खासदार सुप्रिया सुळेंकडे मागणी

आळंदी : ज्या इंद्रायणीच्या काठी ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ ज्ञानेश्वरी लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली, ज्या इंद्रायणीच्या काठावर संत तुकोबारायांना पंचमवेद समजली जाणारी अभंगगाथा स्फुरली, तीच इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या इंद्रायणी मातेला पुन्हा तिचे मूळ निर्मळ स्वरूप मिळवून द्यावे, अशी मागणी आळंदीकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.

खासदार सुळे यांनी सोमवारी (दि. ११) आळंदी येथे जाऊन श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांना मागण्यांचे पत्र देण्यात आले. इंद्रायणी स्वच्छतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, दर्शनबारीचा प्रश्न मार्गी लावावा, देवस्थानच्या ४०० एकर जागेत भक्तनिवास उभारावे आदी मागण्यांचा समावेश होता.

यावेळी संस्थानचे विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, योगेश देसाई, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.

पवित्र इंद्रायणी नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुरवंडे गावात होतो. उगमापासून शुद्ध असणारी इंद्रायणी नदी वडगाव मावळ औद्योगिक वसाहत, तीर्थक्षेत्र देहू, पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहत ल, तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी प्रदूषित होते. या प्रदूषणाला आळा घालण्यात यावा, अशी भाविकांची मागणी आहे.

आळंदीकरांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी खासदार सुळे यांनी दिले.
यावेळी त्यांनी इंद्रायणी घाट आणि सिध्द बेटाची पाहणी केली. तसेच सद्‌गुरू जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्थेस भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *