संत तुकाराम महाराजांना
देहूमध्ये जाऊन केले वंदन
देहू : काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल आज (दि. २२) देहू येथे जाऊन तुकोबारायांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सर्व वारकरी संप्रदाय आणि भाविकांची माफी मागितली.
सध्या धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यात संगमवाडी तेथे कार्यक्रम सुरू आहे. त्यादरम्यान वेळ काढून त्यांनी देहू येथे जात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी तेव्हा एका वाचलेल्या लेखाच्या आधारे बोललो होतो. तेव्हा बोलताना माझ्यावर स्थानिक भाषेचा प्रभाव होता. जसं कुणी साखर म्हणतं, तर कुणी शुगर म्हणतं.
माझ्या बोलण्यामुळं वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या. माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर, तो मी स्वीकारला आणि सुधारणा केली. मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे. त्यामुळं मी संत महात्म्यांची प्रशंसा करण्याऐवजी विरोध करत असेल, तर पाश्चिमात्य संस्कृतीचे संस्कार आमचा हा प्लॅनच गिळून टाकतील. म्हणूनच मी हात जोडून संपूर्ण वारकरी संप्रदायासमोर तेंव्हाही खेद व्यक्त केला होता.”
दुसरीकडे देहू संस्थाननेही धीरेंद्र शास्त्री महाराज यांना माफ केले आहे. माफ करणं ही जगद्गुरू तुकोबारायांची शिकवण असल्याचं देहू संस्थानचे विश्वस्त नितीन मोरे महाराज म्हणाले आहेत. “बागेश्वर महाराज यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला. ज्या दिवशी त्यांनी वक्तव्य केलं त्याच दिवशी त्यांनी माफी मागितली होती. वारकरी संप्रदायाने प्रत्येक मनुष्याला जगण्याचा धडा शिकवलेला आहे.
शांततेचे प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे पाहिलं जातं. बागेश्वर महाराज आज तुकोबांच्या दर्शनासाठी आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली. देहूत येऊन नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागितलेली आहे. आम्ही देखील त्यांना माफ केलं आहे. तुकोबारायांची शिकवणच आहे, की समोरचा माणूस जर अग्नी झाला, तर आपण पाणी व्हायला पाहिजे. अन्यथा त्या अग्नीचा भडका होतो” असे नितीन महाराज मोरे म्हणाले.