलेल्या या ग्रंथाच्या तोडीचा ग्रंथ अजून झाला नाही. त्याचे पुनर्प्रकाशन माझ्या कालावधीत होत असल्याबद्दल धन्यतेची भावना मनात आहे, असे उद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी येथे काढले.
अहमदनगरच्या ‘वाङ्मयोपसक उपासक’ मंडळाने १९३४मध्ये प्रकाशित केलेल्या आणि अलिकडे दुर्मिळ ठरलेल्या श्रीज्ञानेश्वरदर्शन या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे पुनर्प्रकाशन येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात शनिवारी (दि. १३ ऑगस्ट) झाले. त्यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मोरे बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्तपीठ संस्थेचे मठाधिपती महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, श्रीक्षेत्र सरला बेट येथील योगिराज सदगुरु गंगागिरीजी महाराज संस्थानचे मठाधिपती महंत स्वामी गुरूवर्य रामगिरीजी महाराज, ह. भ. प. शिवाजी महाराज देशमुख, नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक, अॅड. विकास ढगे पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ ग्रंथाचे संपादक डॉ. शिरीष लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोरे पुढे म्हणाले, प्राथमिक शाळेत वडिलांच्या ग्रंथसंग्रहातील ‘श्रीज्ञानेश्वरदर्शना’चे दोन्ही खंड माझ्या हाती पडले. मी ते वाचून काढले. वडील श्रीधरअण्णा देहूकर यांच्याकडून ते समजून घेतले. पुढे पुढे नगरमध्येच प्राध्यापक असताना हे खंड मला उपयोगी पडले. आता त्यांचे पुनर्प्रकाशन माझ्या साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत होणे, ही आनंददायी बाब आहे. नगरमध्ये १९३४च्या दरम्यान विद्वान मंडळी कार्यरत होती. माझी त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली.
ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करणारे दादासाहेब धनेश्वर, संक्षिप्त ‘लघुज्ञानेश्वरी’ प्रकाशित करणारे अमृत बापूजी रसाळ, तसेच पत्रकारिता करताना अध्यात्माची आवड जोपासणारे दादा देशपांडे यांना बरोबर घेऊन नानासाहेबांनी ‘ज्ञानेश्वरी चर्चा मंडळ’स्थापन केले होते. या ग्रंथात तत्कालीन विद्वान धुंडा महाराज देगलूरकर, मामासाहेब दांडेकर, ते दादा महाराज सातारकरांचे शिष्य गोपाळराव राहीरकर यांनी लिहिले. काही वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीच्या सप्तशताब्दीनिमित्त आम्ही काही मंडळीनी पालखी महासंघ स्थापन करून पैठण ते आळंदी अशी ज्ञानेश्वरीची विजय यात्रा काढली होती. पंढरपूरचे देहूकर फडाचे ज्ञानेश्वर माऊली मोरे देहूकर आणि बाबासाहेब देहूकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली. त्यावेळी इथे झालेल्या कार्यक्रमात मी ‘इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी’ या ज्ञानेश्वरीच्या ओवीवर प्रवचन केले होते. श्री ज्ञानदेवांच्या चरित्रलेखनाचीही सेवा करण्याची संधी मिळाली, याबाबत मला धन्यता वाटते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार नरेंद्र घुले पाटील म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली हे थोर तत्त्वज्ञ आणि कवी होते. त्यांच्यामुळे नेवासेवासीयांना संपूर्ण जगात ओळख मिळाली असून त्यांचा वारसा आपणास जतन करावा लागेल. यावेळी या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे संपादक शिरीष लांडगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात या ग्रंथाची शोधमोहीम प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांच्यावर सोपवली होती. आज मोरे सरांच्या कालावधीत हा ग्रंथ पूर्णत्वास आला, असे मनोगत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड यांनी व्यक्त केले. सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी या ग्रंथाचा आढावा घेतला. ग्रंथाच्या पहिल्या खंडात २९ आणि दुसऱ्या खंडात ४८लेख असल्याचे नमूद करत त्यांनी संपूर्ण ग्रंथाबद्दल उपस्तिथांना माहिती दिली.
याप्रसंगी महंत प्रकाशानंद गिरी महाराज, आळंदी देवस्थानचे अभय टिळक विकास ढगे पाटील, तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग यांची भाषणे झाली. रविवारी (दि. १४ ऑगस्ट २०२२) सकाळी साडेअकरा वाजता या ग्रंथाचे आळंदी येथील भक्तनिवासात प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला पुणे येथील प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, डॉ. सदानंद मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, नरेंद्र वैद्य, लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत, असे अॅड. विकास ढगे यांनी यावेळी सांगितले.
सुमारे ८८ वर्षांपूर्वी, मार्च १९३४ मध्ये, शके १८५६च्या चैत्र वद्य द्वितीयेला अमृतवाहिनी प्रवरेकाठच्या ज्ञानेश्वर मंदिरात म्हणजेच जुन्या करविरेश्वर मंदिरात ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांची मांदियाळी जमली होती. ज्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ‘पैस’खांबाच्या साक्षीने ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. रा. ब. अप्पासाहेब देशमुख यांनी हा ग्रंथ भक्तिपूर्वक अर्पण केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. लक्ष्मण पांगारकर होते, तर स्वागताध्यक्ष सरदार नानासाहेब मिरीकर होते. प्रा. दांडेकर, प्रा. चाफेकर, प्रा. दत्तोपंत पोतदार, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील आदी दिग्गज त्यावेळी उपस्थित होते. अशा पहिल्या प्रकाशनाच्या आठवणी शनिवारच्या कार्यक्रमात उपस्थितांनी जागवल्या.
याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त कृष्णा भाऊ पिसोटे, भिकाजी जंगले, लोकनेते मारुतराव घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, डॉ. रमेश नवल, विजय अडसुरे, काकासाहेब लांडे, संजय दराडे, भैय्या कावरे, रामकृष्ण रोकडे तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री ज्ञानेश्वर संस्थांचे ह. भ. प. शिवाजी महाराज देशमुख यांनी मानले, तर सूत्रसंचालन रेवणनाथ पवार यांनी केले.