विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती असुरक्षित

पंढरपूर : युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहिलेला विठुराया आणि रुक्मिणीमाता वर्षानुवर्षे भक्तांना दर्शन देत राहावी, यासाठी या मूर्तींवर करण्यात आलेला वज्रलेप निघू लागला आहे. त्यामुळे भाविक, वारकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे पुरातत्त्व विभागाने नुकताच हा वज्रलेप केला होता. तो अगदी काही दिवसांत म्हणजे चैत्री यात्रेच्या दरम्यानच निघू लागल्याचे निदर्शनास आले.
कोरोना कालावधीत दोन वर्षे पदस्पर्श दर्शन बंद होते. ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने भाविकांमधून आश्चर्य आणि चिंता व्यक्त होत आहे. ‘एबीपी माझा’ या न्यूज चॅनलने याबाबतची बातमी दिली आहे.

आत्तापर्यंत ४ वेळा वज्रलेप
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाकडून आत्तापर्यंत चार वेळा मूर्तींवर विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते. मात्र यावेळी केलेला वज्रलेप अत्यंत कमी कालावधीत निघू लागल्याने मंदिर प्रशासनाची चिंता वाढली आहे.

२३ आणि २४ जुलै २०२० या कालावधीत पुरातत्त्व विभागाने विठ्ठल मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. यानंतर हा लेप पुढील ७ ते ८ वर्षे तसाच राहील, असा दावा करण्यात आला होता. दोन वर्षानंतर २ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा देवाच्या पायावरील दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

“नाही घडविला, नाही बैसविला…”
विठुरायाची मूर्ती वालुकाष्म दगडाची आहे. विठुराया स्वयंभू असून ‘नाही घडविला, नाही बैसविला’ अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. या मूर्तीवर पूर्वी वारंवार होणाऱ्या पंचामृत अभिषेकाने मूर्तीची झीज होत होती.
ते लक्षात आल्यानंतर देवावरील हे अभिषेक बंद करण्यात आले होते. मात्र तरीही मूर्तीची झीज होत असल्याने तिच्यावर आत्तापर्यंत चार वेळा वज्रलेप करण्यात आले होते. संत नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा आदी संतांनी पाहिलेल्या या मूर्ती पुढच्या पिढ्यांनाही मूळ रुपात पाहता याव्यात, यासाठी हे मूर्ती संवर्धनाचे काम आवर्जून करण्यात येते.

मंदिरे समितीला चिंता
रुक्मिणी मातेची मूर्ती ही गंडकी पाषाण म्हणजेच शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. मात्र या मूर्तीच्या पायाची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पायावर दरवेळी वज्रलेप केला जात असतो. आता पायावर दर्शन सुरू होऊन केवळ आठच दिवस झाले असताना रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाचे तुकडे पडल्याचे दिसून आले आहे.
इतक्या कमी वेळात आणि दर्शन बंद असतानाही या दोन्ही मूर्तींची झीज कशामुळे झाली, याचा अभ्यास पुरातत्त्व विभागाला करावा लागणार आहे. नुकतेच राज्य सरकारने मंदिराच्या जतनासाठी ७६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता मूर्तींच्या संवर्धनाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

शेवटचे लेपन असे झाले होते
२३ जुलै २०२० रोजी दुपारी एक वाजता पुरातत्व विभागाचे उपाधिक्षक आणि रसायनशास्त्र तज्ज्ञ श्रीकांत वर्मा यांच्या टीमने गाभाऱ्यात सोवळे नेसून कामाला सुरुवात केली होती. पहिले पाच तास डिटर्जंटसारख्या सौम्य रसायनाने मूर्ती बारकाईने साफ करून घेतली होती. यानंतर ज्या वालुकाश्म दगडाची ही मूर्ती आहे त्याच पद्धतीच्या दगडाची पावडर एका रसायनात मिसळून जिथे खड्डे पडले आहेत किंवा जिथला भाग झिजला आहे, अशा जागी ती भरण्यात आली होती. सततच्या दर्शनामुळे विठुरायाच्या पायांची मोठी झीज झाली होती. या ठिकाणी तसेच मुकुट बसविण्याची कपाळावरची जागा आणि इतर ठिकाणी हे मिश्रण भरून रात्रभर तसेच ठेवण्यात आले होते.

असा झाला होता वज्रलेप
२४ जुलै २०२० रोजी सकाळी नऊ वाजता मूर्तीवर लेपन करण्यास सुरुवात झाली होती. सिलिकॉन रेझीन आणि एक रंगहीन रसायनाचे मिश्रण करून त्याचे ब्रशच्या मदतीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर लेपन करण्यात आले. याला हायड्रोफोबिक कॅरेक्टरचा लेप असेही म्हटले जाते. या पातळ फिल्मसारख्या लेपामुळे मूर्तीमध्ये पाण्याचे शोषण होत नाही, असे सांगितले जाते. ही मूर्तीवरील पातळ फिल्म काही दिवसात मूर्तीमध्ये एकरूप होऊन जाते आणि पुढे ५ ते ८ वर्षे ती मूर्तीवर राहते, असे सांगण्यात आले होते.

२४ जुलै २०२० रोजी दुपारी दोन वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि २५ जुलै २०२० रोजी मूर्तीवर कोणतेही नित्योपचार केले गेले नाहीत. २६ जुलै २०२० पासून मूर्तीवर नित्योपचार सुरू झाले. २०२०च्या आषाढीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा या लेपन झालेल्या मूर्तीवर करण्यात आली होती.

उपाययोजना करण्यासाठी बैठक
अल्पावधीतच श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरील वज्रलेप निघू लागल्याने मंदिर समिती त्यावर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक घेत आहे.
रुक्मिणी मातेच्या पायावरील झालेली झीज ही धक्कादायक असून या संदर्भात पुरातत्व विभागाशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती करणार असल्याचे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी औसेकर यांनी सांगितले. मूर्तीचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पुरातत्त्व विभाग सुचवेल त्या पद्धतीने तातडीने उपाययोजना करणार असल्याचेही औसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *