वारीमध्ये स्वच्छता अभियान राबविणारे 

शासकीय अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी

अलिकडच्या काही वर्षांमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या पायी आषाढी वारीदरम्यान बऱ्यापैकी स्वच्छता पाहायला मिळत आहे. याचे श्रेय जेवढे स्वयंशिस्त पाळणाऱ्या वारकऱ्यांना जाते, तेवढेच शासन-प्रशासनालाही जाते. यामध्ये मोठा वाटा वारीत स्वच्छता अभियान सुरू करणारे अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचाही आहे. यंदाच्या वारीच्या निमित्ताने याबाबत त्यांची पत्रकार तुषार पाटील-निंभोरेकर यांनी घेतलेली मुलाखत…

तुषार : प्रशासनात अधिकारी असताना वारीशी तुमचा कसा संबंध आला?

डॉ. कलशेट्टी : राजगुरूनगर येथे बीडीओ म्हणून मी रुजू झालो, ती माझी पहिली नोकरी होती. १९९१ ते १९९५ ही ५ वर्षे मी तिथे होतो. तिथून आळंदी जवळच असल्यामुळे माझे नेहमी आळंदीला जाणे-येणे असायचे. तसेच मी मूळचा सोलापूरचा असल्यामुळे पंढरपूरशी देखील माझा जवळून संबंध होता. म्हणून आधीपासूनच मी वारीत सहभागी होत असायचो. त्यामुळे आधीच मला वारीबद्दल माहिती होतं.

तुषार : वारीपूर्वी स्वच्छतेबाबत कोणते कार्य आपण केले आहे?
डॉ. कलशेट्टी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००० साली सुरू झाले. त्यादरम्यान मी सांगलीत असताना मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्यांनतर माझ्याकडे संपूर्ण स्वच्छता अभियानाचा राज्य समन्वयक म्हणून कार्यभार आला. तेव्हा ‘निर्मलग्राम पुरस्कार’, ‘हागणदारी मुक्त गाव पुरस्कार’ हे पुरस्कार दिले जाऊ लागले. यातील जास्तीत जास्त गावे ही पश्चिम महाराष्ट्रातील होती. या काळात मी ‘रथयात्रा’, ‘हात धुवा मोहीम’ यासारखे उपक्रम राबविले. नंतरच्या काळात अनेक गावे स्वच्छ झाली.

तुषार : वारीत स्वच्छता मोहीम राबविण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली?

डॉ. कलशेट्टी : सर्वप्रथम २००५ साली मी यासंदर्भात विचार केला. वारीत मोठ्या संख्येने लोकं येत असतात. त्यामुळे याठिकाणी जनजागृती करण्याचा मी विचार केला. सांगलीत असताना रथयात्रेचा अनुभव असल्यामुळे वारीमध्ये या गोष्टी सहज करता आल्या.

तुषार : वारीत स्वच्छता अभियान राबवत असताना प्रशासकीय स्तरावर आपण काय काय केले?
डॉ. कलशेट्टी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील कलापथक आधीच तयार होते. त्या पथकांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषदेला पत्रे पाठवली. या पत्राच्या माध्यमातून आपले एक एक कलापथक घेऊन वारीतील स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. याला प्रतिसादही चांगला मिळाला. आम्ही पहिल्या वर्षी विभागीय आयुक्त कार्यालय पुणेपासून सुरुवात केली.

तुषार : वारीत स्वच्छतेसाठी आपण दरवर्षी कोणती पूर्वतयारी करत होतात?

डॉ. कलशेट्टी : जसे वारीच्या अगोदर पालखीचे कार्यकर्ते संपूर्ण पालखीमार्गाचे निरीक्षण करत असत. तसे मीही अगोदर सारा पालखीमार्ग फिरुन निरीक्षण करत व्यवस्थापन दौरा करायचो. पंढरपूरपासून पालखी मार्गावरील संपूर्ण पंचायत समितीत जाऊन ग्रामसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वांना पालखीची आणि पालखी मार्गावरील स्वच्छता अभियानाची कल्पना दिली. त्यामुळे या साऱ्या दौऱ्यादरम्यान सर्वच ग्रामसेवक आमच्या सोबत असायचे. त्यांनाही प्रोत्साहन मिळाले. आमचे अप्पर मुख्य सचिव विश्वास धुमाळ यांच्या उपस्थितीत ‘यशदा’मध्ये सर्व वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांची बैठक घेतली. वारीतील लोकं उघड्यावर शौचास जायचे म्हणून आम्ही आधी पालखीमार्ग हागणदारी मुक्त करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. पालखी मार्गावरील पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तिन्ही मुख्य कार्यकारी अधिकारांच्या मदतीने या जिल्ह्यातील गावांमध्ये किती कुटुंबे आणि किती शौचालये आहेत, याचा आढावा घेतला. या गोष्टीचा फायदा असा झाला की, निर्मल ग्राम योजनेत आपण नंतरच्या काळात कायमस्वरूपी अव्वल स्थानावर राहिलो. २००४ सालापासून सुरू झालेल्या योजनेचे पहिल्या वर्षी १३, दुसऱ्या वर्षी २०० असे दरवर्षी पुरस्कारांच्या संख्येत वाढ होत गेली.

तुषार : वारीतील या स्वच्छता अभियानादरम्यान आपल्याला काही अडचणी आल्यात का, कशाप्रकारच्या अडचणींचा आपण सामना केला?

डॉ. कलशेट्टी : वारीत असं पहिल्यांदाच होत असल्यामुळे सुरुवातीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. या स्वच्छता मोहिमेत ‘हागणदारी मुक्त’ यासारखे संदेश असल्यामुळे लोकं वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचे. या गोष्टीला आधी बऱ्याच लोकांनी विरोध केला. नंतरच्या काळात लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजल्यावर सर्वच जण आनंदाने सहभागी होऊ लागले.

तुषार : आपल्या खात्याकडून आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन मिळाले ?
डॉ. कलशेट्टी : विश्वास धुमाळ हे आमचे अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. वारीत स्वच्छता मोहीम ही नवीनच बाब असल्यामुळे बैठकीत मला आधी विचारले जायचे. अहो कलशेट्टी कुठे आहेत, म्हणून मला बोलावून घ्यायचे. पण नंतर या स्वच्छता मोहिमेचे महत्त्व सर्वांना पटल्यामुळे ‘मीही यावर्षी वारीला येणार’, असं धुमाळ साहेब दरवर्षी आवर्जून मला सांगायचे. त्यामुळे वारीला व वारीतील स्वच्छता अभियानाला मोठं वजन प्राप्त झालं. ते वारीला येऊ लागल्यामुळे मला अजून कामात हुरूप वाढला. धुमाळ साहेबांनातर अजितकुमार जैन, राजेशकुमार, मालिनी शंकर यांची नियुक्ती झाली. यांनीही खूप चांगल्याप्रकारे प्रोत्साहन दिले. आमच्या खात्याव्यतिरिक्त इतर खात्यांचे अधिकारीही वारीत सहभागी होत असायचे.

तुषार : या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या मोहिमेत स्वयंसेवक म्हणून आपल्यासोबत कोण-कोण असतं?

डॉ. कलशेट्टी : वारीदरम्यान प्रत्येक जिल्ह्याच्या कला पथकातील कार्यकर्ते आमच्या सोबत असत. तसेच महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात मदत होत असे. आम्ही सगळेच जण वारीदरम्यान एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करत असू.

तुषार : आपल्या स्वच्छता अभियानाचा सध्या वारीत काही फरक दिसून येतो का?
डॉ. कलशेट्टी : होय, अगदीच. आज वारी स्वच्छ झालेली आहे. पालखी मार्गावरील सर्वच गावे आज निर्मल ग्राम योजनेंतर्गत हागणदारी मुक्त झालेली आहेत. आज वारीतील सर्वच जण स्वच्छतेविषयी सतर्क आहेत. स्वतःसह इतरांचीही काळजी घेत असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही वारीत सहभागी होत आहे. त्यांनी पर्यावरण दिंडी सुरू केली आहे

(डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे यशदा, पुणेचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत आहेत.)

(मुलाखतकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागात पीएच.डी. संशोधक व मुक्त पत्रकार आहेत.)
मोबाईल : ७७२१८६६६३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *