संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर माऊली
निघाले पंढरीच्या वाटेवर

आळंदी :
माझे जिवींची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी॥
पांडुरंगी मन रंगले।
गोविंदाचे गुणीं वेधलें॥
अशी भावावस्था संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अभंगातून व्यक्त केली होती. तीच भावावस्था अनुभवणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने, ||ज्ञानबातुकाराम||च्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज (दि. २१ जून) मावळत्या सूर्याच्या साक्षीने पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले.

कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी आषाढी पायी वारी पालखी सोहळा निघत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. वारकऱ्यांच्या गर्दीमुळे यंदा प्रस्थान सोहळा तब्बल अडीच तास लांबला.

पहाटेपासूनच प्रस्थानाची लगबग

माऊलींच्या मंदिरात पहाटे ५ वाजता घंटानाद झाला आणि माऊलींचे नित्योपचार सुरू झाले. काकडा, पवमानपूजा, अभिषेक आणि आरती झाल्यानंतर भाविकांचे अभिषेक सुरू झाले. सकाळी ९ ते ११च्या दरम्यान काल्याचे कीर्तन झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. दुपारी अडीच वाजता माऊलींचे अश्व आणि मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात घेण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ४ वाजता प्रस्थान पूजा सुरू झाली. संस्थानच्या वतीने अध्यक्ष योगेश देसाई यांनी माऊलींची पूजा आणि आरती केली. या प्रस्थान पूजेप्रसंगी जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, खासदार संजय जाधव, आमदार दिलीप मोहिते, सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित होते.

आषाढी वारीसाठी माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील आणि सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यांनी या पादुका वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत ठेवल्या. मानकरी, फडकरी आणि दिंडीप्रमुखांना नारळप्रसाद देण्यात आला आणि सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यानंतर विणा मंडपातील माऊलींची पालखी खांद्यावर घेवून ‘माऊली माऊली’ नामाचा जयघोष करत आळंदीकरांनी पालखी वीणा मंडपातून बाहेर आणली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर महाद्वारातून बाहेर पडत पालखीने नगरप्रदक्षिणा केली आणि नंतर पालखी माऊलींच्या आजोळघरी म्हणजे गांधीवाड्यात विसावली. सोहळ्याचा पहिला मुक्काम गांधीवाड्यात असून उद्या (दि. २२) हा सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होईल. सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे.

मंदिराची सजावट आणि दर्शनासाठी गर्दी
प्रस्थानाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदीतील मंदिर आकर्षक फुलांनी सजविले आहे. पुण्यातील औंध येथील नीताताई खर्डे पाटील यांच्या वतीने हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. ‘ज्ञानियांचा राजा’ असा फुलांनी सजविलेला मोठा फलक मंदिर प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. या सजावटीसाठी २५ कलाकार परिश्रम घेत होते.
आळंदीत दाखल झालेले वारकरी आणि भाविकांनी दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.

आषाढी वारी पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे सुपुत्र श्री संत नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या एकत्रित पालखी सोहळ्याला सुरुवात केली. माऊली भक्त ह. भ. प. हैबतराव बाबा आरफळकर यांनी १८३२ मध्ये माउलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरु केला. त्यांना मराठेशाहीचे सरदार महादजी राजे शिंदे यांनी सहकार्य केले. श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार घराण्याने सोहळ्यासाठी अश्व, तंबू, नैवेद्य आणि सुरक्षा पुरवली. आळंदीकर, वासकर आणि लिंबराज महाराज यांनी वीणा, टाळ, मृदुंग आणि भजनाची सेवा दिली. तेव्हापासून आजतागायत हा सोहळा अखंड सुरू आहे.

कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन
कोरोनाचे भय अजूनही संपूर्णपणे गेलेले नाही. सरकारने काही निर्बंध घातले नसले तरी, वारकऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करावा, असे आवाहन पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.