दलितांसाठी सानेगुरुजींच्या
उपोषणाला झाली ७५ वर्षे पूर्ण
पंढरपूर : भारताला स्वातंत्र्य मिळत असतानाच सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, दलितांनाही इतरांप्रमाणेच मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांनी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू केले. त्यामुळे १० मे १९४७ रोजी श्री विठ्ठलाचे मंदिर दलितांसाठी खुले झाले. परमपूज्य साने गुरुजींच्या या ऐतिहासिक कार्याचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने आज कैकाडी महाराज मठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, राजाभाऊ औसक, भारत महाराज जाधव आदी मान्यवर आणि महाराष्ट्रभरातून आलेले साने गुरूजीप्रेमी उपस्थित होते. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दादासाहेब रोंगे यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पन्नालाल सुराणा, राजाभाऊ औसक, भारत महाराज जाधव, श्यामसुंदर मिरजकर, डॉ. श्रीरंग गायकवाड, धनंजय व्हनमाने, ज्ञानेश्वर बंडगर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
पंढरपुरात साने गुरुजींचे स्मारक
सानेगुरुजींच्या कार्याच्या स्मृती कायम राहाव्यात आणि समाजात सामाजिक समतेची प्रेरणादायी ज्योत अखंड तेवत राहावी, म्हणून गुरुजींनी जेथे उपोषण केले, त्या तनपुरे महाराज मठामध्ये गुरुजींनी दिलेल्या लढ्याचे स्मारक उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना विशेषतः नव्या पिढीला गुरुजींच्या या लढ्याचा इतिहास पाहण्यास, वाचण्यास मिळणार आहे. जुलै महिन्यात या स्मारकाचे उद्घाटन होणार आहे.
गुरुजींच्या उपोषणाला विरोध
दलितांना मंदिर खुले करू नये असे वाटणार्या बडव्यांनी ‘जाओ साने भीमापार नही खुलेगा मंदिर द्वार’ अशा घोषणा देऊन साने गुरुजी उपोषणाला विरोध केला होता. मात्र सामाजिक दबाव वाढल्यानंतर १० मे रोजी साने गुरुजींचे उपोषण सुटले आणि महाराष्ट्रातील दीनदलितांना पंढरपूरचे मंदिर खुले झाले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
संतांच्या समतेच्या विचारांना उजाळा
संत परंपरेने महाराष्ट्रातील जातीयता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण हे समतेचे विचार वारकरी संप्रदायातच आचरणात आणले जात नव्हते. समतेचा विचार सांगणाऱ्या श्री विठ्ठलाच्या मंदिरातच अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बांधवांना प्रवेश दिला जात नव्हता. भारताला स्वातंत्र्य मिळत असताना ही सामाजिक समता नष्ट व्हावी, यासाठी सानेगुरुजींनी प्रतिकात्मक म्हणून पंढरपुरात उपोषण सुरू केले. त्याला अखेर यश मिळाले.
महात्मा गांधीजींचा गैरसमज
सानेगुरुजी निस्सीम गांधीभक्त होते. सानेगुरुजी उपोषणाला बसले तेव्हा काही उपोषण विरोधकांनी गांधीजींचा गैरसमज करून दिला. साने गुरुजी यांनी उपोषण मागे घ्यावे. सरकार लवकरच कायदा करत आहे. त्यामुळे मंदिर तात्काळ खुले होईल, अशी तार गांधीजींनी गुरुजींना पाठवली. गुरुजींना वास्तव नेमके काय आहे हे सांगणारी तार गुरुजींनी महात्मा गांधी यांना पाठवली. आपण उपोषण मागे घेणार नाही, असेही कळवले. त्यानंतर या राज्यातील अनेक नेत्यांनी सानेगुरुजी उपोषणाला पाठिंबा दिला उपोषणाचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन बडव्यांना मंदिर खुले करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
दोनशे मंदिरे झाली खुली
पंढरपूरचे मंदिर खुले झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये समतेचा जयघोष सुरू झाला. महाराष्ट्रातील सुमारे २०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली. या उपोषणाने राज्यातील अनेक पाणवठ्याच्या विहिरी दलितांसाठी खुल्या करण्यात आल्या. हरिजन सेवक संघाने घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत लाखो लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या. पंढरपूरचे मंदिर खुले झाल्यानंतर राज्यात परिवर्तनाची लढाई वेगाने सुरू झाली. त्याचा परिणाम गावोगावी मानसिक परिवर्तन होण्याबरोबर दलित-सवर्णांमध्ये असलेल्या भेदाच्या भिंती संपुष्टात येण्यास मदत झाली. साने गुरुजींच्या या महान कार्याच्या ७५व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराच्या वतीने त्रिवार वंदन!