मशिदीत श्रीरामनवमी उत्सव

साजरा करणारे श्री साईबाबा

साई अविनाश पुरातन। नाही हिंदू ना यवन।।
जात पात कुळ गोतहीन। स्वरूप जाण निजबोध।।
अशा शब्दांत ज्यांची महती वर्णिली जाते, ज्यांच्या विचारांतून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला जातो, ज्यांच्या फक्त दर्शनाने मनःशांती मिळते, वाटचालीची दिशा कळते, अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे, त्या श्री साईबाबा यांचा श्री राम नवमी उत्सव सोहळा आजपासून (दि. ९) श्री क्षेत्र शिर्डी येथे सुरू होत आहे.

कोण होते साईबाबा?
श्री साईबाबा कोण होते, कोठून आले? याची फारशी माहिती कोणाकडे नाही. १८७२ मध्ये एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर बाबा शिर्डीला आले. त्यावेळी त्यांचे वय १६ असावे. या वऱ्हाडाचा मुक्काम गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ होता. शिर्डीतील म्हाळसापती नावाचे भक्त दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. साईबाबांचा धर्म कोणता, हे कधीच कोणाला कळले नाही. त्यांचे दिसणे एखाद्या फकिरासारखे होते. शिर्डी येथील एका पडक्या मशिदीत त्यांचे वास्तव्य असे. परंतु त्या मशिदीला ते ‘द्वारकामाई’ म्हणत आणि तेथे सदैव एक धुनी पेटलेली असे. ‘अल्ला’, ‘अल्लामालिक’ असे परमेश्वरवाचक शब्द त्यांच्या तोंडून अनेकदा बाहेर पडत परंतु ते स्वतः रामाची उपासना करत. त्यांचे वागणे धार्मिक भेदांच्या पलीकडचे असे. म्हणूनच त्यांच्या भक्तांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश होत गेला. ते ‘यादे हक्क’ (मी देवाचे स्मरण करतो) परंतु मी देव नाही, असे नेहमी पुटपुटत. ‘सबका मालिक एक’, ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता.

रामनवमी उत्सव
शिर्डी येथे १९११ मध्ये रामनवमी प्रथम उरुसापोटी जन्माला आली आणि तेव्हापासून ही प्रथा अखंड चालू आहे. तोपर्यंत केवळ उरुसच मोठ्या प्रमाणात भरत असे. रामनवमीची मूळ कल्पना साईभक्त कृ. जा. भिष्म यांची. एकदा भिष्म वाड्यात स्वस्थचित्ताने बसले असता काका महाजनी पूजा साहित्यासह मशिदीत जायला निघाले होते. उरुसात सहभागी होण्यासाठी काका उत्सवासाठी एक दिवस आधीच शिर्डीत हजर झाले होते. भिष्मांनी त्यांना विचारले, ‘माझ्या मनात एक चांगला विचार आहे. मला मदत कराल का? येथे दरवर्षी उरुस भरतो. तो रामजन्माचाच दिवस असतो. तेव्हा दोन्ही उत्सव एकत्र करावेत का?” काका महाजनींना हा विचार आवडला ते म्हणाले, “घ्या बाबांचा होकार. त्यांच्या आज्ञेवर सर्व काही आहे. कामाला लागायला मला उशीर नाही. परंतु उत्सवाला कीर्तनाची जरुरी असते. कोडे गावी हरदास (कीर्तनकार) कुठे सापडायचा?” भीष्म म्हणाले, “मी कीर्तन करीन, तुम्ही पेटीचा सूर धरा’ असे बोलून ते दोघे लगेच मशिदीत गेले. त्यांनी बाबांना उत्सवाची युक्ती सांगितली. बाबांच्या मनाला तो विचार आवडला आणि उत्सव करण्याचे निश्चित झाले. तेव्हापासून हा उत्सव अखंड सुरू आहे.

अनेक राज्यांतून येतात पालख्या
दरवर्षी श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे २५० ते ३०० पालख्या घेऊन हजारो पदयात्री साईभक्त साईनामाच्या गजरात शिर्डीस हजेरी लावतात. श्री साईबाबा संस्थान आयोजित श्रीरामनवमी, श्रीगुरुपौर्णिमा आणि श्रीपुण्यतिथी असे प्रमुख सोहळे इथे पार पडतात. साईभक्त या पालखीत श्री साईंची प्रतिमा घेऊन मजल दर मजल करीत शिर्डीला पोहचतात. पहिल्या पालखीचा मान साईभक्त बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८१ मध्ये सुरू होऊन साईनिकेतन दादर, मुंबई या ठिकाणाहून ४३ भक्तांसह शिर्डीला निघालेल्या साईसेवक मंडळाच्या पालखीचा आहे. एकट्या मुंबई आणि उपनगरातून दरवर्षी श्रीरामनवमी उत्सवाला सुमारे १०० ते १५० पालख्या शिर्डीस येतात. वर्षभरात सुमारे ५०० पालख्या शिर्डीस येतात. याशिवाय गेल्या २९ वर्षांपासून प्रत्येक गुरुपौर्णिमा उत्सवाला पुण्यातील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीची पालखी शिर्डीला येत आहे.

संपूर्ण वर्षभर महाराष्ट्र सह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून मोठ्या संख्येने पालख्या शिर्डीत येतात. या पालख्यांच्या अंतराचा विक्रम मद्रासच्या साईभक्तांनी केला आहे. मद्रास ते शिर्डी असा १५५० किलोमीटरचा प्रवास पायी करत चंद्रमौली नावाचे साईभक्त गेल्या पाच वर्षांपासून आपल्या १५ ते २० साथीदारांसह एप्रिल महिन्यात शिर्डीला येत आहेत. अशा प्रकारे गेल्या काही वर्षापासून साईंची पालखी घेवून येणारे साईभक्त पदयात्री हे या रामनवमी उत्सवाचे आकर्षण ठरत आहे. कोरोनानंतर यंदा प्रथमच हा उत्सव भव्य प्रमाणात होत आहे. त्यात नेहमीप्रमाणे सर्वधर्मीय भाविक उत्साहात सहभाग घेणार आहेत. त्यानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. श्री साईबाबांनी शिकवलेल्या, बंधुभाव, प्रेम, मानवतेच्या आणि श्रद्धा-सबुरीच्या शिकवणुकीला श्रीराम नवमी उत्सवा निमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.🙏

श्री राम नवमी उत्सव कार्यक्रम –
उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार, दिनांक १० एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वाजताश्रींची काकड आरती, पहाटे ५.४५ वाजता अखंड पारायणाची समाप्‍ती होऊन श्रींच्‍या फोटो आणि पोथीची मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वाजता कावडींची मिरवणूक आणि श्रींचे मंगलस्‍नान होईल.

सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर ह. भ. प. विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्‍म कीर्तन कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक, तर सायं.५.०० वाजता श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं.६.३० वाजता धुपारती होईल.

सायं.७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत विजय साखरकर, मुंबई यांचा साई स्‍वर नृत्‍योत्‍सव हा कार्यक्रम होणार आहे. रात्री १०.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींच्या समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक १० एप्रिल रोजीची नित्‍याची शेजारती आणि दिनांक ११ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सोमवार, दिनांक ११ एप्रिल रोजी पहाटे ५.०५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान आणि दर्शन, सकाळी ०७.०० वाजता गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक, सकाळी

१०.०० वाजता ह. भ. प. विक्रम नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तन आणि दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता माध्‍यान्‍ह आरती आणि तीर्थप्रसाद, सायं.६.३० वाजता धुपारती होणार असून सायंकाळी ७.३० ते रात्री ०९.५० यावेळेत अक्षय आयरे, मुंबई यांचा सुस्‍वागतम रामराज्‍य नृत्‍य-नाटिका हा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *