संत सोपानकाका मंदिराच्या
आवारात टाळघोषात सोहळा
सासवड : ‘धाकुटी’ असूनही जिने आपल्या भावंडांना ‘संत’ होण्याचे धडे दिले, त्या संत मुक्ताबाईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (दि. २ डिसेंबर) येथील संत सोपानकाकांच्या मंदिर आवारातील नूतन मंदिरात टाळमृदंगाच्या घोषात करण्यात आली.
शुक्रवारी मार्गशीर्ष शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर श्री संत मुक्ताई आईसाहेब यांचा प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडला. देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, मुक्ताईनगरच्या श्री मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे आणि सासवडच्या संत सोपानदेव संस्थानचे विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी या सर्व संस्थान प्रमुखांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सोपानदेव मंदिरातून वारकरी दिंडीच्या टाळघोषात मंदिर प्रदक्षिणा करून मूर्ती मुख्य गाभाऱ्यात विराजमान झाली. तसेच मंदिराचे कलशारोहण मुक्ताईनगर येथील वारकरी ह. भ. प. प्रदीप महाराज सांबरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार संजय जगताप तसेच सोपानदेव पालखी सोहळ्यातील सर्व दिंडी प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात मुक्ताबाईंचे समाधीस्थळ असलेल्या जळगावमधील मुक्ताईनगर येथून मुक्ताईंची सुंदर संगमरवरी मूर्ती सासवडला आणण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठापनेपूर्वीच्या विधींना सुरुवात झाली. आईसाहेबांची मूर्ती विधीवत धान्यवासात ठेवण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांच्या सप्ताहाला सुरुवात झाली. यानिमित्ताने सकाळी ८ ते १० या वेळेत संत मुक्ताई विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले. प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त जलाधिवास विधी, अघोरहोम करण्यात आला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त गोपाळ गोसावी आणि सीमा गोसावी यांनी संत मुक्ताबाईंच्या मूर्तीला अभिषेक केला.
बंधू सोपानकाका यांनी धाकट्या मुक्ताईंचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांचे मंदिरही सोपानकाकांच्या मंदिर आवारात असावे, या कल्पनेतून येथे मुक्ताबाईंसाठी नवीन मंदिर साकारण्यात आले आहे. याच आवारात संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांच्या चांगदेवांशी झालेल्या भेटीचे शिल्पही स्थापित करण्यात आले आहे. या ४०० वर्षे जुन्या पुनर्स्थापित शिल्पाचे अनावरणही त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी करण्यात आले. अलिकडेच सोपानकाकांच्या पुरातन मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात आला आहे.