शिळा मंदिर आणि

गाथा मंदिराला भेट

देहू : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्या (दि. २४ ऑगस्ट) श्री क्षेत्र देहू येथे सकाळी ९ वाजता संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहेत. राज्यपालांच्या या भेटीबाबत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

‘देहू येथे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या ‘शिळा मंदिराच्या’ लोकार्पण सोहळ्याला प्रकृती अस्वाथ्यामुळे ते उपस्थित न राहू शकल्याने उद्या शिळा मंदिर आणि गाथा मंदिरास भेट देतील.’ असे भोसले यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, ‘राज्यपालांचा हा धावता दौरा असेल. ते दर्शन घेऊन थोड्या वेळातच मार्गस्थ होतील. राजगुरूनगर येथे उद्या हुतात्म्यांच्या वंशजांच्या सन्मान कार्यक्रमाला राज्यपाल येत आहेत. त्या कार्यक्रमापूर्वी सकाळी ९ वाजता ते देहूतही दर्शनाला येतील. उपजिल्हाधिकारी यांनी तसे आम्हाला पत्र पाठविले आहे. महिन्यापूर्वी आम्ही राज्यपालांची भेट घेऊन त्यांना देहूला येण्याचे निमंत्रण दिले होते’, असे देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कार्तिकी वारीमध्ये राज्यपाल कोश्यारी यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यंदाचा आषाढी वारी सोहळा सुरू होण्यापूर्वी १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचे लोकार्पण झाले. त्या सोहळ्याला राज्यपाल प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते.

दरम्यान उद्या (दि. २४ ऑगस्ट) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, बाबू गेनू, विष्णू गणेश पिंगळे या हुतात्म्यांच्या वंशजांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११ वाजता हुतात्मा राजगुरू यांची जन्मभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. खेड तालुका भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीच्या वतीने लोकसहभागातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *