अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे
वैश्विक कथालेखन स्पर्धा
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे ‘संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. यासाठी लिहिण्याच्या कथेला विषयाचे बंधन नाही. मराठी भाषेत लिहिलेली कथा २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे, असे अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.
पहिले बक्षीस ५००१ रुपयांचे
कथा स्पर्धेचे हे दुसरे वर्षे असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ रुपयांची पुस्तके, प्रमाणपत्र, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांनाच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुन्हा यावर्षी दर्जेदार लेखनाला, नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे आणि वैश्विक दर्जाचे श्रेष्ठ विचारवंत, साहित्यिक असलेल्या संत तुकाराम महाराजांचे स्मरण व्हावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे, असे ‘अक्षरदान दिवाळी’ अंकाचे संपादक मोतीराम पौळ यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या स्पर्धेत परभणीचे संभाजी रोडगे (इन्स्पेक्शन) प्रथम, पुण्याचे सुभाष पारखी (स्वामी आणि महाराज) द्वितीय तर यवतमाळच्या निशा डांगे (दगुड) तृतीय हे विजेते ठरले होते. सोलापूरचे हरिश्चंद्र पाटील (घटकेचा गाव) आणि पुण्याच्या डॉ. कौमुदी आमीन (दगडांच्या देशा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले होते. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, १००१, ७०१ रुपयांची रोख रक्कम, पुस्तके, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देण्यात आली होती.
महाराष्ट्राच्या बाहेरूनही प्रतिसाद
“राज्यातील खेड्यापाड्यातून अनेकांनी कथा स्पर्धेत भाग घेतला, हे विशेष. जगणं शहरी असो किंवा ग्रामीण, जगण्यातला संघर्ष, समस्या, त्यातले बारकावे टिपायचा अनेकांनी चांगला प्रयत्न केला. कल्पनारंजन आणि वास्तववाद या दोन्हींची मिसळण बहुतांश कथांमध्ये आढळून आली. अक्षरदान दिवाळी अंकाने एक चांगली कथा स्पर्धा आयोजित केली,” असे गौरवोद्गार कथा स्पर्धेच्या परीक्षक प्रसिद्ध कथाकार अमृता देसर्डा यांनी काढले होते.
गतवर्षी महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, बडोदा, इंदौर येथून ६३ कथाकारांनी स्पर्धेत भाग घेतला होता. या कथांना अक्षरदान दिवाळी अंकात प्रसिद्ध देण्यात आली. इच्छुकांनीakshardan2014@gmail.com यामेलवर कथा पाठवाव्यात, तसेच अधिक माहितीसाठी ९६३७९९३३१९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.