कार्ला डोंगरावर पालखी उत्साहात
कार्ला : दोन वर्षांनंतर चैत्री यात्रेला भरविण्यात आलेल्या एकवीरा देवीच्या पालखीच्या मिरवणुकीत कोकणासह राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले. राज्यभरातील विविध ठिकाणाहून भाविकांनी याठिकाणी पालख्या आणल्या. “एकवीरा देवीच्या नावाने उदो उदो..” अशा जयघोषाने वातावरणात दुमदुमून गेले.
वेहरगाव कार्ल्याची आई एकविरादेवीच्या चैत्र यात्रेला गुरूवारी (दि. ७) तारखेला देवीचे माहेरघर देवघर येथील काळभैरवनाथ देवाच्या पालखीने सुरुवात झाली. शुक्रवारी (दि. ८) कार्ला एकवीरा देवी मंदिरात उपसरपंच काजल पडवळ, तलाठी मीरा बोऱ्हाडे, पोलिस पाटील, अनिल पडवळ यांच्या हस्ते सकाळी देवीचा अभिषेक करण्यात आला. सायंकाळी सात वाजता देवीची आरती आणि पालखीचे विधिवत पूजन गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख आणि गुरव पुजारी प्रतिनिधी यांनी केल्यानंतर मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी एकविरादेवी डोंगरावर जमलेल्या लाखो भाविकांनी जयघोष केला.
कोरोना निर्बंधामुळे दोन वर्ष यात्रा झाली नव्हती. त्यामुळे गर्दी वाढली होती. परंतु मावळ तालुका तहसील प्रशासन आणि लोणावळा ग्रामीण पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्तामुळे पालखी सोहळा शांततेत पार पडला.
यावेळी मावळ तहसीलदार मधुसूधन बर्गे, लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस निरिक्षक प्रविण मोरे, मंडल अधिकारी मानिक साबळे, व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी एकविरा देवी यात्रेसाठी विशेष नियोजन केले होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात होती. यात्राकाळात पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आज (दि. ९) पहाटे मांगल्यपूर्ण वातावरणात देवीचा तेलवणाचा कार्यक्रम पार पडला.
या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या देवीची पालखी आणि पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी कोकणासह राज्यभरातील लाखो भाविक आले होते. एकविरादेवी ही कोळी व आगरी, कुणबी, सोनार बांधवांची कुलदेवता असल्याने मुंबई, कोकण, रायगड या भागातून अनेक पालख्या याठिकाणी आल्या होत्या.