सुमारे पाच लाख भाविक

वारकऱ्यांची पंढरीत हजेरी

पंढरपूर : जया एकादशी अर्थात माघ वारीनिमित्त बुधवारी (दि. १) पंढरपुरात दाखल झालेल्या सुमारे पाच लाख भाविक, वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजून गेले. टाळ, मृदंगाचा निनाद आणि विठुरायाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली.

एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची, तर सदस्य दिनेशकुमार कदम यांच्या हस्ते रुक्मिणी ची महापूजा पार पडली.

माघ वारी पंढरपुरात वर्षातील चार महत्त्वाच्या वाऱ्यांपैकी एक गणली जाते. माघी एकादशीला जया एकादशी असेही संबोधले जाते. गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे वारीवर परिणाम झाला होता. यंदा हे निर्बंध नसल्याने सुमारे पाच लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले.

माघी वारीला सोलापूर जिल्ह्यासह कोकण आणि मराठवाड्यातूनही दिंड्या पंढरीत येतात. माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध पानाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आहे. दशमी, एकादशीच्या स्नानाला चंद्रभागा तिरी वारकऱ्यांनी मोठी केली. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता हे भाग वारकऱ्यांनी गजबजून गेलेले दिसत होते. पंढरीतील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचने सुरू होती.

भाविकांनी सुमारे आठ ते दहा तास दर्शन रांगेत थांबून विठ्ठलरखुमाईचे दर्शन घेतले. दरम्यान, माघी वारीसाठी मंदिर समिती, नगरपालिका प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *