विडंबन करणाऱ्यांवर देहूचे
संस्थान करणार कारवाई
देहू : नववर्षाच्या शुभेच्छा देताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ‘तुका म्हणे’ या नाममुद्रेचे विडंबन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना, नितीन महाराज मोरे म्हणाले, नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अलिकडच्या काळात आमच्या लक्षात आले आहे, की नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना काही लोक तुकोबारायांच्या मूळ अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा तयार करतात. शुभेच्छा पत्रे बनवून किंवा सोशल मीडियावरून या शुभेच्छा दिल्या जातात. यातून मूळ अभंगाचा चुकीचा अर्थ पसरवला जातो, तसेच या प्रकारांतून महाराजांच्या अभंगांचे विडंबनही होते. हा प्रकार ताबडतोब थांबणे गरजेचे आहे.
‘तुका म्हणे’ ही तुकोबारायांची नाममुद्रा, स्वाक्षरी आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा गाथा हा जगाला सन्मार्ग दाखविणारा ‘पंचमवेद’ आहे. महाराजांच्या अभंगांचा भावार्थ हजारो कीर्तनकार जनतेपर्यंत पोहचवत आहेत. त्यातून जनतेला तुकोबारायांचे विचार सांगितले जात आहेत. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होईल, महाराजांचा आणि त्यांच्या अभंगाच्या अभंगांचे विडंबन होईल, अशा रचना ‘तुका म्हणे’ या नाममुद्रेने कोणीही करू नयेत. अन्यथा अशा प्रकारांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.
संत तुकाराम महाराजांसोबतच इतर संतांच्या रचनांचाही दुरुपयोग करू नये. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य राष्ट्रपुरुषांच्या बाबतीतही असे प्रकार झाल्यास संस्थानातर्फे कारवाई केली जाईल, असेही नितीन महाराज मोरे यांनी म्हटले आहे.