येणाऱ्या सर्व भाविकांसाठी

देवस्थानतर्फे मोफत सुविधा

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठीचे अन्नछत्र यंदाच्या कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता हे अन्नछत्र मोफत असणार आहे.

देवस्थानच्या वतीने अत्यल्प देणगीदरात गेली अनेक वर्षे हे अन्नछत्र सुरू होते, मात्र कोरोनाकाळात हा उपक्रम बंद पडला होता. यंदा कार्तिकी वारीच्या निमित्ताने हे अन्नछत्र पुन्हा सुरू करण्यात आले. हे अन्नछत्र नव्या जागेत म्हणजेच मुख्य मंदिरात दर्शनबारी मंडपाच्या तळमजल्यावर सुरू करण्यात आले आहे.

या प्रशस्त जागेत एका वेळी सुमारे २०० भाविकांची जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी स्वतंत्र किचन तसेच हात धुण्यासाठी वेगळी जागा ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या देणगीतून या अन्नछत्राची उभारणी करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ आणि रात्री ८ ते १० या वेळेत हे अन्नछत्र मोफत सुरू राहणार आहे. यापूर्वी संस्थानातर्फे भक्तनिवास इमारतीत हे अन्नछत्र चालविले जात होते.

समाधी दिन सोहळ्याच्या दिवशी पवमान अभिषेकासाठी दर्शनबारी बंद केल्यानंतर रांगेत असलेल्या वाघमारे दाम्पत्याच्या हस्ते अन्नछत्रालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्तविकास ढगे पाटील, योगी निरंजननाथ, अजित वडगावकर, भाऊ महाराज फुरसुंगीकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, उमेश बागडे, वारकरी विनायक टनवे, संजय रंधवे, बाळकृष्ण मोरे आदी उपस्थित होते.

2 thoughts on “आळंदीतील अन्नछत्र झाले पुन्हा सुरू

  1. खूपच छान उपक्रम आहे हा, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय दिलासादायक बातमी आहे . कारण माधुकरी साठी वणवण करत फिरणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा नक्की उपभोग घेतला पाहिजे ..
    रामकृष्ण हरी 🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *