देवस्थान विरोधातील आंदोलन

अखेर आळंदीकरांनी घेतले मागे

आळंदी : श्री गुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने आज (दि. ५) आळंदीत ७२८ वा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा सुरू झाला. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर परिवाराच्या वतीने हे पायरी पूजन करण्यात आले.

ऋषिकेश आरफळकर यांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरीचे पूजन केले. माऊलींच्या जयघोषात, दही, दूध, मध, साखर, तूप, अत्तर, पुष्पहार, फुले वाहत महानैवेद्य झाला. श्रींची आरती झाली. यावेळी पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. परंपरेने उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात आला.

याप्रसंगी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर, राजेंद्र आरफळकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, ह. भ. प. केशव महाराज नामदास, श्रींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, श्मानकरी योगिराज कुर्‍हाडे, योगेश आरू, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक उपायुक्त राजेंद्रसिंग गौर आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक आळंदीत दाखल होत आहेत. श्री संत नामदेवराय महाराज, भक्त पुंडलिक, श्री पांडुरंग यांच्या पादुका पायी वारी पालखी सोहळे हरिनाम गजरात आळंदीत आगमन झाले. कार्तिकी यात्रेनिमित्त माऊली मंदिरात भल्या पहाटे घंटानादाने विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.
श्री गुरू हैबतबाबा यांच्या ओवरीत दिंडीची मंदिर प्रदक्षिणा नंतर पूजा, आरती झाली. ओवरीत विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत पूजा विधी झाला. पालखी सोहळाचे मालक आरफळकर यांच्या हस्ते विश्वस्त व मानकऱ्यांचा नारळ प्रसाद देण्यात आला. यात्रेनिमित्त श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणी नदी परिसरात तसेच विविध ठिकाणी कीर्तन, प्रवचन आधी कार्यक्रम सुरु झाले आहेत.

आळंदीकरांचे निषेध आंदोलन
कार्तिकी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी आळंदी ग्रामस्थांनी श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या विश्वस्त निवडीला विरोध म्हणून, तसेच प्रमुख विश्वस्तांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहरातून मोर्चा काढला. विशेषतः या दोन्ही मुद्यांसाठी आळंदीत बंद पाळून निषेध सभा घेण्यात आली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर आळंदीतील ग्रामस्थांना विश्वस्त म्हणून डावलल्याबद्दल मंगळवारी (दि. ५) ‘आळंदी बंद’ची हाक समस्त आळंदीकरांनी दिली होती. दरम्यान देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना ‘आळंदीकरांचे योगदान आणि देवस्थानला मदत काय?’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे या वक्तव्याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी घोषणा देऊन निषेध केला.

माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निषेध सभेत ग्रामस्थ, वारकरी मंडळी सहभागी झाले होते. चाकण चौकातून निषेध मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. प्रदक्षिणा मार्गे निघालेला मोर्चा महाद्वारासमोर थांबला. यावेळी माजी नगरसेवक डी. डी. भोसले म्हणाले, आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय असे विचारण्यापेक्षा आपलेच योगदान काय? हे स्पष्ट करा. विशेषतः देवस्थानचा हिशोब दिला जात नाही. इतर देवस्थानच्या तुलनेत आळंदीचा विकास झाला नाही. देवस्थानच्या साडेचारशे एकर गायरान जागेत काय विकास केला ते स्पष्ट करा. देवस्थान आळंदीकरांच्या बापदादांचे आहे. मात्र असे असतानाही स्थानिकांना मंदिरात विश्वस्त तसेच अगदी कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली जाते. उलट विश्वस्तांच्या पाहुण्यांना व्हीआयपी सेवा मिळते.

ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, संस्थान कमिटीवर जाणूनबुजून आळंदीकरांना डावलले जात आहे. प्रमुख विश्वस्तांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत सर्वांसमोर येऊन जाहीर माफी मागावी. ऍड. स्मिता घुंडरे म्हणाल्या, तीन वेळा आलेल्या विकास आराखड्याचा भार स्थनिकांवर आला. असे असतानाही आळंदीकरांचे योगदान काय? असे बेताल वक्तव्य कसे केले जाते. अद्यापपर्यंत एकही महिलेची विश्वस्तपदी निवड करण्यात आलेली नाही. ह. भ. प. नरहरी महाराज चौधरी म्हणाले, विद्यमान विश्वस्तांच्या शिफारसीने नवीन नियुक्त्या होत आहेत. अशा वेळी ज्यांना ज्ञानेश्वरी माहीत नाही. वारकरी संप्रदायाचा कुठलाही अभ्यास नाही, अशांना विश्वस्त म्हणून निवडले जाते ही शोकांतिका आहे.

दरम्यान, आळंदीकरांनी केलेला बंद आणि मागण्या याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार राम बिजे यांना देण्यात आले. आळंदी देवस्थान विश्वस्त समिती निवडीबाबत आक्षेप आणि आळंदीकरांना समितीमधे स्थान नसल्याने शहरातील ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवत, निषेध फेरी काढून कडकडीत बंद पाळला. दरम्यान, कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, आळंदी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *