टाळ-मृदंगाच्या गगनभेदी गजरात
तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

देहू : टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ज्ञानबा-तुकाराम’ हा नामघोष, त्या तालावर झुलत पावल्या खेळणारे वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर दिंड्या-पताका घेऊन तल्लीन झालेले हजारो स्त्री-पुरुष वारकरी अशा भक्तिमय वातावरणात आज (२० जून) आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

यंदा दोन वर्षांनंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

खासदार बारणे यांच्या हस्ते पूजन

देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले.

यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. माणिक महाराज मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थानचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

उद्या सकाळी पालखी पुण्याकडे निघणार

महापूजेनंतर पालखी इनामदारवाड्यातील मुक्कामाच्या स्थळी विसावली. उद्या सकाळी ६ वाजताच पालखी पुण्याच्या वाटेवर निघेल. पालखीचा पहिला विसावा वेशीबाहेरील अनगडशहा बाबा यांच्या दर्ग्यावर होईल. तिथे तुकाराम महाराजांची आरती होईल. त्यानंतर पालखी वाटचाल करू लागेल. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भक्तीशक्ती चौक येथे पालखीचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी पालखी पुणे मुक्कामी पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *